esakal | Sugar Museum : पुण्यात उभारणार जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय! शासनाची मिळाली मान्यता
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात उभारणार जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय! शासनाची मिळाली मान्यता

पुण्यातील साखर आयुक्तालयाच्या परिसरात जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय उभारण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

पुण्यात उभारणार जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय! शासनाची मान्यता

sakal_logo
By
प्रदीप बोरावके : सकाळ वृत्तसेवा

माळीनगर (सोलापूर) : पुण्यातील साखर आयुक्तालयाच्या (Sugar Commissionerate) परिसरात जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय (Sugar Museum) उभारण्यास शासनाने मान्यता दिली आहे. साखर संकुलातील (Sakhar Sankul) पाच एकर जागेत या संग्रहालयाची निर्मिती होणार आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड (Shekhar Gaikwad) यांनी साखर संग्रहालयाच्या उभारणीसाठी आराखडा व प्रस्ताव फेब्रुवारीमध्ये शासनास सादर केला होता.

संग्रहालयाच्या उभारणीसाठी अंदाजे 40 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यासाठी तीन वर्षात निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. संग्रहालयाचे डिझाईन राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतून निवडले जाणार आहे. संग्रहालय उभारणीसाठी राज्य स्तरावर उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियामक समिती तर संग्रहालयाच्या प्रत्यक्ष उभारणी कामकाजावर देखरेखीसाठी सहकारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

सद्य:स्थितीत जगामध्ये बर्लिन, मॉरिशस व ऑस्ट्रेलिया येथे साखर संग्रहालये आहेत. भारतातील साखर उद्योग हा कृषी आधारित उद्योगांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून जागतिक साखर उत्पादनामध्ये देखील भारत ब्राझीलनंतरचा सर्वात जास्त उत्पादन घेणारा देश आहे. भारताची साखर उद्योगाची उलाढाल 80 हजार कोटींवर पोचली आहे. महाराष्ट्र हे ऊस उत्पादनात उत्तर प्रदेशनंतर अग्रेसर राज्य असून, महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये साखर उद्योगाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. साखर उद्योगाविषयी संपूर्ण माहिती उपलब्ध होण्यासाठी, ऊस उत्पादन, साखर उत्पादन, गूळ, खांडसरी साखर उत्पादन तसेच साखरेपासून बनवलेले उपपदार्थ, इथेनॉल, कंपोस्ट खत, सहवीज निर्मिती यांची माहिती या संग्रहालयाद्वारे उपलब्ध होणार आहे.

देश व जागतिक स्तरावर साखर उद्योगात महाराष्ट्राचे योगदान पाहता साखर संग्रहालय महाराष्ट्रासाठी व देशासाठी मानबिंदू ठरणार आहे. शेतकरी, पर्यटक, विद्यार्थी व देशोदेशीच्या अभ्यासकांना हे संग्रहालय निश्‍चितच उपयुक्त व प्रेरणादायी ठरेल.

- शेखर गायकवाड, साखर आयुक्त

साखर संग्रहालयात समाविष्ट बाबी...

 • जागतिक स्तरावरील व देशांतर्गत साखरेसंबंधी आवश्‍यक माहिती

 • गूळ, साखर निर्मितीच्या प्रात्यक्षिकांसह अद्ययावत मशिनरी

 • गुऱ्हाळ, साखर कारखान्यांची सूक्ष्म प्रतिकृती

 • साखर उद्योगाबाबत डिजिटल प्रदर्शनी

 • साखर उद्योगामध्ये उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तूंचे विक्री केंद्र

 • प्रेक्षागृह

 • साखर आधारित चहापान गृह

 • कला दालन

 • सुसज्ज ग्रंथालय

 • सभागृह

 • स्मरणिका पुस्तकालय

loading image
go to top