मध्यप्रदेशातून बंदुका आणून ५० हजारांत विकणारा सांगलीचा तरूण जेरबंद! मध्यप्रदेशसह माढा, पंढरपूर, सांगोला, आटणी तालुक्यातील ८ जण अटक, १७ गावठी बंदुका जप्त, वाचा...

खुनाच्या गुन्ह्यातील ‘पाहिजे’ आरोपी विकास कैलास वजाळे (वय ३१, रा. परीते, ता. माढा) हा देशी बनावटीची बंदुक विक्रीसाठी अकलूज-टेंभूर्णी रोडवरील संगम (ता. माळशिरस) येथील पतंगे मटन हॉटेलमध्ये येणार असल्याची खबर मिळाली. अकलूज पोलिसांनी त्याला सापळा लावून पकडले. त्याच्याकडील तपासात सोलापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात अवैध बंदुका विकणारी साखळीच पोलिसांनी अवघ्या पाच दिवसांत शोधून काढली. यात १७ बंदुका व ४७ गोळ्या हस्तगत करीत आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
solapur rural police action

solapur rural police action

sakal

Updated on

सोलापूर : खुनाच्या गुन्ह्यातील ‘पाहिजे’ आरोपी विकास कैलास वजाळे (वय ३१, रा. परीते, ता. माढा) हा देशी बनावटीची बंदुक विक्रीसाठी अकलूज-टेंभूर्णी रोडवरील संगम (ता. माळशिरस) येथील पतंगे मटन हॉटेलमध्ये येणार असल्याची खबर मिळाली. अकलूज पोलिसांनी त्याला सापळा लावून पकडले. त्याच्याकडील तपासात सोलापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात अवैध बंदुका विकणारी साखळीच पोलिसांनी अवघ्या पाच दिवसांत शोधून काढली. यात १७ बंदुका व ४७ गोळ्या हस्तगत करीत आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

अकलूज पोलिस ठाण्याकडील हवालदार श्रीराम पोरे यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी विकास वजाळे याला कारसह (एमएच ४५, एई ७००२) पकडले. सांगली जिल्ह्यातील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला विकासनेच विनापरवाना बंदुक विकली होती. त्याला अटक केल्यावर त्याच्याकडील बंदुक मिरज (सांगली) येथील माजी सैनिक वसाहतीतील राहुल सतीश माने याने दिल्याचे समोर आले. पोलिसांना त्याच्याकडे तब्बल ६ बंदुका सापडल्या. याशिवाय राहुलने शनि भारत बनसोडे (रा. अकोले खुर्द, ता. माढा), महादेव बाळासाहेब कोरके (रा. कोरके वस्ती, करकंब, ता. पंढरपूर), प्रदिप पांडुरंग माने (रा. चिकमहूद, ता. सांगोला), विजय सदाशिव किरणगी (रा. शिवणूर, ता. आटणी, कर्नाटक), सुमित नाना लवटे (रा. भुईटे वस्ती, सांगोला) यांनाही बंदुका विकल्या होत्या.

पोलिसांनी या सर्वांना अटक केली. यातील मुख्य संशयित राहुल माने हा मध्यप्रदेशातील अनिल पंचलाल मेहता याच्याकडून विनापरवाना बंदुका आणत होता. पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक व अकलूज पोलिसांनी मेहताला धुळे येथे अटक केली. त्याच्याकडेही चार बंदुका सापडल्या. या कारवाईत ग्रामीण पोलिसांनी आठ लाखांच्या कारसह १० लाख रुपयांच्या १७ बंदुका व ४७ हजारांची ४७ जिवंत काडतुसे (गोळ्या) जप्त केली आहेत. संशयितांना न्यायालयाने २१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.

‘या’ पथकाची धडाकेबाज कामगिरी

पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, प्रेरणा कट्टे, उपअधीक्षक संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूजचे पोलिस निरीक्षक निरज उबाळे, सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे, अंकुश वाघमोडे, पोलिस उपनिरीक्षक विशाल कदम यांच्या नेतृत्वात पोलिस हवालदार दिनेश पोरे, शिवकुमार मदभावी, राहुल रणनवरे, अमोल बकाल, समीर पठाण, दत्तात्रय खरात, रणजित जगताप, तुकाराम माने देशमुख, विजय तवटे यांच्यासह पोलिस अधीक्षकांच्या पथकातील सहायक पोलिस उपनिरीक्षक शरद कदम, पोलिस सुरज हेंबाडे, अनिल शिंदे, स्वप्नील गायकवाड, प्रविण मेटकरी यांच्या पथकाने पार पाडली. या पथकाला विशेष ॲवॉर्ड दिला जाणार आहे.

जप्त बंदुकांमध्ये ४ ‘जिग्ना’ पिस्टल

मध्यप्रदेशातील अनिल मेहता हा बडवानी जिल्ह्यातील अटनी गावातून काही हजार रुपयांत बंदुका विकत घ्यायचा आणि गुन्हेगारांच्या नेटवर्कमधून तो महाराष्ट्रात विकायचा. सांगलीतील राहुल माने याने मेहताकडून अशा बंदुका विकत घेतल्या होत्या. तो सोलापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात ४० ते ५० हजार रुपयांत बंदुक विकायचा. पोलिसांनी हस्तगत केलेल्या १७ बंदुकांमध्ये चार जिग्ना पिस्टल आहेत. एकाचवेळी ब्लास्ट आणि नऊ गोळ्या एकदम फायर होतात, असे या बंदुकांचे वैशिष्ट्य असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com