अजित पवार यांना सर्वाधिक मताधिक्य | Election Results 2019

ajit-pawar
ajit-pawar

बारामती शहर -  विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजित पवार १,६५,२६५ मतांचे विक्रमी मताधिक्‍य मिळवीत विजयी झाले. बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा विजय जल्लोष करीत साजरा केला. अजित पवार यांना १,९५,६४१; तर भाजपचे गोपीचंद पडळकर यांना ३०,३७६ मते मिळाली.

आज सकाळी आठ वाजल्यापासून वखार मंडळाच्या गोदामात मतमोजणीस प्रारंभ झाला. पहिल्या फेरीपासूनच अजित पवारांनी आघाडी घेण्यास सुरवात केली होती. मतमोजणीच्या सत्तावीस फेऱ्या झाल्या. यात प्रत्येक फेरीत पवारांनी मोठी आघाडी घेतली.

अजित पवार हे सातव्यांदा बारामतीचे आमदार म्हणून विधानसभेत नेतृत्व करणार आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच सर्व विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. यापूर्वी विरोधकांना त्यांचे डिपॉझिट शाबूत राहण्याइतपत मते मिळत होती. मुख्यमंत्र्यांनी स्वतः पडळकरांना भाजपमध्ये प्रवेश देत बारामतीतून उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी बारामतीबाहेरचा दिलेला उमेदवार बारामतीकरांनी मान्य केला नाही. देशात व राज्यात कसल्याही लाटा आल्या, तरी बारामतीकर पवार कुटुंबीयांसोबतच असतात, या इतिहासाची आजच्या निकालाने पुनरावृत्ती झाली.

त्या वेळीच बारामतीकरांचं ठरलं होतं...
निवडणूक प्रचार काळात ‘आमचं ठरलंय’ ही विरोधकांची स्लोगन चर्चेत होती. त्याचवेळी बारामतीकरांचही ठरले होतं, हे आता स्पष्ट झाले. उमेदवारी अर्ज दाखल करून राज्यातल्या प्रचाराला निघून गेलेल्या अजित पवार यांनी बारामतीत थेट सांगता सभेलाच हजेरी लावली  होती.  ४ ऑक्‍टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करून कण्हेरीत प्रचाराची एक सभा घेत अजित पवार राज्यात प्रचाराला निघून गेले, ते थेट १९ ऑक्‍टोबरला सांगता सभेसाठीच बारामतीत परतले. 

दरम्यानच्या काळात पवार कुटुंबीयांतील सुनेत्रा पवार, शर्मिला पवार, पार्थ व जय पवार यांच्यासह ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीची धुरा खांद्यावर घेतली. गावोगावी कोपरासभा, पदयात्रा, घरोघर जाऊन मतदारांच्या गाठीभेटी, मेळावे या  माध्यमातून त्यांनी मतदारांशी संपर्क साधला.

गेल्या सर्व निवडणुकींहून अधिकचे मताधिक्‍य देत बारामतीकरांनी माझ्यावर जे प्रेम दाखवले आहे, त्याबद्दल मी सर्वांचा कृतज्ञ आहे. बारामतीकरांच्या विश्वासाला पात्र राहून विकासाची प्रक्रिया अधिक वेगाने पुढे नेण्याचा माझा प्रयत्न असेल. एक लाखाहून अधिक मताधिक्‍य मिळण्याची शरद पवार यांच्यापासून जी परंपरा चालत आलेली आहे, तीच परंपरा बारामतीकरांनी कायम ठेवत मला सातव्यांदा विधानसभेत काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मतदारांचे मी आभार व्यक्त करतो. 
- अजित पवार,  नवनिर्वाचित आमदार, बारामती

निवडणुकीअगोदरच नांगी टाकली
चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीअगोदरच बारामतीची जागा जिंकणे हे दिवास्वप्न आहे, असा उल्लेख केल्याने कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खच्ची झाले. स्थानिक उमेदवार दिला गेला असता, तर किमान डिपॉझिट तरी वाचले असते. मात्र, वरिष्ठ नेतृत्वाने उमेदवार लादल्याने भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com