पावले थांबली; पण इरादा बुलंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

‘‘कोरोनाशी मुकाबला करताना आपण आता अधिक खंबीर पावले टाकत आहोत. हा रोग समाजात पसरण्याच्या आत रोखणे महत्त्वाचे आहे, सर्वांत कठीण काळ आता सुरू झाला आहे.

मुंबई - ‘‘कोरोनाशी मुकाबला करताना आपण आता अधिक खंबीर पावले टाकत आहोत. हा रोग समाजात पसरण्याच्या आत रोखणे महत्त्वाचे आहे, सर्वांत कठीण काळ आता सुरू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात ३१ मार्चपर्यंत जमावबंदी (१४४ कलम) लावण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्याला संबोधून केलेल्या थेट प्रसारणात केली. मात्र, यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता निश्चय, संयमाने शासनाच्या बरोबरीने याचा मुकाबला करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यातील परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. रेल्वे मंत्रालयाने आज देशभरातील रेल्वे व उपनगरीय सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमांतून लगेचच राज्यातील जनतेशी संवाद साधला व राज्य शासन पुढील परिस्थिती हाताळण्यास खंबीर आहे, याची ग्वाही दिली.

‘‘राज्यात १४४ कलम लागू करण्यात येत आहे. रेल्वे, खासगी आणि एस. टी. बस बंद करण्यात येत आहेत, लोकल सेवाही बंद करण्यात आली आहे. फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांना प्रवास करता यावा म्हणून शहरांतर्गत बस सेवा सध्या सुरू राहील. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, भाजीपाला, औषधी, वीजपुरवठा करणारी केंद्रे सुरूच राहतील,’’ हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, वित्तीय सेवा देणाऱ्या शेअर बाजार आणि बँकांसारख्या संस्थाही सुरूच राहतील. तसेच शासकीय कार्यालयात आता २५ टक्के उपस्थिती होती. ती आता केवळ ५ टक्के करण्यात येत आहे.

बाहेर फिरू नये
विलगीकरण कक्षात असलेल्या नातेवाइकांची काळजी करण्याची गरज नाही, त्यांची काळजी सरकार आणि महापालिका घेत आहे, परंतु परदेशातून ज्या व्यक्तींना घरात क्वारंटाइन होण्यास सांगितले आहे, त्यांनी घरात स्वत:ला क्वारंटाइन करून घेणे गरजेचे आहे. आपल्या कुटुंबीयांपासूनही स्वत:ला दूर करण्याची गरज आहे. त्यांच्या हातावर शिक्के मारले आहेत. त्यांनी बाहेर समाजात किंवा घरातल्या लोकांमध्ये मिसळून प्रादुर्भाव वाढवू नये. किमान १५ दिवस बाहेर जाऊ नये, आपल्या प्रिय व्यक्तींपासून ही दूर राहावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

Video : पुणेकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

यंत्रणेत काम करणारी ही माणसेच आहेत, याची जाणीव करून देताना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणेवरचा ताण न वाढवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. ही शांतता आणि संयम आपल्याला ३१ तारखेपर्यंत ठेवायची आहे, असेही त्यांनी सांगितले.

हे सुरू राहणार
औषधे, भाजीपाला, किराणा दुकाने, बँका, धान्याची दुकाने, प्रसारमाध्यमे
जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा

जीवनावश्यक वस्तूंचा  पुरेसा साठा ः उद्धव ठाकरे
‘‘जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आपल्याकडे आहे, त्याची अजिबात कमतरता नाही. तसेच ही दुकाने किंवा या सेवा बंद राहणार नाहीत. त्यामुळे त्याचा साठा करून ठेवू नका. अजिबात घाबरून जाऊ नका,’’ असेही मुख्यमंत्री म्हणाले. जनतेला पुन्हा एकदा मनापासून सहकार्य करण्याचे, शिस्त पाळण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All urban areas of Maharashtra on March 31