आरक्षण हा मानसिक रोग; नाट्यसंमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांचे भाषण

Premanand Gajvi
Premanand Gajvi

कलारसिकांना प्रणाम!
हे नाट्य संमेलन आहे आणि तरीही मी नाट्य रसिकांना प्रणाम असं म्हटलेलं नाही तर कला रसिकांना प्रणाम असं म्हटलेलं आहे. कारण नाटक ही कला जगातील सर्व कलांना आपल्या हृदयात स्थान देते. स्थापत्यकला, शिल्पकला, चित्रकला, नृत्यकला, संगीतकला आणि वाङ्‌मयकला. वाङ्‌मयकलेत कविता, कथा, कादंबरी, नाटक या कलांचा समावेश होतो. कविता, कथा, कादंबरी, नाटक यांना साहित्य मानण्याचा प्रघात असला तरी मी कलाच मानतो आणि म्हणून सर्व कलारसिकांना पुन्हा एकदा प्रणाम करतो!

हे ९९ वे अ. भा. मराठी नाट्य संमेलन शंभरीच्या वळणावर उभे आहे, एक वळणदार वळण घेण्यासाठी. अशा या वळणदार नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवताना मला मनस्वी आनंद होतो आहे. आणि या क्षणी, माझ्या नजरेसमोर ते पहिलं-वहिलं नाट्यसंमेलन उभं राहिलं आहे, जे मुंबईत इ.स. १९०५ साली संपन्न झालं होतं. ज्याचे अध्यक्ष होते मा. ग. श्री.खापर्डे. आणि स्वाभाविकच आठवतात नंतरचे अध्यक्ष न. चि. केळकर, गिरिजाबाई केळकर. आठवतात बालगंधर्व, आठवतात अत्रे, आळतेकर, पु. ल. देशपांडे, शिरवाडकर, कानेटकर, विजयाबाई आणि लक्षात येतं, अरे असं कसं झालं? महत्त्वाची नावं या संमेलनाच्या अध्यक्षपदापासून दूर कशी राहिली? विजय तेंडुलकर, निळू फुले, डॉ. श्रीराम लागू, गो.पु. देशपांडे, जब्बार पटेल, सतीश आळेकर, महेश एलकुंचवार, सत्यदेव दुबे, अमोल पालेकर... हा प्रायोगिक रंगभूमी विरुद्ध व्यावसायिक रंगभूमी असा सुप्त संघर्ष म्हणायचा की आपल्या एकूणच खुज्या आकलनाचा परिणाम! संमेलनाचा अध्यक्ष तोच होऊ शकतो जो परिषदेचा सदस्य आहे; पण असे नामवंत परिषदेचे सदस्य का बरे होत नाहीत?

नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड जाहीर झाली तेव्हा पत्रकार मित्रांनी एक प्रश्न विचारला होता, ‘‘नाट्यसंमेलन कुठं झालं तर अधिक आनंद होईल?’’ मी म्हटलं होतं, ‘‘भारतात कुठंही. कारण हे अखिल भारतीय नाट्यसंमेलन आहे.’’ पण नागपूरकरांची इच्छाशक्ती इतकी प्रबळ की त्यांनी वेगवेगळ्या संस्थांचं प्रतिनिधित्त्व करणाऱ्या रंगकलावंतांना निमंत्रित करून, सगळ्यांना या इथं नागनगरीत आणलं आहे. त्यांच्या या कल्पकतेला आणि कष्टसाध्य सिद्धतेला माझा सलाम. हे संमेलनस्थळ माझ्यासाठी दुहेरी आनंद देणारं आहे. आता मी मुंबईकर असलो तरी माझ्या आयुष्याची काही वर्ष या नागनगरीत गेली आहेत. या नगरीतून मुक्त वावरलो आहे. रस्त्यांशी हितगुज केले आहे. मॉरिस कॉलेजमध्ये शिकताना एक मोठं व्यक्तिमत्त्व काव्यकार शरदचंद्र मुक्तिबोध यांचा विद्यार्थी होण्याची संधी लाभली आहे.   

