मार्क्सवाद व गांधीवादातील मध्यम मार्ग म्हणजे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील

विषमता हा मानवी संस्कृतीचा अविभाज्य भाग राहिलेला आहे. स्थळ,काळ,परिस्थिती नुसार विषेमतेचे आधार व स्वरूपही वेगवेगळे राहिलेले आहे. युरोपमध्ये भांडवलवादाचे समर्थन करणारी आर्थिक विषमता निर्माण झाली. तर आशिया व आफ्रिका खंडात जात व वर्णाच्या आधारे विषमता अस्तित्वात आली.
pune
punesakal

विषमता हा मानवी संस्कृतीचा अविभाज्य भाग राहिलेला आहे. स्थळ,काळ,परिस्थिती नुसार विषेमतेचे आधार व स्वरूपही वेगवेगळे राहिलेले आहे. युरोपमध्ये भांडवलवादाचे समर्थन करणारी आर्थिक विषमता निर्माण झाली. तर आशिया व आफ्रिका खंडात जात व वर्णाच्या आधारे विषमता अस्तित्वात आली. भारतात श्रीमंत जमीनदार व गरीब शेतकरी अशीही विषमता अस्तित्वात होती. कालमानाप्रमाणे विषमता दूर करणारे विचारही अस्तित्वात आले. युरोपमधील शारिरीक,मानसिक व सामाजिक शोषणकारी आर्थिक विषमतेचे विवेचन करून ती विषमता दूर करण्याचा मार्ग कार्ल मार्क्सने संपूर्ण जगाला दाखविला. तो विचार जगात रुजला व जोपासला गेला. परिणामी जगातील अनेक देशात राजकीय परिवर्तने झाली.

आजही मार्क्स वादाची प्रस्तुतता संपूर्ण जगात तेवढीच आहे.मात्र मार्क्सचा विचार कांही प्रमाणात पायावर चालण्यापेक्षा डोक्यावर चालणारा ठरला. हिंसक क्रांतीच्या आधारे शोषणकारी व्यवस्था संपवून जगात साम्यवाद निर्मितीचे व राज्य लोपाचे स्वप्न पाहणारा मार्क्सचा विचार पूर्णपणे वास्तवात उतरू शकला नाही. दुसऱ्या बाजूला भारतात महात्मा गांधीनी सत्य व अहिंसेवर आधारित शोषण विरहित समाज निर्माण करायचा होता. विश्वस्त संकल्पनेतून व ग्रामस्वराज्यावर आधारित रामराज्याची संकल्पना गांधीजीनी मांडली. अशा प्रकारचे रामराज्य अस्त्वितात येणे सुद्धा अश्यक्यच. मात्र अहिंसक व सहकाराच्या माध्यमातून शोषितांना मालक बनविण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणारा अवलिया महाराष्ट्रात होऊन गेला. तो अवलिया म्हणजे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील होय. ज्यांनी अतिशय कठीण परिस्थितीवर मात करून सुरु केलेली चळवळ महाराष्ट्रात सहकार चळवळ म्हणून अवतरली. ज्या चळवळीने महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला कलाटणी दिली. संपूर्ण देशात महाराष्ट्राला अग्रेसर करण्यात कारणीभूत ठरली. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण शेतकऱ्यात आर्थिक स्वावलंबन,त्यातुन शिक्षण व ग्रामीण औद्योगिक सक्षमीकरण या सूत्राचा अवलंब त्यांनी केला. नारळी पौर्णिमेला त्यांचा जन्म दिवस. त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांच्या कर्तृत्ववाचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न.

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्म शेतकरी कुटुंबातील. सर्वसामान्य शेतकऱ्यांचे सामाजिक,सांस्कृतिक व आर्थिक मागासलेपण प्रचंड. भारतीय परंपरांच्या वक्र संचितांमुळे समाजाची परंपरावादी मागासलेली मानसिकता. या गरीब शेतकऱ्यांच्या यातनांची जाणीव त्यांना लहानपणापासूनच होती. त्यातच निसर्गाच्या कोपातून अहमदनगर जिल्ह्यात पडलेला भीषण दुष्काळ. यामुळे शेतकऱ्यांचे जीवन आणखीनच बत्तर झालेले. गरिबांना जगवणे गरजेचे होते. अशा परीस्थित विठ्ठलरावांनी मदतीची शिबिरे उघडली,गावोगावातून धान्य जमा करून लोकात वाटली. या काळात विल्सन (भंडारदरा)धरण क्षेत्राचा फायदा घेऊन अहमदनगरमधील ओलीत प्रदेशात सरकारी मदतीवर खाजगी साखर कारखानदारी उभी राहिली. १९३५-४० दरम्यान नगर जिल्ह्यात डझनभर खाजगी कारखाने निर्माण झाली. एका बाजूला खाजगी कारखानदारी तर दुसऱ्या बाजूला गरीब मागासलेला शेतकरी. अशी आर्थिक विषमता समाजात निर्माण झालेली. अशा परीस्थित गरीब शेतकऱ्याची मालकी असलेल्या सहकारी कारखान्याच्या निर्मितीचे स्वप्न विठ्ठलरावांनी पहिले व ते पूर्ण करण्यासाठी धडपड सुरु केली. कुठे पायी तर कुठे घोडयावर फिरून आधी लोकांना सहकाराचे महत्व पटवून दिले.

