अख्खा महाराष्ट्र रेड झोनच ! 19 जिल्ह्यांना दुसऱ्या लाटेची भिती; 1918 मध्ये स्पॅनिश फ्ल्यूची आली होती दुसरी लाट

तात्या लांडगे
Friday, 13 November 2020

दुसरी लाट थोपविण्याची तयारी...

  • दहा लाख लोकसंख्येमागे दररोज 140 टेस्ट व्हाव्यात छोटे व्यावसायिक, घरगुती सेवा पुरवठादार, वाहतूकदार, मजुरांवर राहणार वॉच
  • समूह सर्व्हेक्षण, संशयितांची टेस्ट एकत्रित करण्यावर द्यावा भर
  • फटाक्‍याच्या धुरामुळे श्‍वसनाचा होऊ शकतो त्रास; फटाके उडविण्यावर असावी बंदी
  • को-मॉर्बिड रुग्णांची करावी साप्ताहिक तपासणी; को-मॉर्बिडिटी क्‍लिनिक उभारावे
  • एकूण टेस्टिंगमध्ये 7 टक्‍क्‍यांहून अधिक रुग्ण आढळल्यास गरजेनुसार तयारी ठेवावीत हॉस्पिटल्स

सोलापूर : राज्यात सध्या 84 हजारांपर्यंत ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या असून मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, नाशिक, नांदेड, उस्मानाबाद, बीड, अमरावती, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, पालघर, जळगाव, औरंगाबाद या जिल्ह्यांमधील ऍक्‍टिव्ह रुग्णसंख्या एक हजार ते 15 हजारांपर्यंत आहे. या जिल्ह्यांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सर्वाधिक भिती असून उर्वरित जिल्ह्यांतील नागरिकांनी नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे. दरम्यान, आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी दुसरी लाट थोपविण्यासाठी ऍक्‍शन तयार केला असून त्यानुसार ठोस उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

 

'यांच्या' माध्यमातून वाढू शकतो प्रादुर्भाव
छाटे व्यावसायिक (किरणा दुकानदार, भाजी विक्रेते, पथ विक्रेते, हॉटेल, वेटर्स), घरगुती सेवा पुरवठादार (गॅस सिलेंडर पुरवठादार, मोलकरणी, लॉन्ड्री, इस्त्रीवाले, पुरोहित), वाहतूक पुरवठादार (माल वाहतूकदार, रिक्षा चालक), मजूर (हमाल, रंगकाम, बांधकाम कामगार, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील चालक- वाहक) आणि आवश्‍यक सेवा देणारे शासकीय व निमशासकीय कर्मचारी, होमगार्ड यांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, अशी शक्‍यता सार्वजनिक आरोग्य विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे यांचे सामुहिक सर्व्हेक्षण करावे, त्यांची कोरोना टेस्ट करुन घ्यावी, अशा सक्‍त सूचना ऍक्‍शन प्लॅनच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.

 

दुसरी लाट थोपविण्याची तयारी...

  • दहा लाख लोकसंख्येमागे दररोज 140 टेस्ट व्हाव्यात छोटे व्यावसायिक, घरगुती सेवा पुरवठादार, वाहतूकदार, मजुरांवर राहणार वॉच
  • समूह सर्व्हेक्षण, संशयितांची टेस्ट एकत्रित करण्यावर द्यावा भर
  • फटाक्‍याच्या धुरामुळे श्‍वसनाचा होऊ शकतो त्रास; फटाके उडविण्यावर असावी बंदी
  • को-मॉर्बिड रुग्णांची करावी साप्ताहिक तपासणी; को-मॉर्बिडिटी क्‍लिनिक उभारावे
  • एकूण टेस्टिंगमध्ये 7 टक्‍क्‍यांहून अधिक रुग्ण आढळल्यास गरजेनुसार तयारी ठेवावीत हॉस्पिटल्स

 

राज्यातील 46 हजारांपर्यंत रुग्ण कोरोनाचे बळी ठरले आहेत. आतापर्यंत एक कोटी 56 हजार संशयितांची कोरोना टेस्ट पार पडली. त्यात 17 लाख 40 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. मार्चपासून अद्यापही महाराष्ट्र रेड झोनमध्येच असून अनलॉकनंतर बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भिती व्यक्‍त होत आहे. कोरोनावर अद्याप लस निघालेली नाही. मास्क, सोशल डिस्टन्सिंगद्वारे कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न आतापर्यंत झाला आहे. मात्र, अनलॉकनंतर आता सर्व व्यवहार पूवर्वत झाले असून बाजारपेठांमध्ये, वाहनांमध्ये गर्दी वाढू लागली आहे. तत्पूर्वी, 1918 मध्ये स्पॅनिश फ्ल्यूची सहा महिन्यानंतर दुसरी लाट आली होती. त्यावेळी अनेकजण त्या विषाणूचे बळी ठरले होते. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता म्हणून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी विनाकारण जाणे टाळावे, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. सोशल डिस्टन्स ठेवावा, हात, कपडे स्वच्छ धुवावेत, घरातील को- मॉर्बिड व्यक्‍तींसह लहान मुलांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

नियमांचे पालन करावे; 1918 मध्ये दुसऱ्या लाटेचा आला अनुभव
स्पॅनिश फ्ल्यूची 1918 मध्ये सहा महिन्यानंतर दुसरी लाट आली होती. तो अनुभव पाहता कोरोनाची दुसरी लाट आता येऊ शकते. त्यामुळे सणासुदीत सर्वांनी गर्दी न करता नियमांचे पालन करणे, हाच ठोस उपाय ठरेल.
- डॉ. तात्याराव लहाने, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All Maharashtra Red Zone! 19 districts fear second wave; In 1918 came the second wave of the Spanish flu