
बारामती लोकसभा मतदार संघ ताब्यात घेण्यासाठी भाजपने आता कंबर कसली आहे. 2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या काळात अनेक बडे नेते बारामतीला भेटी देणार आहेत. याची सुरवात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यापासून होत आहे. निर्मला सीतारामन सप्टेंबर महिन्यातील 22,23 व 24 तारखेला बारामतीला भेट देणार आहेत. तर दुसरीकडे नवनिर्वाचित भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पुढच्या दोन दिवसांत म्हणजे 6 तारखेला बारामतीच्या दौऱ्यावर असणार आहेत. सीतारामन यांच्या दौऱ्याच्या तयारीचा आढावाही बावनकुळे घेणार आहेत.
"अमेठीचा किल्ला आम्ही जसा सर केला तसा यंदा बारामतीचा किल्ला सर करणार. 2014 साली आम्ही अमेठीत हरलो होतो पण आमच्या सातत्यपूर्ण कामगिरीने आम्ही 2019 ला यश मिळवले. राहुल गांधींनी वायनाड मतदारसंघ शोधला होता. पण आता सुप्रिया सुळे यांनीही त्यांचा 'वायनाड' शोधावा. कारण आता बारामतीचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी दिल्लीतून नियोजन सुरु आहे, यंदा काहीही झालं तरी बारामतीचा गड सर करणारच", असा आत्मविश्वास भाजप नेते आणि बारामतीच्या प्रभारीपदाची जबाबदारी असणारे राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
पुढे बोलताना राम शिंदे म्हणाले की, "अमेठीमध्ये 2014 साली आम्हाला पराभवाचा धक्का बसला. पण त्यानानंतरही आम्ही थांबलो नाही. आमचे प्रयत्न आम्ही सुरुच ठेवले. पण आम्हाला 2019 ला यश मिळालंच. राहुल गांधी पराभूत होतील, असं कोणालाही वाटत नव्हतं पण भाजपने त्यांना पराभूत करुन दाखवले. ए फॉर अमेठी मिशन सक्सेसफूल झालं, आता बी फॉर बारामतीचं मिशन आम्हाला साध्य करायचं आहे. आम्ही 2014 आणि 2019 ला हरलो पण आता २०२४ ला कोणत्याही परिस्थितीत जिंकणारच"
इंदापूर येथील अर्बन बँकेच्या सभागृहात सीतारामन,बावनकुळे यांचा दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर आयोजित भाजप संवाद बैठकीत राम शिंदे बोलत होते. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, किसन मोर्चा प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, पृथ्वीराज जाचक, अविनाश मोटे, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, मारुती वणवे, तेजस देवकाते यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.