
तात्या लांडगे
सोलापूर : खरीप असो की रब्बी हंगाम, पेरणीला सुरुवात होताच प्रत्येक शिवारात ‘हर्रर्र सर्जा-राजा हैक हैक’ असा आवाज घुमायचा. गळ्यात घुंगरपट्टा घातलेली रुबाबदार बैलजोड्यांची किंमत ३० ते ५० हजारांपर्यंत होती. ना इंधन ना मेन्टेनन्स, अशा सर्जा-राजाला लागायची फक्त वैरण. मात्र, आता फळबागांसह उसाची पिके वाढली व पेरणीखालील क्षेत्र कमी झाले. कष्ट करण्याची सवय मोडली, कमी वेळेत काम व्हावे म्हणून सर्जा-राजांच्या जोड्यांची जागा आता ट्रॅक्टर्सने घेतली आहे. १२-१५ वर्षांपूर्वी गावात कोणाकडे तरी एखादा ट्रॅक्टर दिसायचा, तोही अनेक गावांमध्ये नव्हताच. पण, आता सोलापूर जिल्ह्यातील ट्रॅक्टरची संख्या ७५ हजारांवर गेली आहे.
सोलापूर जिल्ह्यात ११ लाख ४८ हजार हेक्टर क्षेत्र असून, आता खरिपात पेरणी होणारे क्षेत्र पाच लाख सहा हजार हेक्टरपर्यंत आहे. पडीक क्षेत्र कमी होऊन आता लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे बैलजोड्या कमी पडू लागल्याने गावागावात ट्रॅक्टर वाढले आहेत. मोठ्या शेतकऱ्यांकडे स्वत:चे ट्रॅक्टर आहेत. पाच हजार लोकसंख्येच्या सावळेश्वर (ता. मोहोळ) गावात २५ पेक्षा जास्त ट्रॅक्टर आहेत. एकेकाळी गावात १०० पेक्षा जास्त बैलजोड्या होत्या, आता १०-१५ सुद्धा नाहीत, अशी स्थिती बहुतेक गावांमध्ये दिसते. त्यामुळे शेतीची नांगरट, खोडकी मारणे, कोळपणी, पाळी मारणे (कुळवणी), सरी सोडणे, पेरणी अशी सर्व कामे आता ट्रॅक्टरद्वारेच केली जात आहेत.
दुसरीकडे गहु आता थेट मशिनद्वारेच काढला जातो. ज्वारी, हरभरा, सूर्यफूल, अशा पिकांची रास करण्यासाठी ज्या मशिन यायच्या, त्याला बैलजोड्याच जुंपलेल्या दिसायच्या. पण, आता पिकांचे रास करणारे रेडिमेड ट्रॅक्टर विक्री होत असल्याने बैलगाड्या देखील दिसेनाशा झाल्या आहेत. सोलापूर व अकलूज आरटीओकडील नोंदीनुसार जिल्ह्यात दरमहा साडेतीन हजारांवर ट्रॅक्टर वाढत आहेत.
ट्रॅक्टरच्या मशागतीचे दर (प्रतिएकरी)
नांगरणी : २ हजार रुपये
खोडकणे : १ हजार रुपये
कुळवणी (पाळी मारणे) : १ हजार रुपये
पंजी मारणे : १ हजार २०० रुपये
सारे सोडणे : १ हजार रुपये
पेरणी : १ हजार २०० रुपये
ट्रॅक्टरवर मशागतीचे प्रमाण ९० टक्के
पावसामुळे आता शेतीच्या मशागती सुरू झाल्या आहेत. डिझेलचे दर प्रतिलिटर १०० रुपयांपर्यंत असल्याने मशागतीचे दर देखील वाढले आहेत. बैलजोड्या कमी झाल्याने बहुतेक शेतकरी ट्रॅक्टरद्वारेच सर्व मशागत करतात. त्यासाठी रात्रंदिवस ट्रॅक्टर सुरू ठेवावे लागत आहेत. ९० टक्के शेतकरी आता ट्रॅक्टरद्वारेच मशागत करू लागले आहेत.
- महादेव लवटे, ट्रॅक्टर मालक, मोहोळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.