महाराष्ट्राची कन्या तामिळनाडूत बनली सेलेब्रिटी

rohini bhajibhakare
rohini bhajibhakare

तीन हजार लोकवस्तीच्या खेड्यातील एक तरुणी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी होते अन्‌ आपल्या धडाकेबाज कार्याची छाप पाडून गौरवास्पद झेप घेत आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताची निवडणूक प्रक्रिया कशाप्रकारे पार पडते हे जगाला सांगण्याची संधी तिला मिळते. या सर्व कार्याची दखल नॅशनल खुद्द "नॅशनल जिओग्राफी'ने घेतली आहे. अगदी चित्रपटाला शोभेल अशी पण सत्य असे कथानक आहे, उपळाई बुद्रूक (ता. माढा) येथील रोहिणी भाजीभाकरे-बिदरी यांचे... जिद्द, कष्टाची तयारी आणि अदम्य इच्छाशक्‍ती या त्रिसूत्रीच्या बळावर त्यांनी गगनाला घातलेली गवसणी पाहता त्यांच्या कार्याला सलामच करावा लागेल. त्या सध्या केंद्रात (दिल्ली) शिक्षण विभागात उपसचिवपदावर कार्यरत आहेत.

जनतेच्या समस्यांचे निराकरण, कायदा व सुव्यवस्था अन्य प्रशासकीय कामे तर जिल्हाधिकारी करीतच असतात पण सेलमच्या पहिली महिला जिल्हाधिकारी बनण्याचा मान मिळविताना डेंग्यूसारख्या जीवघेण्या आजारातून अंगणवाडीतील बालकांसाठी प्रभावी योजना, मध्यान्ह भोजन योजनेचा प्रभावी अंमल, माझा जिल्हा माझे वैभव, जिल्ह्याची मेक इन इंडिया योजनेखाली संरक्षण उद्योगासाठी निवड, जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा विक्रम असे अनेक उपक्रम महाराष्ट्र राज्यासाठी अभिमानास्पद असून प्रशासकीय क्षेत्रात देशभर सोलापूरचे नाव झळकवणाऱ्या भाजीभाकरे यांचे कार्य सर्वच पातळीवर नोंद घेण्यासारखे झाले आहे.

मध्यमवर्गीय शेतकरी असलेल्या रामदास भाजीभाकरे यांना पाच अपत्यं. आपल्या मुलांनी उच्च पदावर विराजमान व्हावे अशी त्यांची तीव्र इच्छा. त्यामुळे त्यांनी अतिशय परिश्रमाने सर्वांना शिकवले. वडिलांच्या प्रेरणेने एका भावाने स्वतःचा उद्योग सुरू केला. तर मोठा भाऊ संदिप भाजीभाकरे यांनी लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होवून पोलिस उपायुक्त दर्जापर्यंत मजल मारली आहे. संदिप हे उपळाईतील तरुणांचे आयकॉन. त्यांच्या पाठोपाठ रोहिणी 2008 मध्ये पहिल्याच प्रयत्नात कोणत्याही क्‍लासविना आयएएस झाल्या तर गावातील दोन डझनावर तरुणांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळविले. रोहिणी यांची मसुरी येथील प्रशिक्षणावेळी विजयेंद्र बिदरी या आयपीएस अधिकाऱ्याशी ओळख झाली. विजयेंद्र 2005 च्या बॅचचे अधिकारी. दोघे विवाहबद्ध झाले.

