esakal | अदर पुनावालांची सुरक्षा वाढवली, धमक्या देणाऱ्यांंवर कारवाई

बोलून बातमी शोधा

adar ponnawala
अदर पुनावालांची सुरक्षा वाढवली, धमक्या देणाऱ्यांवर कारवाई
sakal_logo
By
अशोक निंबाळकर

नगर ः कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सिरम इन्सिट्युट ऑफ इंडिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. कोणी धमक्‍या दिल्यास त्यांनी पोलिस विभागाकडे तक्रार करावी. राज्य पोलिस निश्‍चितच गांभीर्यांने या प्रकरणाचा तपास करून आरोपींवर कारवाई करतील, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराजे देसाई यांनी दिली.

गृह राज्यमंत्री देसाई यांनी कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलिस दलाचा आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्‍त अधीक्षक सौरभ अग्रवाल, दीपाली काळे आदी उपविभागीय अधिकारी, पोलिस निरीक्षक उपस्थित होते.

देसाई म्हणाले की, कोरोना प्रतिबंधक लस तयार करणाऱ्या सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांच्या सुरक्षितेसाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यांना सध्या वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यांना कोणी धमक्‍या दिल्या असल्यास त्यांनी पोलिसांकडे तक्रार करणे आवश्‍यक आहे.

राज्याचे पोलिस या प्रकरणाचा मुळापर्यंत जाऊन निश्‍चित तपास करतील. या प्रकरणावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे काय म्हणाले आहेत. हे आपल्या माहिती नाही. गेल्या तीन-चार दिवसांपासून आपण कोरोना परिस्थितीवर पोलिस दलाचा आढावा घेत आहोत.

या कालावधीत वृत्तपत्र किंवा इतर माध्यमातून ही बाब आपल्या कामाच्या व्यापामुळे निदर्शनास आली नाही. त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य राहणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.