Maharashtra Budget Session 2023: प्रश्नांची उत्तरे द्यायला मंत्रीच नाहीत, अजित पवार संतापले! म्हणाले, सार्वभौमत्वावर घाला... - | Ajit Pawar News | Breaking Marathi News| Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Budget Session 2023 News

Maharashtra Budget Session 2023: प्रश्नांची उत्तरे द्यायला मंत्रीच नाहीत, अजित पवार संतापले! म्हणाले, सार्वभौमत्वावर घाला...

Maharashtra Budget Session 2023: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. या अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली.

आज देखील सभागृहात प्रश्नांची उत्तरे द्यायला मंत्री उपस्थित नसल्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच संतापले. 

आज राज्याचे एक मंत्री बैठकीत व्यस्त असल्याने प्रश्न राखून ठेवण्याची वेळ विधानसभेच्या सभागृहात आल्यावर अजित पवार चांगलेच संतप्त झाले. विधिमंडळ सुरु असताना विधिमंडळाच्या कामकाजालाच मंत्र्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, चुकीचे पायंडे पाडून सभागृहाच्या सार्वभौमत्वावर घाला घालू नका, असे खडेबोल अजित पवार यांनी सरकारला सुनावले.(Latest Marathi News)

अजित पवार म्हणाले, राज्य मंत्रिमंडळातील एक मंत्री बैठकीत व्यस्त असल्यामुळे विधानसभेत आज प्रश्न क्रमांक दोन राखून ठेवण्याची नामुष्की सरकारवर आली आहे.

या गोष्टी सभागृहात वारंवार घडत आहेत. सभागृहाच्या प्रथा, परंपरा पायदळी तुडविण्याचे काम सुरु आहे. मंत्र्यांच्या अनुपस्थितीने प्रश्न राखून ठेवण्याचे समर्थन करता येणार नाही.(Marathi Tajya Batmya)

विधिमंडळाच्या इतिहासात मंत्री बैठकीत व्यस्त असल्यामुळे प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न राखून ठेवल्याचे यापूर्वी एकही उदाहरण नाही. त्यामुळे विधिमंडळ सुरु असताना विधिमंडळाच्या कामकाजालाच सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, अशी स्पष्टोक्ती अजित पवार यांनी केली.

अजित पवार म्हणाले, प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, ग्रामीण पाणी पुरवठा योजना यासारख्या सार्वजनिक बाबी सर्वसामान्य जनतेच्या रोजच्या जीवनात महत्त्वाच्या असतात. त्यामुळे थकीत वीज बिलांसाठी अशा सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींचा विद्युत पुरवठा खंडीत करु नये.

वीज बिलांसाठी या सार्वजनिक बाबींचा वीज पुरवठा खंडीत करण्याचे प्रकार वारंवार घडतात, त्यामुळे राज्य सरकारने याविषयी तातडीने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी देखीलअजित पवार यांनी केली.