
कृषी मंत्र्याच्या मतदारसंघात शेतकऱ्याची फसवणूक! सूर्यफूल बियाणे उगवलेच नाही | Fraud with Farmer
सिल्लोड, आमठाणा : आमठाणा (ता.सिल्लोड) येथील शेतकऱ्याने त्याच्या शेतात पेरलेले सूर्यफूल बियाणे उगविले नसल्याने शेतकऱ्याने तक्रार निवारण समितीकडे तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी शेतात पाहणी केली.
येथील शेतकरी श्रीराम पांडुरंग डफळ यांनी मागील महिन्यामध्ये गावातील श्रीनाथ कृषी केंद्रावरून गंगाकावेरी सीड्स कंपनीचे दोन किलो सूर्यफूल बियाणे खरेदी केले होते. त्यांच्या गट क्रमांक १३७ मध्ये त्यांनी सूर्यफुलाच्या बियाणाची पेरणी केली. परंतु बियाणे उगविले नाही. त्यांना वाटले पाणी दिल्यावर बियाणे उगवेल. परंतु पाणी दिल्यानंतर देखील बियाणाची उगवण झाली नाही.
घडलेल्या प्रकाराची माहिती शेतकऱ्याने दुकानदार तसेच कंपनीच्या प्रतिनिधीस सांगितली. त्यांनी येऊन पाहणी केली व एक बॅग बियाणाची घ्या व गप्प बसा असा सल्ला शेतकऱ्यास दिला. शेतकऱ्याने यांची तक्रार पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे दाखल केली. त्यानंतर पंचायत समितीच्या कृषी विभागाचे अधिकारी संजय व्यास यांनी शेतामध्ये जाऊन पाहणी करीत पंचनामा केला.
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातच अशा प्रकारे शेतकऱ्यांची बियाणे कंपन्यांकडून फसवणूक केली जात आहे. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना मदत आणि नुकसानभरपाई मिळेल? की या कंपन्या राजकीय नेत्यांच्या आश्रयाने अशीच शेतकऱ्यांची फसवणूक करणार याकडे लक्ष असेल.