esakal | Indian Idol ः आता अंजलीच्या वडिलांचाही आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

अंजली गायकवाड

अंजली ही गरीब कुटुंबातील आहे. तिचे वडील अंगद हेही गायक आहेत. बहीण नंदिनीही चांगली गायिका आहे. तिनेही स्पर्धा गाजवली आहे.

Indian Idol ः आता अंजलीच्या वडिलांचाही आरोप

sakal_logo
By
अशोक निंबाळकर

अहमदनगर - इंडियन आयडॉल स्पर्धेविषयी दररोज नवे खुलासे होत आहेत. प्रसिद्ध गायकांकडून स्पर्धा व्यवस्थापकांवर टीकेची तोफ डागली जात आहे. महाराष्ट्राची गायिका अंजली गायकवाड ही स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर तर सोशल मीडियातून आणखीच संताप व्यक्त होत होता. आता तिचे वडील अंगद गायकवाड यांनीही स्पर्धेविषयी भाष्य केलंय. स्पर्धेच्या एकूणच प्रक्रियेविषयी त्यांनी शंका व्यक्त केली. अंजलीच्या गाण्याने रसिकांसह स्पर्धकांनाही भुरळ पाडली होती. मग तिला वोटिंग कमी कसे होऊ शकते, असा सवाल त्यांनी "ई सकाळ"सोबत बोलताना केला. (Anjali Gaikwads father also alleges about Indian Idol competition)

हेही वाचा: विमा कंपन्यांची बनवेगिरी ः दुष्काळातही दाखवला सुकाळ

अंजली स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर अहमदनगरकरांसह संपूर्ण देशातील रसिकांची निराशा झाली. संगीत क्षेत्रासोबतच राजकीय क्षेत्रातूनही प्रतिक्रिया उमटल्या. चॅनल आणि स्पर्धेतील परीक्षकांच्या हेतूबद्दलही शंका घेण्यात आली. याबद्दल अंजली आणि तिच्या कुटुंबाची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांची आगतिकता दिसून आली.

अंजलीचे वडील अंगद गायकवाड यांनी सुरूवातीला इंडियन आयडॉल स्पर्धेच्या निकालावर भाष्य करण्यास नकार दिला. परंतु काही गोष्टींवर त्यांनी बोट ठेवले. अंजलीने यापूर्वी टीव्ही चॅनल्सवरील अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. तिचा आवाज महाराष्ट्रासह देशाला परिचित आहे. आम्ही वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत. शास्त्रीय संगीत ही आमची साधना आहे. तोच आमचा बेस आहे. अंजलीही त्यात वाकबगार आहे. तुम्ही पाहिलं असेल स्पर्धेत गाण्यापेक्षा जास्त ड्रामा केला जातो. तो काही अंजलीला करता येत नाही. तुम्ही जर गाणं सोडून लवस्टोरीसारख्या ट्विस्ट आणणार असेल तर कसे चालेल. स्पर्धेवेळी अंजली केवळ पंधरा वर्षांची होती. तरीही तिने अनेक दिग्गज स्पर्धकांना टक्कर दिली. आठ-आठ तास बसवून ठेवून नंतर गायला संधी दिली जायची, तरीही ती कमालीचा परफॉर्मन्स देत होती. गाण्यापेक्षा ड्रामा हेच जर परिमाण असेल तर कसे व्हायचे. झालं गेलं विसरून आम्ही गाण्यावर लक्ष्य केंद्रित केलं आहे. एका स्पर्धेने काही होत नाही, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

कोण आहे अंजली...

अंजली ही गरीब कुटुंबातील आहे. तिचे वडील अंगद हेही गायक आहेत. बहीण नंदिनीही चांगली गायिका आहे. तिनेही स्पर्धा गाजवली आहे. अंजली वयाच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षापासून गाते. तिच्या आजोबांकडून हा वारसा चालत आला आहे. त्यांच्या कुटुंबात वारकरी संप्रदायाकडून गायनाची परंपरा चालत आली आहे. गायकवाड कुटुंब हे मूळ लातूर जिल्ह्यातील तळोजाचे. ते नगरला स्थायिक झाले आहेत. अंगद गायकवाड हे संगीताचे क्लास घेतात. परंतु कोरोनामुळे तेही बंद आहेत. त्यामुळे घरची परिस्थिती हालाखिची आहे.

अंजली तू पद्मश्री मिळवशील

अंजलीला रसिकांची दाद मिळत होती. परीक्षकांनीही तिच्या गाण्याची वाहवा केली होती. अन्नू मलिक आणि नेहा कक्कर, हिमेश रेशमिया यांनीही तिच्या गाण्याचे तोंडभरून कौतुक केलं. शास्त्रीय गायनावर असलेल्या कमांडवरही ते नेहमी बोलत. स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर नेहा अंजलीला म्हणाली, तुझं भविष्य उज्ज्वल आहे. तू इंडियन आयडॉल होऊ शकली नाही, याचे दुःख वाटून घेऊ नकोस. तुला यापेक्षाही मोठा पुरस्कार मिळेल. तू पद्मश्री मिळवशील. अंजलीचे वडील अंगद गायकवाड यांनी अशी आठवण सांगितली. (Anjali Gaikwad's father also alleges about Indian Idol competition)

loading image