नागपूर...  नागविदर्भ... मी नागभूमीचं लेकरू. नागपूर शहराचा इतिहास इथं सांगण्याची गरज वाटत नाही; पण संत्र्याचं शहर म्हणून प्रसिद्ध असलेलं हे नागपूर राजा बख्त बुलंद शाह याने वसवलं अाहे, अशी माहिती मिळते आणि रघुजी राजे भोसले नाव तर नागपूरकरांच्या मनात रुजलेले आहेच; पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरविषयी जे वर्णन केलं आहे, ते मोठं मनोज्ञ आहे. ते म्हणतात, ‘‘नाग लोकांची मुख्य वस्ती नागपूर येथे व आसपास होती. म्हणून या शहरास ‘नाग-पूर’ म्हणजे नागाचे गाव असं म्हणतात. येथून २७ मैलांवर नागार्जुनाची टेकडी आहे. नजीकच वाहणारी जी  नदी आहे ती नागनदी. अर्थातच या नदीचे नाव येथे राहणाऱ्या लोकांवरून पडले आहे. नागांच्या वस्तीमध्ये वाहणारी जी नदी ती नागनदी आहे.’’ (रायटिंग अँड स्पिचेस, खंड १८, भाग ३, पृष्ठ ५१५ महाराष्ट्र शासन -२००२) अशा या शहरापासून काही अंतरावर माझं गाव कारगाव आहे. तसा माझा जन्म चंद्रपूर जिल्ह्यात आजोळी पिंपळगाव येथे झालेला. आजोळ शेतकरी कुटुंब आणि आम्ही तर शेतकरीच. आठ बैलांची शेती. गोठे सदैव जनावरांनी भरलेले. रम्य ते बालपण. (पण ते बालपण आता गोसीखुर्दच्या धरणात बुडालं आहे.) गावी सिनेमाच्या चालीवर गाणी रचली. गायिली. कव्वालीचे सामने केले. तोंडाला रंग लावून रंगमंचावर अभिनय केला. हा वारसा माझे वडील शंकरजींकडून माझ्याकडे आला असावा. वडील दंडार हा लोककला प्रकार खेळायचे. आज मी नाटककार म्हणून प्रसिद्ध आहे; पण मी कविता लिहिली. आता ती ‘एकतारी’ म्हणून प्रसिद्ध आहे. ‘लागण’ आणि ‘ढीवर डोंगा’ हे कथासंग्रह आणि ‘जागर’ व ‘हवे पंख नवे!’ अशा कादंबऱ्या. हे आपलं सहज माहितीसाठी सांगितलं. 

आणखी एक मी सांगितलं पाहिजे. माझे गुरू दोन. एक डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे तथागत बुद्ध. दोघंही ज्ञानदर्शी. या दोघांचं बोट धरून माझं बालपण विकसित झालं. बहरत आलं. परिणामी घराबाहेर मला धर्माची गरज लागत नाही. कारण, माझ्या देशाचं संविधान धर्मनिरपेक्षता हे तत्त्व घेऊन उभं आहे आणि हे तत्त्व मी मानतो. पण... 
भारत माझा देश आहे 
सारे भारतीय माझे बांधव आहेत 
बालभारतीच्या पानापानात 
आणि काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत 
जातीयतेच्या रक्तपितीने सडलेल्या भारता 
खरं सांगू
तुझी संस्कृतीचं किडलेली आहे मुळापासून 

या अशा ओळी गरगरत समोर येतात... ‘घोटभर पाणी’मधील या ओळी माझ्या मेंदूचा ताबा घेतात. मेंदू सैरभैर होतो. मी लेखक कलावंत आहेच; पण सोबतच मी या देशाचा एक नागरिकही आहे. देशात घडणाऱ्या आणि घडलेल्या सर्व घटनांचे तीव्र आघात माझ्या मेंदूवर होत असतात आणि मेंदू भूतकाळाचाही धांडोळा घेऊ लागतो. जगाच्या इतिहासात सिंधू नदीच्या परिसरात बसवलेली सिंधू संस्कृती जी, जगश्रेष्ठ होती, ती अचानक कशी नष्ट होते? चाळीस फूट जाड भिंतीच्या आत वसवलेली सुविहित नगरं कशी नष्ट होतात? वैदिक काळ येतो. वेदाची रचना होते. पुरुषसुक्त रचलं जातं.. 
'ब्राह्मणोस्य मुखमासीद बाहु राजन्य: कृत:
ऊरू तदस्य यद्वैश्य: पदभ्यां शूद्रो अजायत।।’

