अग्गंबाई... राहीबाई आहेत ट्रेंडिंगमध्ये... का शोधताहेत नेटिझन्स? 

rahibai popere in trending
rahibai popere in trending

नगर ः कपाळावर भलं मोठ्ठं कुंकू, नाकात ही लांबसडक नथ, काठापदराच्या साडीचा काष्टा घातलेल्या बाईंना गुगलवर सर्च केले जातंय. बरं आता असं वर्णन असलेली बाई शहरात थोडीच घावलं. ती असते आदिवासी पाड्यात. तिला जगभरातले नेटिझन्स धुंडाळत आहेत. तीही काहीतरी शोधतेय. मात्र, ते वेगळंच आहे. गुगल-बिगल असलं काही काही तिला कळत नाही. एवढंच कशाला मोबाईलही तिच्यासाठी मोठ्ठं अप्रपू आहे. तरीही तीचं हे काम जगभरात पोचलंय आणि जगाच्या हेल्थसाठीही ते खूप महत्त्वाचं आहे.


कोण आहेत राहीबाई
या बाई कोण आहेत.. तर त्या आहेत नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्‍यातील कोंभाळण्याच्या. राहीबाई पोपेरे असं त्यांचं नाव. त्या राहतात तो इलाका म्हणजे आजही दुर्गम. त्या गावात अजूनही मोबाईलची रेंज पोचलेली नाही. तरीही त्या जगभरात ट्रेडिंगमध्ये आहेत. राहीबाई नावाने गुगलवर सर्च दिला जातोय. असं काय केलंय त्यांनी...? 

रातोरात झाल्या सेलिब्रेटी, सेल्फीसाठी चढाओढ 
महाराष्ट्रात त्या बीजमाता म्हणून प्रसिद्धीस पावल्या आहेत. राहीबाईंना या कामाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या या कामामुळे त्या रातोरात सेलिब्रेटी बनल्या आहेत. त्यांना गावागावांतून सत्काराला बोलावणं येतं. बियाणांची माहिती सांगण्याचा आग्रह होतो. व्याख्यान वगैरे असल्या गोष्टी त्यांना माहिती नाहीत. परंतु तरीही त्या जोरदार भाषण ठोकतात. कॉलेजमधूनही त्यांना बोलावणं येतं. एखाद्या मुरब्बी वक्‍त्यासारखं त्या भाषण देतात. त्यांच्या बोलण्यातील ग्रामीण, आदिवासी हेल कॉलेजच्या पोरा-पोरींना आवडतो. त्यामुळे महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण जगभरातील जनता त्यांची फॅन झालीय. त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठीही चढाओढ लागते. 

का शोधताहेत राहीबाईंना? 
संकरित बियाणांमुळे उत्पादकता वाढली आहे. मात्र, त्यामुळे लोकांना अनेक प्रकारचे आजार जडले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पुन्हा गावरान खाण-पानाकडे शहरीबाबूंचा ओढा वाढला आहे. प्रत्येकाला ऑरगॅनिक फूड हवं आहे. आणि तेच मिळणं मुश्‍कील झालंय. आदिवासी पाड्यात राहणाऱ्या राहीबाई पोपरे यांनी देशी आणि पारंपरिक बियाणांचं संकलन केले. त्या बियाणांची बॅंक तयार केली. लहानपणापासूनच त्यांना बियाणे गोळा करण्याचा छंद आहे. त्यांनी देशी वाणांच्या बियाणांच पारंपरिक पद्धतीनं संवर्धनं केलं. आज राहीबाई यांच्या सीड्‌स बॅंकमध्ये तब्बल 54 पिकांचे 116 जातींचे वाण आहे. 

वीस वर्षांपासून करतात काम 
राहीबाई पोपेरे या हायब्रीड वाण आणि रासायनिक शेती यामुळे कुपोषणासहित आरोग्याच्या इतर समस्या वाढल्याने विषमुक्त शेतीसाठी कृतिशील प्रयत्न करीत आहेत. सुरवातीपासूनच शेतीची आवड असल्याने त्यांनी भाजीपाल्यासह अन्य काही पिकांचे गावरान वाण जपण्याचा, त्यांच्या बिया संकलित करून ठेवण्याचा वसा हाती घेतला. सुमारे वीस वर्षांपासून त्यांचे हे काम अथक सुरू आहे. 

पद्मश्रीने सन्मान 
गावरान वाण शोधणे, लागवड करणे, त्यांच्या बिया काढून त्या संकलित करतात. एका गाडग्यात राख भरायची आणि त्यात बिया ठेवायच्या. कित्येक वर्षे त्याला काहीच होत नाही. अशा प्रकारे संर्वधित केलेल्या बियाणांमुळे मानवाचं आरोग्यही संर्वधित होतं. राहीबाई इतरांना पेरणीसाठी हे संर्वधित केलेलं बियाणं देतात. त्यामुळे इतराना प्रेरणा मिळते. त्यांच्या माध्यमातून पुन्हा बियांचे संकलन त्या करतात. अशा पद्धतीने त्यांच्या बीजबॅंकेचा विस्तार सुरू आहे.

११६ वाणांचे संवर्धन

आतापर्यंत त्यांनी 54 पिकांच्या 116 वाणांच्या गावरान बियांचे जतन केले आहे. अनेक अशा प्रकारची वाण आहेत की ते तज्ज्ञांनाही माहिती नाहीत. त्याचा आपल्या आरोग्यासाठी मोठा फायदा आहे. त्यात काही जंगली बिया आहेत. त्यामुळे अनेक रोगांवर इलाज होऊ शकतो. अभिनेता नाना पाटेकर यांनी पक पक पकाक या मराठी चित्रपटात भुत्या हे कॅरेक्‍टर केलं आहे. त्यात नाना जे काम करतात, तेच काम राहीबाई करतात. राहीबाईंना जाहीर झालेला हा पद्मश्री पुरस्कार त्यांच्या आजवरच्या कामाची पोचपावतीच आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com