
प्रश्न : जिल्हा परिषद शाळांचा दर्जा खालावत असल्याचे काही अहवालांमधून दिसून आले आहे. त्यावर काय उपाययोजना करत आहात?
उत्तर : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी पहिल्या टप्प्यात शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा बोजा कमी करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय आम्ही घेतला आहे. त्यासंदर्भात कामे करण्यास सुरुवात केली आहे. सध्या २२ समित्या आहेत, ज्यांचा मासिक-त्रैमासिक अहवाल शिक्षकांना द्यावा लागतो. विद्यार्थ्यांना शिकविण्यापेक्षा यामध्येच शिक्षकांचा वेळ जातो. त्यामुळेच या २२ समित्यांच्या आम्ही पाच समित्या करतो आहोत. यामुळे खूप मोठा फरक पडणार आहे. विद्यार्थ्यांना आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्यावर आपला भर असणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत आज आघाडीवर असलेले अनेक जण जिल्हा परिषदा, नगरपालिका, महापालिकांच्या शाळांमध्ये शिक्षण घेऊन पुढे गेलेली आहेत. मात्र अलीकडच्या काळात खासगी इंग्रजी शाळांमध्ये वारेमाप फी भरावी लागली तरी त्याकडे पालकांचा ओढा असतो. तो थांबवण्यासाठी यापुढे जिल्हा परिषदांच्या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना शाळेमध्ये चांगल्या सुविधा दिल्या जाव्यात यावर भर असेल. स्वच्छ पाणी, स्वच्छ स्वच्छतागृहे, खेळण्यासाठी मैदाने आणि शाळा चैतन्यमय असाव्यात, यावर आपला भर असेल.