आणि माणूस चार वर्णात विभाजित केला जातो आणि एक माणूस दुसऱ्या माणसाला तुच्छ लेखू लागतो. बुद्ध येतो. आणि मग शांततेचं गाणं गात समता येते. महावीर येतो. अहिंसेला साद घालतो. शक, हुण, मोंगल, इंग्रज येतात. आक्रमणं करतात. आणि या भूमीला गुलाम करतात. आणि गुलामीची जाणीव होताच मग १८८५ साली स्वातंत्र्याची चळवळ उभी राहते. देश स्वतंत्र होतो. आणि वाटत राहतं देश,देशातील जनता विवेकाची कास धरील पण देशाला वेगळाच अनुभव येतो.

नथुराम गोडसे या हिंदूराष्ट्रवादी व्यक्तीनं महात्मा म्हणून गौरविलेल्या गांधींच्या छातीत पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या आणि गांधींचा खून केला.त्याचा सूड, गोडसे हा खुनी ब्राह्मण जातीचा असल्यामुळे ब्राह्मणांची घरे जाळून घेतला गेला. देश स्वतंत्र झाला आणि अवघ्या पाच महिने पंधरा दिवसांत सामूहिक विवेकाचा बळी गेला.

इंदिरा गांधी यांचा खून दि. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी बियांतसिंग आणि सतवंतसिंग यांनी स्टेनगनमधून गोळ्यांचा वर्षाव करून केला. हे दोघंही इंदिराजींचे बॉडीगार्ड. धर्मानं शीख म्हणताच असंख्य शिखांचं शिरकाण करण्यात आलं. इथंही विवेकाचाच बळी गेला. इ.स. २००२ साली गोध्रा येथे मुस्लिमांचं शिरकाण करणाऱ्या दंगली आणि भीमा कोरेगावला दि. १ जानेवारी २०१८ रोजी पूर्वजांच्या पराक्रमाला अभिवादन करायला जाणाऱ्या बौद्ध समाजावर होणारे प्राणघातक हल्ले किंवा घरात मांस सापडले नि ते गाईचेच आहे हे ठरवून झुंडीनं घेतलेला ‘तो’ दादरीतला बळी. सतत भय! भय दाखवलं की भीतीनं माणसं गोठून जातात. जिवंत माणसं जिवंत मढी हाेऊन जातात. आणीबाणीच्या काळात हाच अनुभव आला आणि बाबरी मशीद पाडली तेव्हाही. सर्वत्र झुंडी फिरताहेत मोकाट. आता तर नवंच भय पेरलं जातंय मनामनांत! शहरी नक्षलवाद! मी शहरात राहतो नि माझ्याजवळ नक्षली विचारांचं साधं पत्रक सापडलं तरी मला केव्हाही शहरी नक्षलवादी ठरवला जाईल. असे हे आमचे राज्यकर्ते, ज्यांना आम्हीच निवडून दिलं. ही आमचीच माणसं पण कळत नाही प्रजेशी अशी का वागतात ते! बिचारी गरीब प्रजा... 

हं, ते एक बरं झालं गरीब प्रजेवरून आठवलं. आमची प्रजा मुळीच गरीब असू नये असं मध्यंतरी राजाला वाटलं. राजानं फर्मान काढलं. दिवसाला बत्तीस रुपये कमावणारा माणूस गरीब असणार नाही. गरिबाला मोठा आनंद झाला. नेहमीप्रमाणे तो कामावर गेला. दिवसभर काम केलं. संध्याकाळी तो गरीब घराकडे निघाला. थकला होता दिवसभर काम करून. रस्त्यानं चालत असताना त्याला एक हॉटेल दिसलं. चहा प्यायची इच्छा झाली. तो हॉटेलात शिरला. चहा प्यायला. वेटरनं बिल दिलं आणि मग ते त्या गरिबानं काऊंटरवर दिलं. चहा घेतल्यामुळे त्याला तरतरी आलीच होती. तो तडक घरी आला. त्याची बायको घरी त्याचीच वाट पाहत होती. नवरा घरी येईल, पैसे देईल मग मी स्वयंपाकाची तयारी करीन. तिनं नवऱ्याला पैसे मागितले. नवऱ्यानं खिशात हात घातला. जीएसटीसकट चहाचं ३१ रुपये झालेलं बिल देऊन, उरलेला एक रुपया त्यानं बायकोसमोर धरला. त्याची ती बायको आणि तिच्या पदराला धरून उभी असलेली ती दोन चिमुकली पोरं त्या गरिबाच्या हातातील रुपयाकडे नुसती पाहत राहिली. ती बाई म्हणत राहिली, ‘‘राजा भिकारी...’’

