खडसेंच्या प्रवेशावर अजितदादा बोलले, पत्रकारांसमोर हातच जोडले 

प्रमोद बोडके
Sunday, 18 October 2020

पारनेरचे "ते' नगरसेवक अपक्ष असल्याचे सांगितले 
नगर जिल्ह्यातील पारनेर येथील शिवसेनेच्या नगरसेवकांनी मध्यंतरी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. पारनेरचे ते अपक्ष आहेत. त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश हवा आहे अशी माहिती माझ्यापर्यंत देण्यात आली. ते नगरसेवक अपक्ष असल्याचे सांगितल्यानेच त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला. ते नगरसेवक शिवसेनेचे आहेत हे समजल्यानंतर त्यांना पुन्हा मातोश्रीवर पाठवून शिवसेनेत पाठविण्यात आल्याचीही आठवणही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पत्रकार परिषदेत करून दिली. 

सोलापूर : भाजपचे माजीमंत्री एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश कधी होणार? खडसे यांच्या प्रवेशाबद्दल नुसतीच चर्चा आणि मुहूर्तावर मुहूर्तच निघत आहेत. असा प्रश्‍न सोलापूरच्या पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्यात आला. अतिवृष्टीच्या प्रश्‍नांमध्ये राजकीय प्रश्‍न आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांसमोर हात जोडत सांगितले मला या विषयांमध्ये किंचितही माहिती नाही. 
ज्या विषयाची मला काहीच माहिती नाही, तो विषय मी तुम्हाला कसा सांगणार? असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसे यांच्या प्रवेशाच्या प्रश्‍नाला बगल दिली.

सोलापूर महापालिकेचे विरोधी पक्षनेते व शिवसेना नेते महेश कोठे आणि एमआयएमचे नगरसेवक तोफिक शेख हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सोलापुरात रंगत आहेत. या दोघांनीही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रवेशासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेटही घेतल्याची माहिती समोर येत आहे.

त्या पार्श्वभूमीवरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्यात आले. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस असे मिळून तिघांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. आम्ही तिन्ही पक्षांनी एकमेकांचे कार्यकर्ते फोडायचे नाहीत असा संकेत ठरला आहे. या संकेताचे आम्ही पालन करतो. त्यामुळे शिवसेनेच्या महेश कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेश बद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तूर्तास तरी पूर्णविराम दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Dada spoke at Khadse's entrance, joined hands in front of journalists