पतसंस्थांच्या थकबाकी वसुलीसाठी आठ विशेष वसुली अधिकाऱ्यांची नियुक्ती 

प्रमोद बोडके
Wednesday, 8 July 2020

पतसंस्थांसमोर अनेक प्रश्‍न आहेत. फेडरेशनच्या माध्यमातून या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याचे काम सुरु आहे. कोरोनामुळे राज्यातील बहुतांश घटक अडचणींचा सामना करत आहेत. राज्य सरकारने राज्यातील पतसंस्थांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सकारात्मकता दाखवावी. कमीत कमी वेळेत पतसंस्थांचे प्रश्‍न मार्गी लागावेत ही अपेक्षा. 
- दिलीप पतंगे, अध्यक्ष, सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पतसंस्थांच्या कर्ज थकबाकी वसुली करिता सोलापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या प्रस्तावाला मान्यता देत सहकारी जिल्हा उपनिबंधकांनी आठ विशेष वसुली अधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या केल्या आहेत. जिल्ह्यात अंदाजे एक हजार पतसंस्था कार्यरत असून या पतसंस्थांनी वेळोवेळी कर्जदारांना केलेल्या कर्जपुरवठ्याच्या थकबाकी वसुलीसाठी सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनकडून विशेष वसुली अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते. 

या नेमणुकीच्या प्रस्तावाला जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून मान्यता मिळावी लागते. 2020-21 या वर्षाकरिता जिल्हा पतसंस्था फेडरेशनकडून श्री. विश्वास दिनकर कार्यकर्ते, श्री. गोपीचंद अरुण तुकशेट्टी, श्री. गोकूळ सुखदेव नलावडे, श्री. अशोक महादेव सगरे, श्री. दत्तात्रेय वसंत कुलकर्णी, श्री. नरेंद्र नारायण कुलकर्णी, श्री. नितीन अंबादास एकबोटे, श्री. बाळासाहेब श्रीमंत कोरके या आठ जणांचा नियुक्तीबाबतचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाला पाठविण्यात आला होता. 

या प्रस्तावाला सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी मंजुरी देत सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनला 15 जून रोजी नियुक्ती पत्र दिले आहे. फेडरेशनतर्फे नियुक्त करण्यात आलेल्या या आठही विशेष वसुली अधिकाऱ्यांचे सोलापूर जिल्हा हे कार्यक्षेत्र राहणार आहे. यावेळी दत्तात्रेय भंवर, आबासाहेब गावडे, संतोष जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appointment of eight special recovery officers for recovery of arrears of credit unions