उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याने अजित पवारांचे बंड 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

राष्ट्रवादी कॉंग्रेसने महाविकास आघाडीकडे अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह तर धरला नाहीच, शिवाय या पक्षाने उपमुख्यमंत्रिपदासाठी देखील अजित पवारांऐवजी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नावाची शिफारस केली होती, त्यामुळे अजित पवार नाराज होते, अशी माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या बंडाला कारणीभूत ठरलेली जी अनेक कारणे सांगितली जातात त्यापैकी हे महत्त्वाचे कारण असल्याचे मानले जाते.

पक्षाने जयंत पाटीलांच्या नावाची शिफारस केल्यानंतर झाले होते नाराज 
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसने महाविकास आघाडीकडे अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह तर धरला नाहीच, शिवाय या पक्षाने उपमुख्यमंत्रिपदासाठी देखील अजित पवारांऐवजी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नावाची शिफारस केली होती, त्यामुळे अजित पवार नाराज होते, अशी माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या बंडाला कारणीभूत ठरलेली जी अनेक कारणे सांगितली जातात त्यापैकी हे महत्त्वाचे कारण असल्याचे मानले जाते. त्यामुळेच जयंत पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या सोबत अजित पवार यांची भेट घेत "उपमुख्यमंत्रिपद तुम्हीच स्वीकारा, पण परत या' अशी विनंती केल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. 

मुख्यमंत्रिपदासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये बेबनाव झाल्यानंतर उपमुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडली असल्याचे आता पुढे येऊ लागले आहे. अजित पवार यांना राष्ट्रवादीने उपमुख्यमंत्रिपद नाकारल्यानंतर नाराज झालेले अजित पवार थेट भाजपला जावून मिळाल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. 

अजित पवार यांची समजूत काढण्यासाठी दिलीप वळसे पाटील यांनी काल (ता. 23) ही अजित पवार यांची भेट घेतली होती. तर आज (ता. 24) सकाळीच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह दिलीप वळसे पाटील पुन्हा अजित पवार यांना भेटण्यासाठी चर्चगेट येथील त्यांच्या निवासस्थानी गेले होते. सुमारे अडीच तास अजित पवारांबरोबर या दोघांची चर्चा झाली. अजित पवारांनी स्वगृही परतावे यासाठी जयंत पवार यांनी त्यांची मिनतवारी केली. इतकेच नव्हे, तर महाविकास आघाडीतील उपमुख्यमंत्रिपददेखील त्यांनीच स्वीकारावे, अशी गळही घालण्यात आली. मात्र, अजित पवार हटून बसल्याने "राष्ट्रवादी'चे नेते परत फिरल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या भेटीनंतर सायंकाळी जयंत पाटील यांनी अजित पवारांना उद्देशून ट्‌विट केले. "आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक सदस्य आहात. आदरणीय पवार साहेबांच्या सावलीत आपण सगळेच वाढलो आहोत. मात्र, राज्याच्या हितासाठी भाजपसोबत न जाण्याचा निर्णय साहेबांनी घेतला आहे. साहेबांच्या या निर्णयाचा आदर ठेवून आपण परत यावे,' अशी भावनिक साद जयंत पाटील यांनी ट्‌विटच्या माध्यमातून घातली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar rebels for rejecting deputy chief minister