esakal | राज्यातल्या जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित; आयोगानं दिलं 'हे' कारण
sakal

बोलून बातमी शोधा

Election

राज्यातल्या सर्व पोटनिवडणुका स्थगित; आयोगानं दिलं 'हे' कारण

sakal_logo
By
विनायक होगाडे

मुंबई: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोटनिवडणुका स्थगित करण्यात याव्यात, अशी मागणी एका पत्राद्वारे राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे केली होती. या मागणीनुसार, निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या आहेत. पंचायत समिती आणि पाच जिल्हापरिषदांच्या निवडणुका प्रस्तावित होत्या. मात्र, कोरोनाचं संकट आणि ओबीसी आरक्षणाचा पेच या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, आता या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.

तिसऱ्या लाटेची आणि डेल्टा प्लसचा मोठ्याप्रमाणावर प्रसार होण्याची भिती लक्षात घेऊन राज्यातील 5 जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया शुक्रवारी आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.

निवडणूक आयुक्त मदान यांनी सांगितलंय की, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदांमधील 70 निवडणूक विभाग आणि 33 पंचायत समित्यांमधील 130 निर्वाचक गणांमधील पोटनिवडणुकांसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान होणार होतं. मात्र, 7 जुलै 2021 रोजी राज्य शासनाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं होतं. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुका स्थगित करण्याची विनंती सरकारने राज्य निवडणूक आयोगाला केली होती. निवडणुका आज आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या असल्याने या पोटनिवडणुकांसाठी लागू असलेली आचारसंहितादेखील आजपासून शिथिल करण्यात आली आहे. कोरोनाची परिस्थिती सुधारल्यावर या पोटनिवडणुकांचे उर्वरित टप्पे पार पाडण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगातर्फे घोषणा करण्यात येईल, असेही मदान यांनी स्पष्ट केलंय.

loading image