मी भाषा शोधतोय...

Marathi-Language
Marathi-Language

मला चिमणी-कावळ्याच्या भावनांचा 
अनुवाद करता यायला पाहिजे
मला झाडाचं शरीर नेसून झाडाचं दु:ख कळलं पाहिजे
मला विजेत होरपळता आलं पाहिजे
मला जाळात जळता आलं पाहिजे
मला विहिरीइतकं खोल होता आलं पाहिजे
मला माझ्याच विचाराची जमीन नांगरता आली पाहिजे 
मला सामान्य माणसाच्या काळजात खोपा करून 
राहता आलं पाहिजे
खडकाच्या आत्म्यात उतरून त्याला पाझर फोडता आला पाहिजे

मला तुकारामाचा अणु व्हायचंय 
मला मुक्ताईची मुंगी व्हायचंय
मला चोखामेळ्याची हाडं व्हायचंय

माणसाला व्यक्त करणाऱ्या शब्दाचा अनुवाद 
करायचाय माझ्या भाषेत 
माणसाच्या संवेदनांची, करुणेची, प्रार्थनेची तंतोतंत अनुवाद करेल 
अशी भाषा शोधायचीय..

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ही कविता नाहीये! मी भाषा शोधतोय अन् ग्लोबलविश्वाच्या अतोनात पसाऱ्यात मायमराठी हरवत असल्याचा प्रत्यय हरघडी येऊ लागलाय. म्हणून मराठी भाषा संपून जाणार, ही भीती मला नाहीच. सातशे वर्ष उलटून गेली तरी ज्ञानेशाची ओवी आहेच. तुकोबाचा अभंग आहे. त्यामुळे फिकीर नाही. मात्र, ज्या वास्तवाला भाषा सामोरी जाते ते बिलकूल चांगलं नाही. भाषेची कोंडी होतेय. तिची दमछाक होतेय. तिचा श्वास गुदमरतोय. झालं काय, सगळ्या बाजूंनी जगणं ऑनलाइन करत सुटल्याच्या काळात; ऑफलाइन काही दुखणी सुरु झालेली आहेत. त्यातलं पहिलं दुखणं, की आपण आपले ‘व्यवहार’ स्वार्थाभोवती केंद्रित केले. आपल्या फायद्यापुरतं जे आहे; तेवढे घ्यायचं. साहजिकच त्याची एक भाषा ठरून गेलीय. ती बिलकूलही समृद्ध नाहीये.

शब्दांची विचित्र काटकसर करून ती भाषा तयार झाली. अन् आता सगळ्यांच्याच बोकांडी ती बसलीय. दुसरी गोष्ट आपण संवादच बंद केलाय. आपण बोलतच नाहीये. मग आपल्याला शब्दांची निकड कशी भासणार? का भासावी? कोण नाहक कशाला धावत सुटणार शब्दांच्या मागे? शब्द काही पैसे मिळवून देत नाही! आणि आपल्याला काही लेखक-कवी व्हायचं नाहीये. भाषेचं ओझं त्यांनी डोक्यावर घेऊन फिरायचं. ते त्यांचं काम; आम्ही व्यवहार सांभाळतो! 

शब्दांनी आमचं काही अडलं नाही. शिवाय त्यानं आमचं असं काय भलं होणार? अशी स्थिती सांप्रत काळी झालीय.  सोशलमीडियाच्या अजगरानं तर थेट भाषाच गिळायला सुरुवात केलीय. यासंदर्भात मागं हेमंत टकले यांनी आपलं मत व्यक्त केलं, ते मला इथं महत्त्वाचं वाटतं. ते म्हणतात, ‘माहिती तंत्रज्ञानाच्या झपाट्यानं वाढणाऱ्या प्रवाहात आपली मातृभाषा हरवून जाते आहे. जमाना बदललाय. भाषा आहे, मात्र संवाद हरवत चाललाय. आता आपल्या हातात मोबाईल आला. रिमोट कंट्रोल आला. मग सगळी रीतच बदलून गेली. आता आपण बोलणं क्यूट करतो, रिमोटनं भाषा म्यूट करतो. आपण अन् आपला लॅपटॉप. कानात डूल घालावे तसे इअर फोन. जगातल्या सगळ्या भाषा आता आपल्या दिमतीला. भाषेचा आणि संस्कृतीचा मॉलच उघडलाय. शब्दांच्या ऐवजी सांकेतिक प्रतिमांचा वापर भावना व्यक्त करण्यासाठी सर्रास होताना दिसतोय. वाढदिवस आहे मग फुलांची इमोजी. दु:ख झालंय तर रडवलेला चेहरा. सगळंच आहे नं त्यात..  
मग भाषेचा प्रश्न येतोच कुठे?
भाषेच्या संदर्भातलं हे वास्तव भीषण आहे. त्यामुळंच मी भाषा शोधतोय फेसबुक, व्हाटस्अॅप, ट्विटर, इन्स्टाग्रामवर..आता ती कधी सापडेल हे काही सांगता यायचं नाही..!!
(ऐश्‍वर्य  पाटेकर यांना २०११मध्ये त्यांच्या ‘भुईशास्त्र’ या काव्यासाठी साहित्य अकादमीचा युवा साहित्यिक पुरस्कार मिळाला आहे.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com