शिवराय आमचं दैवत! अन् यांनी तर देव्हाऱ्यालाच हात घातला...

Article on decision of government to convert 25 forts into wedding venues by Harshada Kotwal
Article on decision of government to convert 25 forts into wedding venues by Harshada Kotwal

महाराज आम्ही या पुढे तुमची सेवा करु शकणार नाही बरं का! आजवर आमच्या अनेक मित्रांनी गडकिल्ल्यांवर घाण केली. मात्र, त्यांना वेळोवेळी धडा दाखवत आम्ही गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा ध्यास घेतला. मात्र, आम्ही चुकलो. गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी दिवसरात्र एक करणं, दुर्गमातल्या दुर्गम गडांवर पायवाट तयार करणं, मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात गडावर टाकं खोदायचं.. सारं थांबणार आहे आता! का काय विचारता? आता तुमच्या गडकिल्ल्यांना संवर्धनाची गरज उरलेली नाही. त्यांच्यावर आता लग्नसोहळे आणि हॉटेलिंग होणार आहे. आपल्या महत्त्वकांक्षी सरकारने हा निर्णय घेतला आहे. अरबी समुद्रात तुमचा विश्वासवर स्वार झालेला पुतळा उभं करण्यातच या सरकारला मोठेपणा आहे. मात्र, आजही तुमचा जीव ज्या गडकिल्ल्यांत आहे तिकडे मात्र, हे सरकार आता लग्नसोहळे लावणार आहे. सरकार आजवर म्हणत आलं की आम्ही गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करु आणि म्हणूनच त्यांनी तुमच्या गौरवाचा व्यवसाय करायचं ठरवलं. किती हा विरोधाभास! 

छत्रपतींचे किल्ले देणार लग्नासाठी; सरकारचा संतापजनक निर्णय. नोंदवा तुमच्या प्रतिक्रिया 

मुळात आम्हाला कधी तुमची वाचारसरणी पुढे नेताच आली नाही. जोवर गडकिल्ल्यांची 'अवस्था' झाली नव्हती तोवर आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. आता कुठे डोक्यात प्रकाश पडतो नाही पडतो तेच आमच्या सरकारने आमचे हात बांधून टाकलो ओ महाराज. आमच्यासाठी नेहमी एकच दैवत होतं आणि ते म्हणजे तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराज. मात्र, आज आमच्या सरकारनं त्या दैवताच्या देव्हाऱ्याला हात घातला.  
 
आमच्या महाराष्ट्र देशातील शिवनेरीवर आमचे राजे जन्माला आले बरं का आणि तो तिकडे भोरजवळ जो अभिमानाने उभा आहे तो तोरणा म्हणजे राजांचा पहिला किल्ला. आजही महाराष्ट्राची राजधानी कोणती म्हणलं की समोर येतो तो केवळ राजगड, तर तिकडे उत्तुंग उभा असलेला तो रायगड आमचं आजही रक्षण करतो. असं आता आम्ही छाती फुलवून नाही सांगू शकणार.. कारण आमचं सरकार इथे आता सो कॉल्ड 'विकास' घडवून आणणार आहे. 

जिथे तुम्ही आणि तुमच्या मावळ्यांनी रक्त सांडलं तिथं आमचं सरकार हायक्लास लग्नसोहळे पार पाडेल. तुम्ही मोहीम फत्ते करुन महादरवाज्यात आलात की आसमंत दुमदुमणारे नगारे वाजले, त्याजागी आता डीजेच्या भिंती लावून लोकं डान्स करतील. तुमची सदर म्हणजे आता लग्नाचा मांडव होईल तर जी टाकं आम्ही घाम गाळून खोदली त्याच्याच बाजूला आता नवरा नवरी फोटोही काढतील. या साऱ्या गजबजाटात आम्ही तुमच्या पराक्रमाचा आवाज कसा वाचवू? 

आता शांत बसून चालायचं नाही, या गडकिल्ल्यांवर तुम्ही रक्त सांडलंत आणि आमच्या मित्रांनी घाम गाळला. आता आपल्याच गडकोटांवर जायला आपल्यालाच बंदी होण्याची वेळी आलीये. आपणच आवाज उठविला पाहिजे.. सर्वांनी मिळून. आपल्या दैवताच्या देव्हाऱ्याला आपणचं वाचवायला हवं. लिहते व्हा, #SaveFortsFromGovernment हा हॅशटॅग वापरा.  तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. आपण गडकोटांना वाचविण्यासाठी चळवळ उभी करु, या चळवळीत सामील व्हा. या निर्णयावर तुमच्या प्रतिक्रिया webeditor@esakal.com वर कळवा.

फोटो सौजन्य : रोहन कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com