अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनानंतरच नवीन भरतीस मान्यता! सोलापूर जिल्ह्यात ‘खासगी प्राथमिक’चे १०७ शिक्षक अतिरिक्त; ZP शाळांमध्ये समायोजन शक्य

ज्या शाळांमध्ये रिक्त पदे आहेत, त्याठिकाणी अतिरिक्तचे समायोजन होईल. ज्या शाळा समायोजन करून घेणार नाहीत, त्यांना नवीन शिक्षक भरतीला परवानगी मिळणार नाही, असे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
zp schools
zp schoolssakal

सोलापूर : जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळांमधील १०७ शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. त्यात अल्पसंख्याक शाळांमधील ५२ शिक्षक असून उर्दू शाळांमधील चार तर कन्नड शाळांमधील सात शिक्षक आहेत. बिगर अल्पसंख्याक शाळांमधील ४४ शिक्षकही पटसंख्येअभावी अतिरिक्त झाले आहेत. ज्या शाळांमध्ये रिक्त पदे आहेत, त्याठिकाणी अतिरिक्तचे समायोजन होईल. ज्या शाळा समायोजन करून घेणार नाहीत, त्यांना नवीन शिक्षक भरतीला परवानगी मिळणार नाही, असे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सध्या शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविली जात आहे. त्यासाठी खासगी संस्थांनाही जाहिराती अपलोड करण्याचे आदेश आहेत. पण, अनेक शाळांनी अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनापूर्वीच ‘पवित्र’वर जाहिराती अपलोड केल्या आहेत. त्या शाळांची नावे आता शिक्षण आयुक्त कार्यालयाला कळविली जाणार आहेत. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनानंतरच त्या शाळांना नवीन पदभरती करता येणार आहे. दरम्यान, आता अतिरिक्त शिक्षकांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. जिल्ह्यातील ज्या खासगी प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत, त्यांची यादी देखील शिक्षणाधिकाऱ्यांनी तयार केली आहे.

समुपदेशनाच्या माध्यमातून अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना वेगवेगळ्या शाळांमध्ये समायोजन केले जाईल. त्या शाळांनी अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेणे बंधनकारक आहे. पुढील आठवड्यात समायोजनाची कार्यवाही पूर्ण होईल. पण, अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची कार्यवाही उपसंचालक स्तरावरून होते. त्यामुळे अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त झालेल्या ६३ शिक्षकांना काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. तूर्तास बिगर अल्पसंख्याक शाळांमधील ४४ शिक्षकांचे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शिक्षकांचे समायोजन होईल.

बिगर अल्पसंख्याक शाळा मात्र शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून घेत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्या शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा विषय उपसंचालकांच्या हाती असतानाही काहीच कार्यवाही होत नाही हेही विशेषच. आता जिल्ह्यातील अल्पसंख्याक शाळांवरील ५२ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन कधीपर्यंत होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

काम झेडपी शाळांमध्ये, पण पगार खासगी शाळेतून

पाच वर्षांपूर्वी अतिरिक्त झालेल्या १६ शिक्षकांना जिल्हा परिषद शाळांमध्ये नेमणूक देण्यात आली. पण, त्या शिक्षकांना कायमची नियुक्ती त्याठिकाणी मिळाली नाही. त्यामुळे त्यांची नेमणूक जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये पण पगार संबंधित खासगी संस्थेतून होतोय. पाच वर्षांपासून हा प्रकार ‘जैसे थे’ आहे. आता त्या शिक्षकांना समायोजनाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमध्येच नेमणूक दिली जाणार आहे. तत्पूर्वी, त्यासंबंधी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडे तसा प्रस्ताव दिला जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com