
Aaditya Thackeray : 'शिवसेना' हातून निसटल्यानंतर आदित्य ठाकरे भावनिक, पत्रकारांसमोरच....
मुंबईः निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. शिवसेना हातची निसटल्यानंतर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी एक वेगळं चित्र बघावयास मिळालं.
एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेनेत बंड करत बाहेर पडले आणि भाजपसोबत जात नवं सरकार स्थापन केलं. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून सत्तासंघर्ष आणि पक्ष चिन्ह आणि पक्ष नाव यांचा वाद निवडणूक आयोगात गेला होता. अनेक दिवस निकालाच्या प्रतिक्षेनंतर आज आयोगाने निकाल दिला आहे. शिंदे गटाला शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह मिळालं आहे.
या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधत भाजपसह निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले. या पत्रकार परिषदेला आदित्य ठाकरेंचीही उपस्थिती होती. मात्र आदित्य ठाकरे भावनावश दिसले. त्यांना भावना अनावर झाल्या होत्या. कॅमेऱ्यासमोरही ते स्वतःला रोखू शकत नव्हते. आदित्य ठाकरेंची ही हतबलता कदाचित पहिल्यांदाच बघायला मिळाली असेल.
यावेळी संतप्त होत उद्धव ठाकरे म्हणाले की, आज शिंदे गटाने कागदावरचा धनुष्यबाण चोरला आहे. परंतु जो आमच्या देव्हाऱ्यात पुजला जातो, तो कसा चोरणार? शिवसेनाप्रमुख स्वतः या धनुष्यबाणाची पूजा करायचे त्यामुळे हा आमच्याकडेच राहणार आहे, असं म्हणत त्यांनी उपस्थित पत्रकारांना देवघरातला धनुष्यबाण दाखवला.
दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राऊत म्हणाले की, जो पक्ष बाळासाहेबांनी, लाखो शिवसैनिकांनी बलिदान देऊन मोठा केला. तो पक्ष ४० बाजारबुणगे विकत घेतात. यावर काय बोलावं, लोकशाहीवरचा विश्वास आज गमावला असल्याचं राऊत म्हणाले.