esakal | आम आदमी पक्ष भाजपची 'बी' टीम 
sakal

बोलून बातमी शोधा

आम आदमी पक्ष भाजपची 'बी' टीम 

- आम आदमी पक्षाने (आप) भ्रष्टाचाराचा मुद्दा आता पूर्णपणे सोडला असून, हा पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप यांची "बी' टीम बनला

आम आदमी पक्ष भाजपची 'बी' टीम 

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : भ्रष्टाचारविरोधी लढ्यातून जन्मलेल्या आम आदमी पक्षाने (आप) भ्रष्टाचाराचा मुद्दा आता पूर्णपणे सोडला असून, हा पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप यांची "बी' टीम बनला आहे, असा आरोप "आप'च्या राज्य अध्यक्षपदाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिलेल्या ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी केला आहे. सावंत यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे "आप'वर टीका केली आहे.

"दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामाच्या मोबदल्यात कंत्राटदार चमणकर यास अंधेरी येथील भूखंड बहाल केल्याप्रकरणी तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ तुरुंगात गेले. चमणकर यांना दिलेला भूखंड युती सरकारने परत घेतला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चमणकर यांची भागीदार कंपनी असलेल्या शिवा इन्फ्राला तो भूखंड परत दिला. याविरोधात आपण मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याला "आप'मधून बाहेर पडलेल्या व सध्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या अंजली दमानिया यांनी विरोध केला. दमानिया यांना "आप'चे इतर नेते पाठिंबा देत राहिले.

अरविंद केजरीवाल यांच्या कानी हा सर्व प्रकार घातला. उलट केजरीवाल यांनी आता भ्रष्टाचार हा मुद्दा राहिलेला नाही, असे सांगितले. तसेच, राज्यात राष्ट्रवादीशी जुळवून घेण्याचा आपल्याला सल्ला दिला,' असा दावा ब्रिगेडिअर सावंत यांनी प्रसिद्धिपत्रकात केला आहे. 

"आप'मधील हुकूमशाही आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यापासून पक्षाने घेतलेली फारकत, यामुळे आपण "आप'च्या पक्ष सदस्यत्वाचाही त्याग करीत आहोत, असे ब्रिगेडिअर सावंत यांनी म्हटले आहे. 
आगामी विधानसभेला ब्रिगेडिअर सावंत हे आंबेडकर-ओवेसी यांच्या वंचित बहुजन आघाडीबरोबर जातील, अशी शक्‍यता आहे. 

loading image