Colleges Close : राज्यातील तब्बल ६० अध्यापक महाविद्यालये झाली बंद

राज्यात शिक्षक भरतीला लागलेल्या ग्रहणामुळे मागील १३ वर्षांत जिल्ह्यातील तब्बल ६० अध्यापक महाविद्यालये बंद पडली आहेत.
Teacher
Teacheresakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - राज्यात शिक्षक भरतीला लागलेल्या ग्रहणामुळे मागील १३ वर्षांत जिल्ह्यातील तब्बल ६० अध्यापक महाविद्यालये बंद पडली आहेत. सद्यःस्थितीत केवळ ३४ कॉलेज सुरू आहेत. शासनाची शिक्षणाबाबतची उदासीनता व नवीन शैक्षणिक धोरण डीएड महाविद्यालये बंद पडण्यास कारणीभूत असल्याचे शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे.

१२-१३ वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात डीएडची ९४ पेक्षा जास्त अध्यापक महाविद्यालये होती. मात्र, शासनातर्फे शिक्षक भरतीच होत नसल्याने मुलांचा या क्षेत्राकडे जाण्याचा कल हळूहळू कमी झाला. परिणामी, दरवर्षी विद्यार्थी संख्येअभावी चार-पाच महाविद्यालये बंद पडत गेली.

मागील पाच ते सहा वर्षांत जिल्ह्यातील ६० महाविद्यालये विद्यार्थी संख्येअभावी बंद करण्यात आली. २०१८-१९ पर्यंत जिल्ह्यात ४१ डीएडचे महाविद्यालये सुरू होती. मात्र, विद्यार्थीच मिळत नसल्याने २०१९-२० या सत्रात जिल्ह्यातील नऊ महाविद्यालये पुन्हा बंद पडली.

सद्यःस्थितीत जिल्ह्यात ३४ महाविद्यालये सरू आहेत. या ३४ अध्यापक महाविद्यालयांत विद्यार्थी संख्या अतिशय कमी आहे. जवळपास सर्वच अध्यापक महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची पटसंख्या १० ते १५ च्या खालीच असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

नको तो शिक्षकी पेशा

सध्या काम करत असलेल्या शिक्षकांवर विद्यार्थी पटसंख्या टिकविण्याचे मोठे आव्हान आहे. शासकीय असो वा खासगी अनुदानित संस्थांच्या शाळा पटसंख्या कमी झाल्यास तो शिक्षक अतिरिक्त ठरतो. समायोजन होईपर्यंत त्यांना अनेकांची मनधरणी करावी लागते. अतिरिक्त झाल्यावर समायोजन होईपर्यंत पगार मिळत नाही. खासगी शाळांमध्ये लाखांचे डोनेशन देऊनही हा संघर्ष त्या शिक्षकाच्या वाटेला येतो.

तसेच डीएडनंतर टीईटी, टेट परीक्षा उत्तीर्ण करून अनेक जण खासगी शाळांमध्ये रुजू झाले. मात्र, शाळेला अनुदान नसल्याने अनेकांना घरखर्च भागविण्यासाठी इतर कष्टांची कामे करावी लागत आहेत. काहींनी वयाची पन्नाशी गाठली तरी शाळेला मान्यता नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे नको ती शाळा अन् नको ते शिक्षक पद अशी अनेकांची मानसिकता बनली आहे.

डीएडऐवजी इंटिग्रेटेड बीएड कोर्स

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार डीएड बंद करून शिक्षक होण्यासाठी इंटिग्रेटेड बीएड डिग्री कोर्स असणार आहे. त्यात शिक्षक प्रशिक्षणाचे टप्पे असणार आहेत. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर चार वर्षांचा बीएड इंटिग्रेटेड कोर्स करता येणार आहे.

तीन वर्षांची बॅचलर डिग्री पूर्ण झालेल्या विद्यार्थ्याला दोन वर्षांचा बीएड इंटिग्रेटेड कोर्स करता येईल. तर चार वर्षांची डिग्री पूर्ण झालेल्या किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याला एक वर्षाचा बीएड इंटिग्रेटेड कोर्स शिक्षक होण्यासाठी करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com