आमचं सरकार वृद्धापकाळामुळं थकलेल्या साहित्यिक/कलावंतांना मानधन देते. क श्रेणी १५०० रुपये, ब श्रेणी १८०० रुपये आणि अ श्रेणी २१०० रुपये. या पैशात कलावंताचं महिन्याला लागणारं रेशन तरी येतं का? थकलेल्या कलावंतांचा असा अपमान कशासाठी? कलावंतांचा असा अपमान करून राज्यकर्त्यांना काय समाधान मिळतं बरं? पण, हा दोष राज्यकर्त्यांचा नाही. कलावंतही अनेक कारणांनी लाचार होतात. मान-सन्मान, प्रसिद्धी हवी असते. आसरा हवा असतो. आसरा हा शब्द ऐकायला बरा वाटत नाही. आपण राजाश्रय म्हणूया! हे बेश्‍ट्ट! आसरा-आश्रित-राजाश्रय या शब्दांचा आशय एकच असला तरी मनाला कसं बरं वाटतं! 

पूर्वी राजे कलेचे मोठे चाहते असत. सांगलीचे राजे पटवर्धनही तसेच. त्यांनी कुठंतरी कन्नड ‘यक्षगान’चा खेळ पाहिला आणि असाच मराठीत असायला हवा म्हणून ध्यास धरला. आता सांगली संस्थानात असा कोण कलावंत भेटेल जो त्यांचं काम करील? विष्णुदास भावे आणि भावेंनेही राजाचा शब्द पाळला. ‘यक्षगान’ कानडी लोककलाप्रकार; संगीत, नृत्य, संवादमिश्रित! अनुनयातून विष्णुदास भावेंनी ‘सीता स्वयंवर’ सिद्ध केलं. एक प्रकारचा संगीतीय खेळच! रामायणातील कथेतून काेरून काढलेला! राजे पटवर्धनांनी तो पाहिला. पसंत केला. आणि ते मराठीतलं पहिलं नाटक म्हणून मानलं गेलं. ते वर्ष होतं १८४३... ‘सीता स्वयंवर’ हे मराठीतलं पहिलं नाटक म्हणून मान्यताही मिळाली आणि पुढं शोध लागला. १८४३ पूर्वीही मराठीत नाटकं लिहिली जात होती; पण ती तंजावरमध्ये; तेही इ.स. १६५०च्या कालखंडात. ‘लक्ष्मीनारायण कल्याणम्‌’ किंवा तत्सम पाचपंचवीस नाट्यकृतींच्या नोंदी मिळत असताना, या शहाजी राजे भोसलेंच्या नाटकाची दखल मराठमुलकी का नाही? विष्णुदास भावेंच्याही अगोदर १९३ वर्ष आधी, शहाजी राजे भोसले यांची नाटकं तंजावरमध्ये होत असली, प्रयोग दरबारात होत असले तरी आणि ते दरबारी लोकांनीच पाहिले असले तरी ती मराठी नाटकं होती. त्यांचे हे मराठी भाषा ऋण मान्य न करणे म्हणजे मराठी भाषाद्रोह होय.

मराठी नाटक जगाच्या पाठीवर कुठेही, कुणीही लिहिले असो, त्यांची प्रामाणिक नोंद आपण केली पाहिजे नि पहिलेपणाचा सन्मान दिला पाहिजे. उद्या इ.स. १६५०च्या आधी मराठी नाटक लिहिले असल्याचा पुरावा उपलब्ध झाला तर पहिलेपणाचा मान त्या लेखकाला दिला गेला पाहिजे. तरच मराठी नाट्यवाङ्‌मयाची मूळ रूपं आपल्या हाती येतील आणि ते किती जुनं आहे हेही कळेल.

