MPSC चा सुधारित निकाल जाहीर होताच उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठविणार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

राज्यसेवा परीक्षा 2017 निकालाच्या अनुषंगाने शिल्पा साहेबराव कदम यांनी उच्च न्यायालयच्या औरंगाबाद खंडपीठात समांतर आरक्षणाशी संबंधित याचिका क्रमांक 6578/2018 दाखल केली होती.

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा परीक्षा 2017 निकालाच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये एका उमेदवाराने समांतर आरक्षणाशी संबंधित याचिका दाखल केली होती. ही याचिका तसेच समांतर आरक्षणाबाबतच्या इतर याचिकांवरील विशेष सुनावणी होऊन मुंबई उच्च न्यायालयाने 8 ऑगस्ट 2019ला अंतिम आदेश दिले आहेत.

त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत या परीक्षेचा सुधारित निकाल घोषित करण्यात येणार आहे. त्यानंतर आयोगाकडून शिफारस होणाऱ्या उमेदवारांना सर्व पूर्तता करुन प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे, असे स्पष्टीकरण शुक्रवारी (ता.6) सामान्य प्रशासन विभागाने दिले आहे.

राज्यसेवा परीक्षा 2017 निकालाच्या अनुषंगाने शिल्पा साहेबराव कदम यांनी उच्च न्यायालयच्या औरंगाबाद खंडपीठात समांतर आरक्षणाशी संबंधित याचिका क्रमांक 6578/2018 दाखल केली होती. त्यावरील 12 जुलै 2018 रोजीच्या विशेष सुनावणीवेळी न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने या उमेदवारांना नियुक्ती देण्यात आलेली नाही. या समांतर आरक्षण संदर्भातील याचिकेवरील सुनावणी 27 सप्टेंबर 2018 या दिवशी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये झाली होती.

याबाबतचा निकाल उच्च न्यायालयाने घोषित न केल्यामुळे या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू करणे शक्य झाले नाही. ही याचिका तसेच समांतर आरक्षणासंदर्भातील इतर याचिका यावरील विशेष सुनावणी 21 जुलै 2019 ला मुंबई उच्च न्यायालय येथे झाली होता. त्यानंतर 8 ऑगस्ट 2019 या दिवशी उच्च न्यायालयाने अंतिम आदेश दिले आहेत, अशीही माहिती देण्यात आली आहे.

(सौजन्य : डीजीआयपीआर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After declaration of revised result of MPSC candidates will send for training