Andheri by election : राज ठाकरेंचं पत्र की... या पाच कारणामुळे भाजपने घेतली माघार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Andheri by election : 'राज ठाकरेंचं पत्र की...?' या 5 कारणामुळे भाजपाची माघार

Andheri by election : 'राज ठाकरेंचं पत्र की...?' या 5 कारणामुळे भाजपाची माघार

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडल्यानंतर सोमवारी सकाळी भाजपाने या निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केलीये. मात्र, भाजपाने माघार का घेतली, यात भाजपामधील अंतर्गत मतभेद वाढल्याचे दिसून येते का, याचा घेतलेला आढावा... (Andheri East Bypoll Why did BJP withdraw murji patel devendra fadnavis)

१. मुरजी पटेल यांची उमेदवारी

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके विरुद्ध भाजपा- शिंदे गटाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यात प्रमुख लढत होती. या मतदारसंघात सुमारे एक लाख मराठी मतदार आहेत. मुरजी पटेल यांची उमेदवारी वादाच्या भोवऱ्यात होती. उद्धव ठाकरे गटाकडून मुरजी पटेल यांचा उल्लेख ‘भ्रष्टाचारी’ असा केला जात होता. एमआयडीसीतील पात्र लोकांच्या घरावर पटेल यांनी डल्ला मारल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. निवडणुकीत या मुद्दयावरुन ठाकरे गट मुरजी पटेल यांना लक्ष्य करणार हे स्पष्ट होते. याशिवाय पटेल यांच्या उमेदवारी अर्जावरही आक्षेप घेण्यात आला होता.

२.सर्व्हेंचा कल

पोटनिवडणुकीसाठी अंधेरी पूर्व भागात सर्व्हे करण्यात आले होते. या सर्व्हेमध्ये मतदारांचा कल ऋतुजा लटके यांच्याबाजूने असल्याचे दिसून आल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगलीये. सहानूभूती हा फॅक्टर लटके यांच्या मदतीला धावून आला असता. तसेच पटेल हे गुजराती आहेत. साहजिकच मराठी मतदार हे लटके यांच्या बाजूने उभे राहिले असते. सर्व्हेंमधून समोर आलेला कल पाहता उद्धव ठाकरे गटाचा आत्मविश्वास वाढला, असे राजकीय विश्लेषक सांगतात.

३.आशिष शेलार आग्रही, पण पक्षाची भूमिका काय?

मुरजी पटेल यांच्या उमेदवारीसाठी आशिष शेलार हे आग्रही होते. मात्र, आशिष शेलार यांनी पक्षाच्या संसदीय समितीचे मत विचारात न घेताच मुरजी पटेल यांचे नाव पुढे केले. विशेष म्हणजे, मुरजी पटेल यांच्यासाठी आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला गेले.

पटेल यांना पाठिंबा देण्याची विनंती शेलारांनी राज ठाकरेंना केली होती. यानंतर राज ठाकरेंनी रविवारी निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले. यावर प्रतिक्रिया देताना चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे सूचक उत्तर दिले होते. पटेल यांच्या उमेदवारीवरुन आशिष शेलार हे पक्षात आणि पक्षाबाहेरही एकाकी पडल्याचे दिसून आले.

४.SRA योजनेतील मतदारांची नाराजी

अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत SRA योजनेतील मतदारांची भूमिका निर्णायक ठरली असती. अनेक वर्ष लोटूनही घर मिळत नसल्याने मतदार नाराज आहे. पटेल हे बिल्डरांच्या बाजूने आहेत, असा प्रचार ठाकरे गटाने केला असता आणि याचा फटका भाजपाला बसला असता.

५.बीएमसी निवडणुकीचे कनेक्शन

दिवाळीनंतर मुंबईसह राज्यातील अन्य महापालिकांसाठी निवडणुका होणार आहे. अंधेरी पूर्व निवडणुकीत ठाकरे गटाचा विजय हा भाजपाला तापदायक ठरला असता. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ही पहिलीच मोठी निवडणूक होती. पोटनिवडणुकीतील विजय उद्धव ठाकरे गटाचे मनोबल वाढवणारे ठरले असते. अशा परिस्थितीत भाजपा नेतृत्वाने माघार घेणे हे अपेक्षितच होते. मात्र, हा निर्णय भाजपाने चार दिवसांपूर्वीच जाहीर केला असता तर पराभव दिसू लागल्याने भाजपाने पळ काढला, अशी टीका करण्याची संधी विरोधकांना मिळाली नसती हे मात्र नक्की.