
डॉ. आंबेडकरांचा वारसा ‘सिद्धार्थ’मध्ये जतन!
मुंबई : वंचितांना न्यायहक्क मिळवून देणाऱ्या घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेची मूळप्रत मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयात जतन करून ठेवण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिल्यानंतर त्याच्या प्रती घटना समितीच्या सदस्यांना दिल्या होत्या. दरम्यान, बाबासाहेबांनी त्यांच्याकडील प्रत सिद्धार्थ महाविद्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी शां. श. रेगे हे ग्रंथपाल होते. त्यांच्या निवृत्तीनंतर श्रीकांत तळवलकर यांनी ही प्रत आणि इतर साहित्यांचा अनमोल ठेवा जतन करून ठेवला आहे. त्यात बाबासाहेबांच्या स्वाक्षरीची लहान मूळप्रत आणि एक मोठी प्रत अद्यापही महाविद्यालयात आहे.
ऐतिहासिक ग्रंथसंपदा
सिद्धार्थ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले ग्रंथ, नोंदवही तसेच त्यावर बाबासाहेबांनी स्वतः केलेल्या स्वाक्षरीही आहेत. अकबराच्या नऊ रत्नांपैकी एका रत्नाचे हस्तलिखित ग्रंथ, शिवाय हिंदीतील कविता, संस्कृत वाक्यांचा हिंदी अर्थाचे हस्तलिखित जतन करण्यात आले आहे. यापैकी अनेक पुस्तके आणि साहित्य महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाला दिले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन यांनाही अनेक ग्रंथसाहित्य दिल्याचे सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्राध्यापक विजय मोहिते सांगतात.
बाबासाहेबांची अनेक दुर्मिळ पुस्तके आमच्या ग्रंथालयात आहेत. तसेच त्यांची हस्तलिखिते, हिंदी काव्य, टाचणे, उतारे संग्रही आहेत. त्यापैकी बहुतांश साहित्य शासनाकडे सुपूर्द केले असून त्याचे प्रकाशनही झाले आहे. देशपरदेशातून अभ्यासक संदर्भासाठी महाविद्यालयात येत असतात.
- डॉ. अशोक सुनतकरी, प्राचार्य
संविधानाची मूळप्रत हा अनमोल ठेवा आहे. तो सुरक्षित ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. ग्रंथपाल असताना त्याला काचेचे आवरण करण्याची सूचना व्यवस्थापनाकडे केली होती; मात्र दरम्यानच्या काळात ते शक्य झाले नाही.
- श्रीकांत तळवलकर, निवृत्त ग्रंथपाल
Web Title: Ambedkar Legacy Preserved Siddharth Signed Copy Constitution Safe College
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..