दुसऱ्या राज्यात पोस्टींग मिळाल्यानंतर सर्वात मोठा प्रश्‍न असतो, तेथील भाषेचा.. भाजीभाकरे यांनी तामिळ भाषा नुसती शिकलीच नाही तर त्या बोलण्यातही पारंगत झाल्या. तामिळनाडू राज्यात सहायक जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी पदावर काम केल्यानंतर त्यांची सेलमच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली. विशेष म्हणजे सेलमच्या पहिली महिला जिल्हाधिकारी होण्याचा रोहिणी यांनी मान पटकावला.
सोशल मिडियाबाबत काहीही वदंता असू देत. परंतु सकारात्मक पद्धतीने त्याचा वापर केला तर काय बदल घडवू शकतो, याचे उत्तम उदाहरण घालून दिले ते रोहिणी भाजीभाकरे-बिदरी यांनी. त्यांनी पदभार स्वीकारताच व्हॉट्‌स ऍपच्या माध्यमातून जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा ग्रुप बनवला. निर्णय, अंमलबजावणी, त्रुटी इत्यादीचा आढावा घेणे यामुळे सोयीचे झाले. सालेम हा उद्योगांचा जिल्हा. सालेमचे स्टील जगप्रसिद्ध. सगळीकडे छोटे-मोठे कारखाने. कापडावर प्रक्रिया करणारे कारखान्यांची संख्याही खूप. त्यामुळे प्रदूषणाचा मोठा प्रश्‍न. त्यासाठी तामिळनाडू प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकांना त्यांनी कामी लावले.

लोकसभा निवडणुकीत सेलमच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. निवडणूक आयोगाने शांततेत आणि अतिशय सहजतेनं पार पाडलेल्या या प्रक्रियेचा जगभरातील लोकांसाठी उत्सुकतेचा विषय असतो. आदिवासीबहुल भागांपासून ते "हाय प्रोफाईल' लोकांपर्यंत सर्वच मतदारांनी बजावलेला मतदानाचा हक्क, सुरक्षा यंत्रणा, ईव्हीएम प्रणाली, व्हीपॅटपॅट प्रणाली, निवडणूक आयोगाची नियमावली, आचारसंहिता या सर्वच बाबी जगापुढे ही निवडणूक प्रकिया एक संशोधनाचा विषय आहे. ही प्रक्रिया कशी पार पडते यावर नॅशनल जिओग्राफीक या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीने माहिती प्रसारीत केली. यासाठी देशातील वाराणसी व सेलम अशा दोन जिल्हाधिकाऱ्यांची निवड केली. त्यातील सेलमच्या जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र कन्या रोहिणी भाजीभाकरे यांना ही संधी मिळाली. संपूर्ण जगाला त्यांनी निवडणूक प्रक्रियेची माहिती दिली.

सर्वोत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी
"द बेटर इंडीया' या वेबसाईटने कल्पक, नाविन्यपूर्वक उपक्रमाच्या माध्यमातून जनतेच्या भल्याचे निर्णय प्रामाणिकपणे राबवून प्रशासकीय आधिकाऱ्यांनी कशाप्रकारे देशहित जपले याचा लेखाजोखा घेतला. आणि यातून देशभरातील सर्वोत्कृष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावे जाहीर केली आहेत. यात रोहिणी भाजीभाकरे-बिदरी या महाराष्ट्राच्या कन्येचा सामावेश करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. तामिळनाडू राज्यात आरोग्य आणि स्वच्छतेच्या प्रश्नांवरचा "भाजीभाकरे' पॅटर्न प्रसिध्द झाला आहे. या कार्याची दखल घेत

मदुराई येथे कार्यरत असताना भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत उत्कृष्ट कामगिरीबद्दल केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. मातीशी घट्ट नाते असलेल्या रोहिणी भाजीभाकरे-बिदरी त्यांच्या कामाच्या पध्दतीवरून सेलमच्या लोकांना त्या "सेलेब्रेटीपेक्षा' कमी वाटत नाहीत.

उल्लेखनीय
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते सन्मान
अधिकाऱ्यांचा व्हॉटस्‌ ऍप ग्रुप, निर्णयांच्या अंमलबजावणीवर भर
जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी विविध नाविन्यपूर्व योजना
डेंग्यू निर्मूलनासाठी खबरदारीच्या उपाय योजना
विद्यार्थ्यांसोबत पंगत, गप्पातून समस्या जाणून त्यावर केली मात
नियमितपणे भरविलेल्या जनता दरबारातून त्वरित उपाययोजना
देशातील सर्वोत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com