
सोलापूर : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेवर प्रतिनियुक्ती असतानाही ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांनी त्याठिकाणी हजेरी लावली नाही. त्याची चौकशी झाली आणि त्या अहवालाच्या अनुषंगाने पुन्हा चौकशी झाली. त्यावेळी डिसले गुरुजींनी ढिगभर फोटो जोडून २०० पानांचा खुलासा दिला. पण, चार दिवस ऑनलाइन काम करणाऱ्या डिसले गुरुजींनी एक वर्षांतील कामाचा हिशोब घातला. तो खुलासा दिशाभूल करणारा असल्याचे चौकशी समितीने म्हटले आहे. (Disale Guruji News)
चौकशी समितींच्या अहवालानुसार त्यांच्यावर कारवाई अटळ होती. तेवढ्यात त्यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली. आता राजीनामा स्वीकारला जाणार का, राजीनाम्यामुळे त्यांच्यावरील कारवाई थांबणार का, फुलब्राईट शिष्यवृत्तीसाठी जाता येईल का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. डिसले गुरुजींनी ‘क्युआर कोड’ प्रणालीतून विद्यार्थ्यांचे शिक्षण सोपे करण्याचा प्रयत्न केला.
त्यांच्या कामाची दखल घेऊन तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी डिसले गुरुजीना नोव्हेंबर २०१७ ते ऑक्टोबर २०२० या काळात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेवर (डायट) प्रतिनियुक्ती दिली गेली. पण, त्या काळात ते शाळेतही गेले नाहीत आणि संबंधित ठिकाणी कामही केले नाही. तत्कालीन शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी त्याची चौकशी केली आणि जवळपास दोन हजार पानांचा अहवाल तयार केला.
ग्लोबल टिचर पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांना अमेरिकेतून फुलब्राईट शिष्यवृत्तीसाठी ऑफर आली. त्यासाठी त्यांना रजा हवी होती म्हणून तसा अर्ज केला. पण, अर्धवट कागदपत्रांमुळे त्यांचा रजेचा अर्ज मंजूर झाला नाही. त्यात राजकीय हस्तक्षेप झाल्याने रजेचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा राज्यभर डिसले गुरुजींची चर्चा झाली होती.
विज्ञान केंद्राकडेही फिरकले नाहीत
विज्ञान केंद्रावरही नियुक्ती असताना ते तिकडे गेले नाहीत, ही बाब संजय जावीर यांच्या समितीने निर्दशनास आणून दिली आहे. त्या समितीत विस्ताराधिकारी हरीश राऊत, गोदावरी राठोड, श्री. मुतवल्ली, गटशिक्षणाधिकारी बंडू शिंदे याचा समावेश होता. दरम्यान, त्यांना जे काम करायला सांगितले ते न करता त्यांनी स्वत:च्या सोयीने काम केल्याचेही या चौकशी समितीने पुढे आणले आहे.
राजकीय सहानुभूतीसाठी राजीनामा?
ग्लोबल टिचर पुरस्कार मिळाल्यानंतर विधान परिषदेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी डिसले गुरुजींची भेट घेतली होती. दरम्यान, डिसले गुरुजींच्या तीन वर्षाच्या कामाची चौकशी दोन समित्यांनी केली असून जिल्हा परिषदेकडून त्यांच्यावर कारवाई अटळ मानली जात आहे.
कारवाई टाळण्यासाठी राजकीय सहानुभूती मिळेल म्हणून राजीनामा दिला का, असा संशय व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात डिसले गुरुजींशी संपर्क साधला, पण त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही.
कायदेशीर कारवाई होणारच
डिसले यांच्या संदर्भात झालेल्या दोन्ही चौकशी समित्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्या अनुषंगाने त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणार आहे.
- किरण लोहार, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.