राजकारणापेक्षा कुटुंब महत्त्वाचे म्हणत माघारी आले

ajit pawar
ajit pawar

मुंबई - ‘आदरणीय मुख्यमंत्रीसाहेब, माझी व्यक्तिगत अडचण आहे. सरकारमध्ये मला राहता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे भविष्यात अनेक अडचणी निर्माण होतील. त्यातच गटनेतेपदाचाही वाद होणारच आहे. त्यामुळे माझा राजीनामा स्वीकार करण्यात यावा,’ अशी नम्र विनंती करत राजकारणात भूकंपाचा धक्‍का देणारे अजित पवार यांनी बंड शमवले. पवार कुटुंबीयात पहिल्यांदाच बंडाचे निशाण फडकवणारे अजित पवार यांनी अखेर राजकारणापेक्षा कुटूंब महत्त्वाचे मान्य करत भाजपसोबतच्या सत्तेतून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. 

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप निर्माण करत अजित पवार यांनी शनिवारी (ता.२३) अत्यंत नाट्यमय पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या सत्तेत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या बंडाचे कारण कळण्याची कोणतीही संधी त्यांनी पवार कुटुंबाला दिली नाही. स्वत: शरद पवार त्यांच्या या निर्णयापासून अनभिज्ञ होते. मात्र, ज्या वेळी शपथ घेतली, त्या वेळेपासून अजित पवार प्रचंड अस्वस्थ होते. सत्तेत आल्यानंतरही त्यांनी सार्वजनिक कार्यक्रम टाळले होते. मंत्रालयात तर ते एक सेकंददेखील गेले नाही. अजित पवार यांचे बंड थोपवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी प्रयत्नांची शर्थ सुरू केली होती. जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेत्यांनी अजित पवार यांची मनधरणी करण्यासाठी सतत तीन दिवस प्रयत्न केले. पण, अजित पवार निर्णयावर ठाम होते. राजीनामा देतो अन राजकीय सन्यास घेतो, अशी खंत त्यांनी या नेत्यांच्या समोर बोलूनही दाखवल्याचे सांगण्यात येते.  एका बाजूला अजित पवार यांनी शरद पवार यांना अंधारात ठेवून बंड केल्याने पक्षात कमालीची अस्वस्थता होती. पण, शरद पवार यांनी मात्र अजित पवार यांच्या बंडाच्या विरोधात पक्षातील ऐक्‍य राखण्यासाठी ठोस उपयोजना सुरू केल्या. पक्ष हा केवळ अजित पवार यांचा एकट्याचाच नाही. शेकडो सामान्य कार्यकर्ते या पक्षात आहेत. नेते आहेत. या भावनेचा आदर अजित पवार यांनी करायला हवा होता, अशी ठाम भूमिका घेत त्यांचे गटनेतेपद काढून घेण्यात आले. पक्षातील नेत्यांचे मनधरणीचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यावर पवार कुटुंबातील सदस्यांनी अजित पवार यांच्याशी बोलणी केली आणि त्याचा परिणाम झाला. राजकारणात राहू अथवा न राहू पण कुटुंबातील ऐक्‍य व स्नेह कमी होता कामा नये, यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय पक्‍का केला अन्‌ मुख्यमंत्र्याकडे जाऊन राजीनामा सोपवला. फडणवीस यांनी निर्णयाचा फेरविचार करण्याचा आग्रह धरला, पण आपली कौटूंबिक अडचण असल्याचे सांगत व्यक्‍तीगत कारणानेच मी हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले व राजीनामा स्वीकारा, असा आग्रह केला. अखेर पवार कुटुंबीयातील राजकीय संघर्षाचा केवळ ७९ तासांत शेवट झाला. 

कुटुंबीयांच्या शब्दाला दिला मान
शरद पवार त्यांच्या राजकीय भूमिकेवर ठाम होते, पण कौटूंबिक स्तरावर मात्र ते कमालीचे व्याकूळ होते. अजित पवार व शरद पवार या दोघांचीही भावनिक स्थिती पाहता कुटुंबातील सर्व सदस्यांनी अजित पवार यांची समजूत काढण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू केला. अखेर, सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनीही अजित पवार यांची मनधरणीचा प्रयत्न केला. तर, शरद पवार यांच्या पत्नी व अजित पवार यांच्या काकी प्रतिभाताई पवार यांनी काल रात्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधून कुटुंबापेक्षा राजकारण मोठे नाही, अशी समजूत काढली. अजित पवार यांनीही प्रतिभाताई पवार यांच्या शब्दाला मान दिला. कुटुंबात कोणत्याही प्रकारचा विसंवाद नको. या वयात शरद पवार यांच्याविरोधात बंड करण्याचे कृत्य करू नये, अशी अजित पवार यांची भावना झाली. आज सकाळी त्यांनी ट्रायडन्टमधे सदानंद सुळे यांच्याशी सखोल चर्चा करून बंडाचे निशाण मागे घेण्याचा निर्णय घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com