शिवसेनेच्या विधानपरिषद सदस्यांना मंत्रिमंडळात 'नो एन्ट्री'

शिवसेनेच्या विधानपरिषद सदस्यांना मंत्रिमंडळात 'नो एन्ट्री'

मुंबई : महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या विधानपरिषदेतील सदस्यांचा समावेश करण्याचे कटाक्षाने टाळल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अष्टप्रधान मंडळातील सुभाष देसाई आणि मुंबईतील विश्‍वासू आमदार ऍड. अनिल परब यांचा केवळ अपवाद केल्याची बाब समोर आली आहे. 

सन 2014 साली शिवसेना भाजप युतीची सत्ता आल्यानंतर शिवसेनेला मिळालेल्या कॅबिनेट मंत्रयांमध्ये एकनाथ शिंदे वगळता अन्य मंत्री विधानपरिदेतील सदस्य होते. दिवाकर रावते, सुभाष देसाई, डॉ.दिपक सावंत, रामदास कदम हे नेते कॅबिनेट मंत्री झाल्यामुळे विधानपरिषदेत निवडून आलेले आमदार नाराज होते. त्यामुळे विधानपरिषद सदस्य डॉ. निलम गो-हे यांची विधानपरिषदेचे उपसभापती पदावर नियुक्‍ती करण्यात आली. त्यामुळे शिवसेनेच्या प्रत्येक बैठकीत याबाबत उघडपणे आमदार नाराजी व्यक्‍त करत होते. त्यामुळे यंदाच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानपरिषदेतील आमदारांना कटाक्षाने टाळण्यात आले आहे.

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेच्या 11 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रयांचा समावेश झाला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत सुरूवातीपासून साथ दिलेले सुभाष देसाई तसेच अनिल परब यांचा अपवाद वगळता रामदास कदम, दिवाकर रावते, तानाजी सावंत यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संधी नाकारली आहे. त्याऐवजी आदित्य ठाकरे, बच्चू कडू, राजेंद्र यड्रावकर, शंकरराव गडाखसंदीपान भुमरे अशा नव्या चेह-यांना संधी देण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये संजय राठोड, दादा भुसे,गुलाबराव पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपदावर वर्णी लावत ठाकरे यांनी त्यांच्यावरील विश्‍वास व्यक्‍त केला आहे. कॉंग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेल्या अब्दुल सत्तार यांना मराठवाडयाच्या दृष्टिने राज्यमंत्री म्हणून समावेश केला असून शंभूराज देसाई आणि राजेंद्र यड्रावकर यांना संधी देत पश्‍चिम महाराष्ट्रातील अनुशेष दूर करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांना मंत्रीमंडळात प्रादेशिक आणि सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला असताना शिवसेनेच्या दृष्टिने अत्यंत महत्वाची असलेल्या मुंबईलाही न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री स्वतःच मुंबईतील असून त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे मंत्रीमंडळात महत्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यांच्या जोडीला सुभाष देसाई आणि ऍड. अनिल परब काम करणार आहे. 

सत्तेसाठी आलेले मंत्रीपदापासून लांब 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत दाखल झालेले उदय सामंत आणि अब्दुल सत्तार वगळता दिग्गज नेते यंदाच्या सत्तेपासून लांब राहिले आहेत. राष्ट्रवादीत मंत्रीमंत्रीपद भूषविलेले सचिन अहिर, भास्कर जाधव यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले नाही. तसेच गेल्या मंत्रीमंडळात असलेल्या तानाजी सावंत आणि दिपक केसरकर यांना नारळ दिला आहे. हे दोघेही नेते राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेले होते. 

WebTitle : analysis of maharashtra cabinet expansion and candidate selection of shivsena

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com