- योगेश कदम, गृहराज्यमंत्री
महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीत सकारात्मक बदल करण्याला आमच्या सरकारने प्राधान्य दिले आहे. राज्याच्या प्रगतीला पोषक वातावरण निर्माण करणे ही आमची जबाबदारी आहे, ती आम्ही पार पाडू. आमचे ते कर्तव्यच आहे. महाराष्ट्र हे सर्वोत्तम राज्य बनविण्यासाठी मागील १०० दिवसांत पावले उचलण्यात आली आहेत.
त्याचे परिणाम लवकरच दिसू लागतील. मुळात गुन्हे करण्याची मानसिकता संपायला हवी. तसे घडत नसते त्यामुळे गुन्हेगाराला त्वरेने शासन देणारी यंत्रणा तयार व्हायला हवी. कोणतीही तक्रार आली की १० मिनिटांत पोलिस दलाने कामाला लागावे, हे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सध्याही रिस्पॉन्स टाईम चांगला आहेच, मात्र त्यात सुधारणा करू.
नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक शंकेला उत्तर देणे हे आमच्या सरकारचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य आम्ही अत्यंत जबाबदारीने पार पाडू. शहरी आणि ग्रामीण भागातील वेगवेगळ्या तक्रारींची दखल सरकार घेत असतेच. गेल्या शंभर दिवसांपासून तक्रारींचा निपटारा प्रभावीपणे कसा करायचा याबद्दल विशेष विचार केला जातो आहे.
पोलिस ठाण्यात आलेल्या तक्रारींची प्रकरणे कशी हाताळली जातात, याबाबत सरकार जागरूक आहे. सध्या मुंबई पोलिस सतराव्या मिनिटाला आलेल्या तक्रारीची दखल घेऊन कामाला लागतात. याला ‘रिस्पॉन्स टाईम’ म्हणतात. हा वेळ दहा मिनिटांवर आणि कालांतराने पाच ते आठ मिनिटांवर आणण्याचा शासनाचा मानस आहे.
महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे असा जो आरोप केला जातो त्याला दुसरीही बाजू आहे. आपल्या राज्यात आलेल्या प्रत्येक तक्रारीची पोलिसांत नोंद होते. त्यामुळे तक्रारींची संख्या वाढते. अर्थात गुन्ह्यांचे प्रमाण आणि कायदा हातात घेण्याचे प्रमाण शून्यावर येणे, हेच कोणत्याही राजकीय पक्षाला आणि सत्ताधाऱ्याला वाटते. गुन्हे होणार नाहीत, शासनाचा वचक राहील, पोलिसांकडे लोक आदराने बघतील याकडे आम्ही सातत्याने लक्ष देतो आहोत.
जनतेच्या दृष्टिकोनात बदल करण्याबाबतच काही महत्त्वाच्या उपाययोजना देखील आम्ही करतो आहोत. या योजना म्हणजे पोलिस ठाणे स्वयंसिद्ध करणे, पोलिसांना आवश्यक त्या सर्व प्रकारच्या सुविधा देणे, चांगली सुस्थितीतील वाहने उपलब्ध असणे, गुन्हा सिद्ध होऊन तो शिक्षेपर्यंत पोहोचावा यासाठी साह्यभूत ठरणाऱ्या सुसज्ज प्रयोगशाळा तयार करणे अशा विविध पातळ्यांवर गेल्या शंभर दिवसात आमचे काम सुरू झाले आहेत.
एकदा आरोप निश्चिती झाली की त्यानंतरची प्रक्रिया वेगाने कशी होईल, याकडेही आम्ही अत्यंत काटेकोरपणे लक्ष देतो आहोत. प्रशासनात निर्माण झालेली शिथिलता काढून टाकण्यावर आम्ही १०० दिवसांमध्ये भर दिला. तसेच प्रशासनात ‘चलता है’ या वृत्तीचा जो शिरकाव झाला होता तो मागच्या आणि या सरकारच्या कार्यकाळात दूर झाला, हे आमचे यश आहे.
महिलासुरक्षेचे आव्हान
महिलांची सुरक्षितता हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा झाला आहे. गेल्या काही दिवसांतील घटना चिंता निर्माण करणाऱ्या आहेत, हे मान्य करावे करावे लागेल. मात्र त्याबरोबरच बहुतांश अत्याचार हे नात्यातल्या परिचित पुरुषांनी केलेले असतात. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आणि नव्या काही व्यवस्था निर्माण करण्यासाठी याकडे जबाबदारपणे लक्ष देण्यासाठी देखील आम्ही पावले उचलत आहोत.
महाराष्ट्र हे अत्यंत शिस्तप्रिय आणि कायदा सुव्यवस्थेचा आदर ठेवला जाणारे राज्य आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्राचा हा लौकिक वाढावा आणि त्या दृष्टीने उत्तम पावले टाकता यावी त्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. येत्या काही दिवसांत कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत आणखी उत्तम फरक झालेला दिसेल, याबद्दल मला विश्वास आहे.
नतेचे मत : सरकारचा वचक हवा
राज्यातील काही भागांमध्ये मागील काही काळामध्ये घडलेल्या गुन्हेगारी स्वरूपाच्या गंभीर घटनांमुळे नागरिकांच्या मनात कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे या मुद्द्यावर नागरिक, विशेषत: महिला असमाधानी असल्याचे चित्र आहे. गुंडांवरील सरकारचा वचक कमी झाला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
वाढलेल्या महिला अत्याचाराच्या घटना, बलात्कार आणि शहरी भागात गुन्हेगारीचे वाढलेले प्रमाण याबाबत महाराष्ट्रातील सामान्य नागरिक अधिक बोलताना दिसून येत आहेत. कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यास सरकारने प्राधान्य द्यायला हवे, असे मत महिलांनी व्यक्त केले आहे.
शहरी भागात अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या वाढत असल्याबाबत नागरिकांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. काही टोळ्यांकडून वाहनांची होणारी तोडफोड, मुजोरी यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होते आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शहरी भागातील नागरिकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले. राज्यात अशी परिस्थिती निर्माण होण्यास राजकीय नेते आणि त्यांनी मांडलेल्या भूमिकाही कारणीभूत असल्याचे नागरिकांना वाटते.
नेत्यांकडून चिथावणीखोर वक्तव्ये झाल्याने किंवा योग्यवेळी हस्तक्षेप न केल्याने तणाव निर्माण होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. सोशल मीडियातूनही अनेकवेळा अफवा पसरत असल्याने तणाव निर्माण होतो. या सर्वांवर पोलिसांनी आणि सरकारने योग्य उपाययोजना करत तोडगा काढावा, अशी अपेक्षा जनतेने व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.