अनेक ठिकाणी विरोधही झाला,पण आपल्या कार्यावरनिष्ठा ठेवून न डगमगता शेतकऱ्यांना विश्वासात घेतले. जमेल तसे शेतकऱ्याकडून कारखान्यासाठी समभाग (शेअर्स ) जमा केले. त्यातून आशिया खंडातील पहिला शेतकऱ्यांच्या मालकीचा सहकारी तत्वावरील कारखाना उभा केला. कारखान्यासाठी लागणाऱ्या ऊस उत्पादनासाठी पाण्याच्या सोयीची आवशकता होती. विल्सन (भंडारदरा) धरणाच्या पाण्याबाबतीत शेतकऱ्यांच्या सिंचन परिषदा घेतल्या. शेतीसाठी शेतकऱ्यांना गरज पडेल तेंव्हा कर्ज मिळण्यासाठी सरकारकडे प्रयत्न केले. परिणामी बँकेचे धोरण बदलून शेतकऱ्यांच्या सोयीची कँश क्रेडीट पद्धत सुरु झाली. त्याबरोबरच गरीब शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सबल करण्यासाठी आसपासच्या बारा गावात सहकारी पतपेढ्या उभ्या केल्या. कारखान्यातील कामगारांसाठी स्वतः पुढाकार घेऊन कामगारांची सोसायटी स्थापन केली.

त्याही पुढे जावून विविध ठिकाणी उभारल्या जाणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांना लागणाऱ्या क्रशर,टर्बाइन,क्रेन कँरिअर, अशा अवजड यंत्राची निर्मिती करणारा कारखाना उभा करायचा होता. त्यासाठी प्रवरा कृषी औद्योगिक विकास सहकारी संस्थेची स्थापना केली. त्यातून ग्रामीण औद्योगिकते बरोबर नोकऱ्या वाढवून ग्रामीण भागातून शहराकडे होणारे स्थलांतर थांबवायचे होते. या योजनेत ग्रामीण भागातच औद्योगिक प्रशिक्षणाच्या प्रशाला काढण्याचा भाग होता. या योजनेप्रमाणे शेतकऱ्यासाठी लोखंडी नांगर,तेल इंजिन,कारखान्याला लागणारे पंप, ट्रँक्टरला लागणारे सुट्टे भाग तयार करणारे वर्कशॉप टाकले त्यातून शेतीस लागणारी अवजारे तयार होऊ लागली. त्याचा पुढे एक पाऊल म्हणजे जपानच्या निचीमेन कंपनी सोबत ट्रँक्टर ची छोटी प्रतिकृती करण्याचा करार केला. दुर्दैवाने कुशल कारागीरा अभावी १९६८ ला बंद करावा लागला. महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील औद्योगिक विकेंद्रीकरणावर आधारित स्वावलंबी ग्रामीण अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न विठ्ठलरावानी प्रत्यक्षात केला. केवळ अनुभवातून ते कृषी अर्थ व्यवहाराचे स्वयंभू तज्ञ बनले. विशेषतः सर्व सहकारी संस्थांचे व्यवस्थापन लोकशाही तत्वावर आधारित ठेवले होते. आयुष्यभर कुठेही वाच्यता न करता शेतकऱ्यांच्या मुलांना आर्थिक व इतर प्रकारची मदत करत राहिले.

साखर कारखान्याची आर्थिक स्थिती जशी जशी भक्कम होऊ लागली,तशी विठ्ठलरावांच्या डोक्यात कल्याणकारी योजनांची चक्रं घोळू लागली. शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचे मूळ शिक्षणात आहे. शिक्षण हाच गर्तेतून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. याची जाणीव त्यांना होती. शासनाचे शैक्षणिक धोरण सदैव शहरी धनिकांना अनुकूल असते,त्यात ग्रामीण शिक्षणाला फारसे महत्व नसते,अशी त्यांची खंत होती. म्हणून शिक्षणासाठी पैसा उभा करायला सुरुवात केली. साखर कारखान्यात गाळपात येणाऱ्या ऊसाच्या प्रत्येक टनावर चार आणे (आजचे २५ पैसे) शिक्षण फंड म्हणून बाजूला ठेवून शैक्षणिक उपक्रम राबवायला सुरुवात केली. सुरुवातीला या फंडातून रयत शिक्षण संस्थेला देणग्या दिल्या. बाई शिकली की घर सुधारते या जाणीवेतून १९४५ ला पत्नी वेणूताईला घरी स्वतः शिकवण्यास सुरुवात केली. वनिता विकास मंडळ काढून स्त्रियांचे साक्षरता वर्ग चालवले. मुलीना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रवरा कन्या विद्यालय सुरु केले.

