मुख्यमंत्र्यांना बिना आंघोळीचे आल्याशिवाय कळणार नाही : अजित पवार

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 जून 2019

''मुंबईत करोडो लोक राहतात. त्यांनी जरा कुठे पाणीपट्टी भरली नाही तर त्यांचे कनेक्शन कापले जाते. त्यानंतर त्यांना पैसे भरावे लागतात. त्यांना वाली कोणी नाही''

- अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते

मुंबई : मुंबई महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांची नावे डिफॉल्टर यादीत टाकली आहेत. ही नावे पाणीपट्टी भरली नसल्याने टाकण्यात आली आहेत. त्यामुळे आता या सर्व मंत्र्यांच्या बंगल्याचे पाणी तोडून टाका आणि त्यांना बिना आंघोळीचे विधानभवनात येऊ दे. त्याशिवाय यांना कळणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी आज (मंगळवार) टीका केली. 

माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महापालिकेकडून पाणी बिल थकबाकीदारांची माहिती मागितली होती. या माहितीच्या आधारे ही बाब समोर आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' बंगल्याचे तब्बल साडेसात लाखांचे पाणी बिल थकीत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने त्यांच्या बंगल्याला डिफॉल्टर यादीत टाकले आहे. मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांची 8 कोटी रूपयांची पाणी बिले थकीत आहेत.

त्यावर अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, ''मुंबईत करोडो लोक राहतात. त्यांनी जरा कुठे पाणीपट्टी भरली नाही तर त्यांचे कनेक्शन कापले जाते. त्यानंतर त्यांना पैसे भरावे लागतात. त्यांना वाली कोणी नाही, असे ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar Criticizes on Cm Devendra Fadnavis on Water Bill Pending Issue