अतिरिक्त दूध खरेदी योजना उद्यापासून बंद 

प्रमोद बोडके
Saturday, 25 July 2020

अतिरिक्त दुधाचे करायचे काय? 
राज्यातील कोरोनाचा धोका अद्यापही टाळलेला नाही. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील महत्त्वाची शहरे लॉकडाऊनमध्ये आहेत. चहा विक्रेते, मिठाईची दुकाने, हॉटेल व रेस्टॉरंट अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत. त्यामुळे राज्यातील अतिरिक्त दुधाचा प्रश्‍न मार्गी लागण्यापूर्वीच शासनाने अतिरिक्त दूध खरेदीची योजना बंद केली आहे. शिल्लक राहणाऱ्या दुधाचे करायचे काय? असा मोठा प्रश्न आता राज्यातील खासगी व सहकारी दूध संघापुढे पडला आहे. 

सोलापूर : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन कालावधीत राज्यातील अतिरिक्त दूध खरेदी करण्यासाठी 6 एप्रिलपासून अतिरिक्त दूध खरेदी योजना सुरू करण्यात आली होती. महानंदच्या माध्यमातून अतिरिक्त दूध दूध खरेदी करून या दुधाचे रूपांतर दूध भुकटीमध्ये केले जात होते ही. योजना उद्यापासून (रविवार, ता. 26) स्थगित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाने घेतला आहे. तसे पत्रच महानंदच्या व्यवस्थापकांनी राज्यातील सर्व दूध भुकटी प्रकल्प धारकांना व दूध संघांना पाठविले आहे. 

राज्यातील अतिरिक्त दुधाबाबत 3 एप्रिल रोजी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार अतिरिक्त दुधापासून दूध भुकटी करण्याची योजना जाहीर झाली. ही योजना महानंदच्या माध्यमातून राबविण्यात आली. सहा एप्रिल पासून प्रत्यक्षात सुरू झालेल्या या योजनेसाठी दूध स्वीकृतीची कमाल मर्यादा सहा कोटी लिटर इतकी निश्‍चित करण्यात आली होती.

या योजनेतून 23 जुलैपर्यंत पाच कोटी 89 लाख लिटर दुधाची स्वीकृती झाली आहे. शासनाने निश्‍चित केलेली मर्यादा पूर्ण झाली आहे. दूध पुरवठ्याच्या मर्यादेचे उल्लंघन न होण्यासाठी अतिरिक्त दूध खरेदी योजना 26 जुलै पासून स्थगित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाने घेतला आहे. 27 जुलै रोजी कोणत्याही परिस्थितीत या योजनेअंतर्गत दूध भुकटी प्रकल्पास दूध पुरवठा करू नये अशी स्पष्ट सूचनाही महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाने दिल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Additional milk purchase scheme closed from tomorrow