
महाराष्ट्रात पुन्हा कोरोना निर्बंध लागणार? अजित पवारांचं मोठं विधान
एकीकडे महाराष्ट्रात मास्कसक्तीचा नियम हटवला आहे. तर दुसरीकडे राज्यातली कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. आता या पार्श्वभूमीवर राज्यातल्या निर्बंधांचं काय होणार? निर्बंध पुन्हा लागणार की आत्ता आहेत तेच कायम राहणार? असे प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित होत आहेत. याबद्दलच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.
पुण्यातल्या शिवाजीनगर इथल्या पोलीस मैदानावर महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित होते. त्यासह राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही हजेरी लावली होती. या कार्यक्रमानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला आणि राज्यात कोरोना निर्बंध पुन्हा लागणार की नाही, याबाबतही भाष्य केलं आहे. राज्यातल्या उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनही यावेळी केलं.
राज्यातल्या कोरोना निर्बंधांबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले, "राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याबद्दल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा झाली. पुन्हा मास्क वापरायला सांगायचं की नाही, याबद्दलही चर्चा झाली. सध्या लोकांना मास्क वापरायचं आवाहन करत आहोत पण मास्क वापरणं ऐच्छिकच आहे. याबाबत टास्क फोर्स आणि तज्ज्ञांचा सल्ला घेत आहोत. जर रुग्णसंख्येचं प्रमाण वाढत राहिलं आणि टास्क फोर्सनं सूचना दिल्या तर काही निर्बंध लागू करावे लागतील."
Web Title: Ajit Pawar On Covid Restrictions In Maharashtra
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..