आणखी एका महत्त्वाच्या नाटकाची नोंद घ्यायला हवी. जोतीराव फुले हे खरे क्रांतीविचारक, समाजधुरीण. त्यांनी नाटक लिहावं हेच आश्चर्यकारक  आहे. तेही स्वतंत्र. शेतकरी कुटुंबाला लुबाडणाऱ्या भटजीची काळी कृत्ये. सत्याची महती सांगणारं हे पहिलं प्रायोगिक नाटक. विदूषक या पात्राची यथोचित मांडणी. एकच नाटक लिहिलं तेही नाट्यतंत्रबद्ध; पण या नाटकाचा प्रयोगच झाला नाही. इ. स. १८५५ साली लिहिलेलं, ‘तृतीय रत्न’ हे नाटक १९७८ साली ‘सत्यशोधक’मध्ये प्रसिद्ध झालं तेव्हा कळलं महाराष्ट्राला. अशी लपलेली माणकं आपण शोधली पाहिजेत. या क्षणी आम्हाला सुप्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकरांनी ‘नाटककार’ म्हणजे काय याची व्याख्या केलीय, ती आठवते. ते म्हणतात, ‘‘जो या अवघड कलेच्या साधनेसाठी आयुष्याची उमेद वेचायला तयार असताे आणि या कलेद्वारे जो मानवी मनाची आणि जिण्याची लहानमोठी कोडी सोडवून दाखवण्याची जिद्द दाखवतो, तो नाटककार.’’ ‘तृतीय रत्न’ या व्याख्येत अलगद बसते. जोतीराव फुल्यांनी अधिक नाटकं लिहिली असती तर मराठी नाटक १९व्या शतकातच मोठं झालं असतं.

स्त्री नाटककारांविषयी खरं तर काय बोलायचं? काशीबाई फडकेंचं ‘संगीत सीताशुद्धी’ इ. स. १८८७ साली लिहिलेलं आणि साेनाबाई केरकराचं ‘संगीत छत्रपती संभाजी नाटक’ १८९४ साली लिहिलेलं. आणि स्वतंत्र लिहिलेलं हिराबाई पेडणेकरांचं नाटक ‘संगीत दामिनी.’ हे नाटक १९०८ साली लिहिलं गेलं. स्त्री नाटककारांचा सुरू झालेला प्रवास आपण थेट २०१९ सालापर्यंत पाहू शकतो. गिरिजाबाई केळकर, मालतीबाई बेडेकर, तारा वनारसे, शिरीष पै, सई परांजपे आणि तरुण उमेदीची मनस्विनी लता रवींद्र. अशी आणखी काही नावं दिसतात; पण एखाद दुसरंच नाटक त्यांच्या नावावर आहे. तेंडुलकरांनी केलेल्या ‘नाटककार’ या व्याख्येचा विचार करता स्त्री नाटककारांचं काय करावं, हा  प्रश्नही माझ्यासमोर आहे. पुरुष नाटककारांप्रमाणे चारचारच्या जोड्या पाडण्याची परंपरा स्त्री नाटककारांत अजून सुरूही होऊ शकली नाही. म्हणजे ‘The Sky is waiting for...’ असंच म्हटलं पाहिजे. 

कलेची जोपासना करायची तर आपल्या आजूबाजूचं वातावरणही मुक्त हवं असतं; पण तसं ते नसल्यामुळे स्त्री आपला विकास एका मर्यादेतच करू शकली आहे. या समाजानं तिला जो स्पेस दिला तो मर्यादित दिलेला आहे. आधुनिक काळात शिक्षणानं ती स्वत:च स्वत:चा स्पेस तयार करते आहे; पण मंदिराच्या पायरीवर अडखळते आहे. स्त्रीमुक्ती-स्त्रीमुक्ती असा टाहो कानी आदळत राहतो; पण मासिकपाळी विटाळमुक्ततेशिवाय स्त्री मुक्त हाेणे शक्य नाही. स्त्री विकासातील सर्व अडथळे स्त्रियांनीच पार करायला हवेत. पुरुषांची दया म्हणजे वाळवंटातील मृगजळ! देवही न्याय देऊ शकत नाही, तिथं पुरुष काय न्याय देतील! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com