Vidhan Sabha 2019 : अभिजीत बिचुकले यांच्या पेक्षा त्यांची पत्नी श्रीमंत!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 October 2019

कवी मनाचे नेते आणि बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील चर्चित स्पर्धक अभिजीत बिचुकले यांच्या पेक्षा त्यांची पत्नी अलंकृता या श्रीमंत आहेत.

पुणे : शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळी मतदार संघातून निवडणूक लढवत असेलेले कवी मनाचे नेते आणि बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील चर्चित स्पर्धक अभिजीत बिचुकले यांच्या पेक्षा त्यांची पत्नी अलंकृता या श्रीमंत आहेत. प्रतिज्ञापत्रातून ही माहिती पुढे आली आहे.

बिचुकले यांनी दाखल केलेल्या अर्जाबरोबर दिलेल्या प्रतिज्ञापत्रामधून त्यांच्या संपत्तीबद्दलची माहिती समोर आली आहे. बिचुकले यांनी आपली एकूण संपत्ती केवळ 78 हजार 503 रुपये एवढी असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. बिचुकले यांनी आपल्याकडे दागिने, मोटार, पॉलिसी असे काहीही नसल्याचे म्हटले आहे. 75 हजार रुपयांची रोख रक्कम असून, याशिवाय तीन बँकांमध्ये 3 हजार 503 रुपये असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आपली एकूण संपत्ती 78 हजार 503 एवढी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पत्नी अलंकृता यांच्याकडे 40 हजार रुपये रोख रक्कम, बँक खात्यांमधील रक्कम, पॉलिसी, दुचाकी, सोन्या चांदीचे दागिने अशी एकूण 3 लाख 26 हजार 818 रुपयांची मालमत्ता आहे. अलंकृता यांच्या नावावर 80 हजारांची दुचाकी आणि 90 हजार किंमतीचे तीन तोळे सोने आहे, असेही या प्रतिज्ञापत्रात बिचुकले यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे बिचुकले यांच्यापेक्षा त्यांची पत्नी श्रीमंत आहेत. अलंकृता यांच्या नावावर बिचुकलेंपेक्षा चौपटीहून अधिक संपत्ती असल्याचे दिसत आहे. अलंकृता यांच्या नावावर 3 लाख 66 हजार 818 रुपये आहेत, असेही बिचुकले यांनी स्पष्ट केले आहे.

बिचुकले दांपत्याच्या नावावर एकही स्थावर मालमत्ता नाही. बिचुकले यांनी मागील पाच वर्षांमध्ये एकदाही आयकर भरलेला नाही. अलंकृता यांनी 2015-16 मध्ये 46 हजार 994 रुपयांचा आयकर भरला आहे. 2016-17 मध्ये 90 हजार रुपये, 2017-18 मध्ये 75 हजार रुपये, 2018-19 मध्ये एक लाख 5 हजार 595 रुपये तर 209-20 मध्ये 69 हजार 360 रुपये भरला आहे. शिवाय, सातारा येथे आपल्याविरोधात एक खटला सुरु आहे, असेही बिचुकले यांनी या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे.

कोण आहे अभिजीत बिचुकले?
- साताऱ्यात अभिजीत बिचुकलेचा जन्म झाला
- घरात धार्मिक वातावरण, ज्योतिष हा पारंपरिक व्यवसाय
- बिचुकले सातारा नगरपालिकेचे कर्मचारी होते. पण, सुट्ट्यांच्या कारणावरुन 6 वर्षांपूर्वी राजीनामा दिला
- बिचुकले यांनी उपजीविकेसाठी गाण्यांचे शो, ऑर्केस्ट्राचं आयोजन केले.
- प्रत्येक निवडणुकीत ते उमेदवारी जाहीर करतात.
- उदयनराजेंविरोधात त्याने अनेकदा खासदारकीही लढवली. मात्र, दोन हजार मतंही त्यांना मिळाली नाहीत.
- यंदा त्यांनी राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्जही भरला होता.
- बिचुकलेंवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

कोण आहेत आदित्य ठाकरे?
- शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू.
- शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव.
- शिवसेना नेते व युवासेना प्रमुख.
- वय - 29
- शिक्षण - बीए, कायद्याचा पदवीधर
- धंदा - व्यवसाय

आदित्य ठाकरे यांची संपत्ती:
संपत्ती 11 कोटी 38 लाखांवर

  • बॅंक ठेवी - 10 कोटी 36 लाख
  • बॉन्ड शेअर्स- 20 लाख 39 हजार
  • वाहन - BMW मोटार
  • Mh -09 Cb -1234
  • किंमत - 6 लाख 50 हजार
  • दागिने- 64 लाख 65 हजार
  • इतर - 10 लाख 22 हजार
  • एकूण - 11 कोटी 38 लाख

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: abhijeet bichukle and his wifes total property as he contest from worli vidhan sabha