रोहिणी हट्टंगडी यांना विष्णुदास भावे गौरव पदक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्यावतीने यंदाचे विष्णुदास भावे गौरव पदक ज्येष्ठ अभिनेत्री व नाटककार रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर झाले. रंगभूमीदिनी पाच नोव्हेंबरला नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्याहस्ते या 54 व्या पुरस्काराचे वितरण होईल.

सांगली : अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्यावतीने यंदाचे विष्णुदास भावे गौरव पदक ज्येष्ठ अभिनेत्री व नाटककार रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर झाले. रंगभूमीदिनी पाच नोव्हेंबरला नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्याहस्ते या 54 व्या पुरस्काराचे वितरण होईल.

समितीचे अध्यक्ष शरद कराळे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. ते म्हणाले, "नाट्य विद्यामंदिर समितीतर्फे प्रतिवर्षी रंगभूमीदिनी रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारास विष्णुदास भावे गौरव पदक देऊन सन्मानित केले जाते. यंदाच्या वर्षी रंगभूमी, चित्रपट, मालिकांमध्ये अनेक वर्षे काम करणाऱ्या अभिनेत्री, ज्येष्ठ नाटककार रोहिणी हट्टंगडी यांना भावे गौरव पदक देण्याचे कार्यकारिणी समितीने एकमताने ठरवले आहे. भावे गौरव पदक, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि रोख पंचवीस हजार रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पाच नोव्हेंबरला रंगभूमीदिनी सायंकाळी 5 वाजता नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्याहस्ते पुरस्काराचे वितरण होईल.''

ते पुढे म्हणाले, "रोहिणी हट्टंगडी यांच्या वडीलांचे नाव अनंत मोरेश्‍वर
ओक तर आईचे निर्मला आहे. पुण्यात भावे स्कुलपासून त्यांच्या अभिनयाची
सुरवात झाली. 1971 मध्ये दिल्लीच्या नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामध्ये
अभिनयासाठी त्यांची निवड झाली. तीन वर्षात अनेक भाषांतील नाटकामध्ये कामे केली.

रिचर्ड स्टॅनबरी निर्मित "गांधी' चित्रपटातील कस्तुरबा च्या भूमिकेतून त्या आंतरराष्ट्रीय चित्रपट जगतात पोहोचल्या. अनेक नाटकातून आणि चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या. सहा तेलगू चित्रपटही केले. हिंदी-मराठी दूरदर्शन मालिकामध्येही त्या दिसतात. हट्टंगडी दांपत्याने "कलाश्रय' ही नाट्याभ्यास करणारी व प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देणारी संस्था स्थापन केली आहे. फिल्मफेअरसह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.'' समितीचे उपाध्यक्ष विनायक केळकर, कार्यवाह ऍड. विनायक ताम्हनकर, कोषाध्यक्ष मेधाताई केळकर, सदस्य जगदीश कराळे, बलदेव गवळी, विलास गुप्ते
आदी उपस्थित होते.

महापुरात नाट्यमंदिरचे नुकसान -
ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुराच्या काळात भावे नाट्य मंदिरातही पाणी आले होते. जवळपास 25 लाखाचे नुकसान झाले आहे. महापुराच्या प्रलयानंतरही नाट्यमंदिर प्रयोगासाठी सज्ज झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress Rohini Hattangadi announced for Vishnudas Bhave Gaurav Award