esakal | ‘माझी मैना गावाकडं राहिली! अण्णा भाऊंच्या या लावणीतून सीमाप्रश्‍नाची खदखद
sakal

बोलून बातमी शोधा

‘माझी मैना गावाकडं राहिली! लावणीतून सीमाप्रश्‍नाची खदखद

‘माझी मैना गावाकडं राहिली! लावणीतून सीमाप्रश्‍नाची खदखद

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मालोजी अष्टेकर,माजी महापौर, बेळगाव

‘माझी मैना गावाकडं राहिली...’ ही छक्कड लावणी अण्णा भाऊंच्या काव्यप्रतिभेची सुरेख साक्ष आहे. पत्नीचा विरह विसरून पोटासाठी नायक मुंबईची वाट धरतो. त्यावेळीच संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू होतो आणि तो लढ्यात सामील होतो. पती-पत्नीच्या विरहाची आणि त्यांच्यातील भावबंधनाची कहाणी या लावणीत आहे. ‘माझी मैना गावाकडं राहिली! माझ्या जीवाची होतीया काहिली...’ असा लावणीचा मुखडा देऊन पहिल्या कडव्यात शाहीर श्रोत्यांसमोर जशीच्या तशी मैनेला तिच्या देहरूप गुणांसह उभा करतो. या मैनेचा रंग गव्हाळ आहे. ती चंद्रकोर आहे, उदात्त गुणांची आहे. शाहीर सांगतो, ती रामाची सीता आहे. ती हसून बोलायची, मंद चालायची, अंगाला केतकीचा सुगंध आणि कांती सतेज जणू घडीव सोन्याची पुतळी. नव्या नवतीची, काडी दवण्याची. तिच्या रेखीव भुवया जणू इंद्रधनुची कमान. जशी आंधळ्याची काठी तशी ती माझी गरिबाची काठी. मैनेचं वर्णन करताना शाहीर कवन रचतात.(annabhau-sathe-jayanti-2021-maharashtra-karnataka-boundary-ishhu-mazi-maina-gawavar-rahili-lavni-fakira-akb84)

‘मैना रत्नांची खाण ।

माझा जीव की प्राण

नसे सुखाची वाण ।

तिच्या गुणांची छक्कडच गायिली ।

माझ्या जीवाची होतीया काहिली।’

ही लावणी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या पार्श्‍वभूमीवर आहे, हे लक्षात घेतले म्हणजे लावणीतील रूपकेही लक्षात येतात. यातील नायिका म्हणजे बेळगाव, कारवार, डांग, उंबरगाव, गोव्यामधील महाराष्ट्रापासून दूर असलेली नव्हे. मुद्दाम दूर ठेवलेली जनता. या जनतेविषयी महाराष्ट्राच्या मनातील हळहळ म्हणजे मनाची काहिली अशा शब्दांतून अण्णांनी सीमाप्रश्‍न लावणीतून उभा केला आहे. मुंबईत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली. मुंबईसह संपूर्ण मराठी बोलणाऱ्यांचा संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आंदोलने, प्रयत्न झाले.

अर्ज, विनंती, शिष्टमंडळे निवेदनांतून मागणी होऊ लागली; परंतु याचवेळी सूर्य-चंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही, अशा वल्गना काँग्रेसचे नेते मोरारजीभाई देसाई, स. का. पाटील यासारखी मंडळी करीत होती. १६ जानेवारी १९५६ रोजी तत्‍कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मुंबई केंद्रशासित ठेवण्याची घोषणा केली आणि प्रचंड उद्रेक झाला. १०५ हुतात्म्यांचे बलिदान झाले. फाझल अलीच्या राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्रवर अन्याय करून द्विभाषिक राज्याची निर्मिती केली. बेळगाव, कारवार, बिदरमधील मराठी प्रदेश म्हैसूर राज्यात घातला.

या विरोधात १९५७ मध्ये झालेल्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीला प्रचंड यश मिळाले. मुजोर विरोधकांचे अवसान गळाले. या मुंबईसह महाराष्ट्राच्या विरोधकांना अण्णांनी रावणपुत्र इंद्रजिताची उपमा देऊन उपरोधिक टोला लावणीतून हाणला. इंद्रजिताने राम-रावण युद्धावेळी शक्ती अस्त्र सोडून लक्ष्मणास पाडले होते. हनुमंताने द्रोणागिरी पर्वतच उचलून आणत आणि त्यातील संजीवनी वनस्पतीच्या औषधी प्रभावाने लक्ष्मण जागृत व ठणठणीत बरा होऊन युध्दसज्ज झाला. हे पाहताच इंद्रजित धास्तावला आणि त्याने कुलस्वामिनी निकुंबादेवीच्या स्थानात होमकुंड प्रज्वलित करून विजय प्राप्तीसाठी मंत्रोच्चारण सुरू केले. या मंत्रप्रयोगाने काही वेळातच त्याचा रथ वर येऊ लागला. परंतु सतर्क हनुमंताने वज्रांग उड्डाण करून अर्ध्यावर आलेला रथ विध्वंसित केला.

हेही वाचा: कोकणाला 2 दिवस रेड अलर्ट ; 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा

इंद्रजिताचा डाव सपशेल फसला. दुसऱ्या दिवशी त्याच स्थळी लक्ष्मणाच्या बाणाने इंद्रजित ठार झाला. १९५७ च्या निवडणुकीत मतदारांनी मुंबई विरोधकांचा रथ असाच मोडून काढला. जी गत इंद्रजिताची झाली तीच गत मोरारजी देसाई आणि स. का. पाटील यांची कलियुगात झाली. अखेर मुंबई महाराष्ट्राची झाली. महाराष्ट्रात विजयाची गुढी उभारली. पाठ भिंतीला लावून लढण्याची रीत दाखविली. एवढे सारं घडलं तरी अंतरीची तगमग थांबत नाही. गावाकडे त्याची मैना राहिलीय, तिची भेट नाही. गंमत म्हणजे जी गत त्याची होते तीच गत खंडित महाराष्ट्राची. बेळगाव, कारवार, डांग, उंबरगाव व इतर मराठी प्रदेशावर दुसऱ्यांची मालकी राहते. सत्तर वर्षांपूर्वी लिहिलेल्या लावणीत अण्णा भाऊंना बेकीबद्दल चीड निर्माण होते आणि एकीची गरज पडते. म्हणून शिवशक्तीला शाहीर विनवणी करून आपलं मैनेचं कवण लावणीरूपात पुरे करताना ते म्हणतात, ‘आता वळू नका । रणि पळू नका । कुणी चळू नका । बिनी मारायची अजून राहिली । माझ्या जीवाची होतीय काहिली...।’

loading image