काळाच्या एक पाऊल पुढे इंग्रजी शिक्षणाचे महत्व ओळखून खेडयातील मुलांना इंग्रजी शिकण्याची व्यवस्था करण्याचा आग्रह मुख्यमंत्री श्री.शंकरराव चव्हाण यांच्याकडे धरला. खेडयातील बालकांसाठी पहिली किंडर गार्डन स्कूल लोणीत काढली.१९५८ ला प्रवरानगर येथे न्यु इंग्लिश स्कूल स्थापन केली. दारिद्र्य व दुखः प्रत्यक्षात जन्माने शेतकरी जर कलेक्टर किंवा सत्ताधारी झाला तर खऱ्या अर्थाने तो शेतकऱ्यांच्या कल्याणाचे धोरणे राबवेल,यावर त्यांचा विश्वास होता. तो साध्य करण्यसाठी १९५५ ते १९५७ या काळात लोणी व आसपासच्या परिसरात अर्धा डझन माध्यमिक शाळा काढल्या. १९६४ ला प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्याद्वारे उच्च शिक्षण देणारे महाविद्यालये काढली. जे प्रवरा मॉडेल म्हणून प्रसिद्ध आहेत. १९७४ ला त्यांच्या अध्यक्षतेखाली प्रवरा मेडिकल ट्रस्ट ची स्थापना केली. त्याद्वारे सर्व सोयीनी युक्त सुसज्ज असे वैद्यकीय महाविदयालय व रुग्णालय सुरु केले. जे आज विद्यापीठाच्या रुपात सक्षमपणे कार्यरत आहे.

ग्रामीण विद्यार्थ्यांना विज्ञान,तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे अशी त्यांची महत्वकांक्षा होती. त्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. सहकार व शिक्षण क्षेत्रात पद्मश्री विठ्ठलरावांनी जे बीजारोपण केले,त्याचे विशाल अशा वटवृक्षात रुपांतर करण्याचे कार्य त्यांचे चिरंजीव पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी केले. सर्वत्र सहकार कारखानदारी डबघाईला येऊन मोडीत निघत असताना,अत्यंत चिकाटीने प्रवरा परिसरातील सहकार टिकवून ठेवण्याचे कार्य त्यांनी केले. परिसरातील शैक्षणिक सुविधा व्यापक व मजबूत केल्या. हा कार्याचा वसा त्यांच्या वारसांनी सक्षमपणे चालू ठेवलेला आहे. श्री.राधाकृष्ण विखे पाटील व त्यांचे सुपूत्र खासदार सुजय विखे पाटील बदलत्या कालपरिस्थितीनुसार आवश्यक तो बदल करून पद्मश्री विठ्ठलरावांच्या कार्याचा वसा जोमाने पुढे नेत आहेत. परिणामी प्रवरा मॉडेल इतरांना आदर्श घालून देत आहे.

आजच्या सुजलाम सफलाम प्रवरा परिसराचे श्रेयाचे मूळ पद्मश्री विठ्ठलरावांच्या आधुनिक दृष्टीकोण व त्यांच्या इतरांसाठी स्वतःला झिजवण्यात आहे. त्यांच्या सहकाराच्या कार्याबद्दल सर्वत्र त्यांना ओळखले जाते.मात्र दुर्दैवाने शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची फारशी दखल घेतली गेली नाही. ग्रामीण लोकांच्या शिक्षणाविषयी त्यांची तळमळ व कल्पक काम इतरांना पथदर्शक ठरले आहेत. कृषी उद्योगातून निर्माण झालेल्या संपत्तीतील कांही हिस्सा शिक्षणासाठी खर्च करण्याचा पायंडा त्यांनी पडला. त्यांच्या कार्याची फळे आज या भागातील लोकांना मिळत आहेत. अशा ऋषितुल्य मानवाला विनम्र अभिवादन.

-प्रा.अंकुश सुर्यवंशी

राज्यशास्त्र विभाग,

पद्मश्री विखे पाटील महाविदयालय ,प्रवरानगर

ankushtmv@rediffmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com