वादाचा भोंगा

अक्षय्य तृतीयेला ‘मनसे’ची महाआरती
bhonge
bhongesakal

मुंबई : हनुमान जयंतीच्या पाठोपाठ अक्षय्य तृतीयेला देखील राज्यभरातील स्थानिक मंदिरांमध्ये ध्वनीक्षेपकाद्वारे (लाउडस्पीकर) महाआरती करण्याचा घाट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घातला आहे. अक्षय्य तृतीया व रमझान ईद ३ मे रोजी एकाच दिवशी साजरी होणार आहे.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादर येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये राज यांच्या अयोध्यावारीच्या कार्यक्रमाची आखणी आणि अक्षय्य तृतीया कशी साजरी करावी याविषयावर चर्चा झाली. मनसे नेते नितीन सरदेसाई म्हणाले, की अक्षय्य तृतीयेनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते ३ मे रोजी राज्यभरात स्थानिक मंदिरांमध्ये महाआरती करतील. ध्वनीक्षेपकाद्वारे ही महाआरती होणार असल्याचे सांगण्यात आले.

अशांतता अमान्य

नागपूर : भोंग्यांच्या राजकारणाआड राज्यात अशांतता निर्माण केली जात असेल तर कडक कारवाई केली जाईल. तशा सूचना पोलिस महासंचालकांना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक शहरातील पोलिस आयुक्त यावर करडी नजर ठेऊन असल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

नागपूरचे संपर्कमंत्री या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीसाठी ते मंगळवारी नागपूरमध्ये आले होते. यावेळी पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी काही घटकांकडून अशांतता निर्माण होईल, असे प्रयत्न होत असल्याचे सांगितले. देशात आणि राज्यातही सर्व पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहे. गृह विभाग पूर्ण तयारीत आहे. कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. कुठल्याही वक्तव्यामुळे आणि बोलण्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असेल तर कारवाई केली जाणारच आहे. अमरावतीमध्ये काही घटना घडतात याचा अर्थ त्या ठिकाणी काही असामाजिक तत्त्व काम करत आहेत. त्यांचा बंदोबस्त लावण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

मी माझ्या पद्धतीने काम करतो

आपल्या देशात वेगवेगळ्या कारणांवरून जातीय भावना भडकावण्याचा प्रयत्न होत आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. मी माझ्या पद्धतीने कायदा व नियमानुसार काम करतो. इतर कोणी काय बोलतात हे महत्त्वाचे नाही, असे सांगून गृहमंत्री वळसे पाटील यांनी शिवसेनेच्या नेत्यांनाही सौम्य शब्दात प्रत्युत्तर दिले. मध्यंतरी शिवसेनेच्यावतीने वळसे पाटील यांना कडक भूमिका घेण्याचा सल्ला देण्यात आला होता.

राज ठाकरे यांच्या भूमिकेला आमचा विरोध आहे. त्यांनी मंदिरांवर भोंगे लावायचे असतील तर लावावे, मात्र मशिदीवरील भोंगे काढण्याच्या त्यांच्या भूमिकेला आमचा विरोध आहे. बाळासाहेब ठाकरे यांचाही विरोध होता. धर्माधर्मांमध्ये वाद निर्माण करून बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये.

भोंग्याचे सोडा. शेतकऱ्यांच्या विजेचे पाहा. राज्यातील वीज टंचाईमुळे कोणताही उद्योग कोळशाअभावी बंद आहे, असे आपण ऐकलेले नाही. शेतकरी भारनियमनाने त्रस्त आहे. शेतीसाठी रात्री वीज देऊन शेतकऱ्यांच्या मानवी हक्काची पायमल्ली होत आहे.

- राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

‘भाजपने भोंगे का उतरविले नाहीत’

नागपूर : मशिदीवरील भोंगे उतरविण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आजचा नाही. भाजपची महाराष्ट्रात सत्ता असताना भोंगे का उतरविले नाहीत? असा सवाल आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी भाजपला केला. यावेळी त्यांनी ‘आधी भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये भोंगे उतरवावेत, असा सल्लाही दिला. ‘‘उद्धव ठाकरे सरकार चांगले चालवित आहेत, त्यांना विचलित करण्यासाठी भाजपवाले भोंग्याचे राजकारण करीत आहेत,’’ असेही ते म्हणाले. भोंग्यांचा एवढाच त्रास होत असेल तर केंद्र सरकार प्रत्येक राज्यातील जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तांना भोंगे काढण्यासंबधी आदेश देऊ शकते. सध्या देशात महागाईकडे लोकांचे दुर्लक्ष व्हावे याकरिता दंगली पेटविण्याचे कारस्थान रचल्या जात असल्याचा आरोपही तोगडिया यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com