सोलापूर डीसीसी बॅंकेला लवादाचा झटका, व्हर्च्युअल गॅलेक्‍सीचा दावा मान्य : व्याजासह रक्कम देण्याचा आदेश 

प्रमोद बोडके
Monday, 6 July 2020

संपूर्ण प्रकरणाची सखोल तपासणी

या दाव्यास सुद्धा सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने दाद न दिल्याने कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात दावा केला. उच्च न्यायालयाने या प्रकरणासाठी 14 जानेवारी 2019 रोजी पुण्यातील निवृत्त न्यायाधीश माधव मकरे यांची लवाद म्हणून नियुक्ती केली. गेल्या दीड वर्षात लवादाद्वारे या संपूर्ण प्रकरणाची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणी झाल्यानंतर लवादांनी कंपनीचा संपूर्ण दावा मान्य केला आहे. याबाबतचा आदेश आज (ता. 6) घेण्यात आला आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने कंपनीच्या दाव्याची संपूर्ण रक्कम व्याजासह देण्याचा आदेश दिला आहे. या दाव्यात कंपनीतर्फे ऍड. चेतन ढोरे, बॅंकेतर्फे ऍड. अभय इनामदार यांनी कामकाज पाहिले. 

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आणि व्हर्च्युअल गॅलॅक्‍सी इन्फोटेक प्रा. ली. यांच्या 2017 पासून सुरू असलेल्या दाव्याचा निर्णय अखेर व्हर्च्युअल गॅलेक्‍सीच्या बाजूने लागला आहे. कंपनीने लवादाकडे केलेला दावा आणि दाव्याची रक्कम सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने अदा करावी असा आदेश या लवादाने दिला आहे. आर्बिट्रेशन दाव्याचा निर्णय व्हर्च्युअल गॅलॅक्‍सी इन्फोटेक प्रा. ली. च्या बाजूने लागला असून बॅंकेतर्फे करण्यात आलेले सर्व दावे लवादामार्फत फेटाळले आहेत. 

2012 मध्ये सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने या कंपनीला कोअर बॅंकिंगचे काम दिले होते. कंपनीने हे काम उत्तमरीत्या पूर्ण केले. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने कोअर बॅंकिंग प्रणाली योग्यरीत्या राबविल्याबद्दल नाबार्डने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला चार कोटी बेचाळीस लाख रुपयांची प्रोत्साहनपर मदत सुद्धा दिली आहे. या कंपनीच्या उत्कृष्ट कामाची पावती नाबार्ड तर्फे बॅंकेस मिळाल्याचा मुद्दाही या प्रकरणात प्रकर्षाने मांडण्यात आला.

कंपनीचे संपूर्ण काम सुरळीतपणे सुरू असतानाही बॅंकेतर्फे कंपनीचे केलेल्या कामाचे देयके देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. त्यामुळे बॅंकेकडे बरीच मोठी रक्कम थकीत झालेली होती. थकीत देयकांकरिता कंपनीच्यावतीने बॅंकेकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता परंतु बॅंक कंपनीस दाद देत नव्हती. त्या मुळे नाइलाजास्तव कंपनीने करारनाम्यानुसार लवादाकडे दावा करत धाव घेतली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arbitration blow to Solapur DCC Bank, virtual galaxy's claim accepted: Payment order with interest