संपावरील ग्रामसेवकांची २२ दिवस गैरहजेरीच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

राज्यातील ग्रामसेवकांनी विविध मागण्यांसाठी २२ दिवस राज्यभर संप केला होता, त्याकाळात गावगाडा ठप्प झाला होता. हा संप नुकताच मिटला आहे. पण, त्यांनी २२ दिवस केलेल्या संपाच्या कालावधीत गैरहजेरी लावण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

सोलापूर - राज्यातील ग्रामसेवकांनी विविध मागण्यांसाठी २२ दिवस राज्यभर संप केला होता, त्याकाळात गावगाडा ठप्प झाला होता. हा संप नुकताच मिटला आहे. पण, त्यांनी २२ दिवस केलेल्या संपाच्या कालावधीत गैरहजेरी लावण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांनी २२ ऑगस्टपासून विविध मागण्यांसाठी संप सुरू केला होता. जवळपास २२ दिवसांनंतर त्यांचा संप १३ सप्टेंबरला मिटला. त्यांच्या मागण्यांवर विचार करण्याचे आश्‍वासन ग्रामविकासमंत्र्यांनी दिल्यामुळे संघटनांनी संप मागे घेतला. संघटनेच्या मागण्या मार्गी लागण्याची आशा निर्माण झाल्याने ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, संपाच्या कालावधीतील कामाचे काय, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. जेवढे दिवस ग्रामसेवक संपावर होते, तेवढे दिवस त्यांच्या खाती असलेल्या अर्जित रजेमध्ये या २२ दिवसांच्या रजा परिवर्तित करण्यास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी सांगितले आहे. 

एवढेच नाही, तर ज्या ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या खाती अर्जित रजा शिल्लक नसतील, तर संपाच्या काळात त्यांची गैरहजेरी मांडण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ग्रामसेवक युनियनने केलेल्या संपाचा फटका राज्यातील ग्रामसेवकांना बसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. संपाच्या संदर्भात ग्रामविकास विभागाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे, त्यामुळे याबाबत संघटना नेमकी काय भूमिका घेते, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

अर्जित रजेमधून संपाचे दिवस वजा करून ग्रामसेवकांचे वेतन घ्यावे लागणार आहे. सरकारने काढलेले पत्रक योग्य आहे. अनेक ग्रामसेवकांच्या अर्जित रजा शिल्लक असतात. 
- टी. आर. पाटील, जिल्हाध्यक्ष, ग्रामसेवक संघ, सोलापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Absence of 22 days of Gramsevak on strike