कोणी कितीही भडकावू भाषणं करुदेत, आपले संस्कार सोडू नका : अजित पवार

Ajit Pawar vs Raj Thackeray
Ajit Pawar vs Raj Thackerayesakal
Summary

'देश, राज्यात देव, धर्म, जातीसहित घंटा, भोंगे याचेच राजकारण सुरू आहे.'

कोयनानगर (सातारा) : प्रकल्पग्रस्तांच्या त्याग, संघर्ष आणि कष्टातून कोयना धरणाची निर्मिती झाली आहे. ते कधीही विसरता येणार नाही. त्यामुळे त्यांचे प्रलंबित प्रश्न वर्षाअखेरीपर्यंत मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.

कोयना धरणाच्या (Koyna Dam) ६१ व्या वर्धापन दिनादिनी श्रमिक मुक्ती दलातर्फे आयोजित प्रकल्पग्रस्तांना जमीन सातबारा वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil), गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, युवा नेते सत्यजित पाटणकर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, विभागीय आयुक्त सौरभ राव, प्रभारी जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ह. वि. गुणाले, सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘‘देश, राज्यात देव, धर्म, जातीसहित घंटा, भोंगे याचेच राजकारण सुरू आहे. मात्र, आपण मंडळींनी एकोपा, जातीय सलोखा ठेवला पाहिजे. कोणी कितीही भडकावू भाषणे केली. विचार मांडले, तरी आपले संस्कार व विचार सोडू नका. प्रशासनाचेही त्यावर बारीक लक्ष आहे. दोषींवर कठोर कारवाईचे धोरण अवलंबले आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई यांच्यासारखी दूरदृष्टी असणाऱ्या व प्रकल्पाला जमिनी, घरे देणाऱ्यांमुळे कोयना धरणाची निर्मिती झाली आहे. त्यात ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई यांचे मोठे योगदान आहे. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक आहे. त्यांचे प्रश्न वर्षाअखेरीपर्यंत मार्गी लावले जातील. मागील जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे तालुक्यातील काही गावे भूस्खलनात बाधित झाली आहेत. त्या बाधित गावांच्या पुनर्वसनासाठी पर्यायी जागा लवकरात लवकर शोधावी. कोरोनाच्या काळात शासनाने आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर दिला होता. राज्याच्या विकासाला गती देण्यात आली आहे. विकासकामे करताना त्याचा दर्जा उत्तम राखावा.’’

Ajit Pawar vs Raj Thackeray
'धर्मनिरपेक्षतेचा नारा देणारे काश्मिरी पंडितांच्या हत्येवर गप्प का?'

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘अजित पवार कायमच धरणग्रस्तांच्या पाठीशी उभे राहतात. धरणग्रस्तांच्या त्यागाचा सकारात्मक विचार केला जाईल. सिंचन, वीज व जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांना अजित पवार यांनी न्याय दिला आहे. उर्वरित प्रश्नही ते मार्गी लावतील.’’ गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले, ‘‘कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी यापूर्वी विक्रमसिंह पाटणकर व काही वर्षांत मी सातत्याने प्रयत्न केले आहेत. दोघांनीही पाठपुराव्यात सातत्य ठेवल्याने व प्रश्‍न शासन दरबारी मांडल्याने आज ते मार्गी लागत आहेत. अजित पवार यांच्यासमवेत प्रशासकीय बैठकाही घेतल्या. त्यांनीही सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यात यश आले.’’ डॉ. पाटणकर म्हणाले, ‘‘प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या. यापुढेही त्यासाठीचा लढा कायम राहील. शेवटच्या प्रकल्पग्रस्ताला न्याय मिळेपर्यंत श्रमिक मुक्ती दल हा लढा कायमचाच चालू ठेवेल. निर्वाह भत्त्यासाठी आम्ही आग्रही आहोत.’’ या वेळी खासदार पाटील, माजी मंत्री पाटणकर यांचीही मनोगते झाली. सचिव गुप्ता यांनी प्रास्ताविक केले. श्रमिक मुक्ती दलाचे चैतन्य दळवी यांनी स्वागत केले. महेश शेलार यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com