रोहित पवारांनी मुलाखत दिली, तर पार्थ पवार मुलाखत घेणार!

योगेश कुटे
शुक्रवार, 26 जुलै 2019

एकीकडे या मुलाखती सुरू असताना पक्षाचे बडे नेते दुसऱ्या पक्षात जात आहेत. तसेच पवार घराण्यातील नवीन पिढी राजकारणाचे एकेक धडे घेत आहे.

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसने विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली आहे. त्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय इच्छुकांच्या मुलाखती पक्षाचे नेते घेत आहेत. एकीकडे या मुलाखती सुरू असताना पक्षाचे बडे नेते दुसऱ्या पक्षात जात आहेत. तसेच पवार घराण्यातील नवीन पिढी राजकारणाचे एकेक धडे घेत आहे.

या नव्या पिढीतील एक नाव म्हणजे पार्थ पवार. पार्थ यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा अनुभव घेतला. राजकारणाची पहिलीच लढाई ते थेट लोकसभेसाठी लढले. त्यात त्यांना अपयश आले. आता ते थेट पक्ष निरीक्षकाच्या भूमिकेत गेले आहेत. पिंपरी-चिंचवड येथील विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती ते घेणार आहेत.

पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसह ते आता इच्छुकांना प्रश्न विचारतील. त्यांचे वडिल अजित पवार हे या वेळी त्यांच्यासोबत असणार आहेत. विधानसभा इच्छुकांशी कसे बोलायचे, याचे धडे त्यांना वडिलांच्या कार्यशैलीतून घेता येणार आहेत. पिंपरी-चिंचवडमधील इच्छुकांच्या मुलाखती 27 जुलै रोजी पुण्यात होणार आहेत.

यातील दुसरे नाव म्हणजे रोहित पवार. रोहित यांनी विधानसभेसाठी इच्छुक म्हणून पक्षाच्या निरीक्षकांकडे 25 जुलै रोजी मुलाखत दिली. ते नगर जिल्ह्यातील कर्जत मतदारसंघातून उमेदवारी मागत आहेत. आपण हा मतदारसंघ का निवडला, तेथे कशा स्वरूपाचे काम सुरू केले आहे, तेथील समस्या काय आहेत, यावर त्यांनी निरीक्षकांना उत्तरे दिली. त्यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दुसऱ्या इच्छुक मंजुषा गुंड यांनी रोहित यांच्या उमेदवारीला विरोध करत आपल्याला संधी देण्याची मागणी केली. पक्षाच्या संस्थापकाच्या नातवाच्या उमेदवारीला विरोध झाला असला तरी पक्ष संघटना म्हणून गुंड यांनी आपली मांडणी प्रभावीपणे केली. रोहित यांची उमेदवारी नेत्यांकडून लादली गेली नाही, असा संदेश जाऊ नये, याची काळजी रोहित घेत आहेत.

रोहित आणि पार्थ यांच्या कार्यशैलीतील फरक या निमित्ताने पुढे आला आहे. पार्थ यांना थेट नेतृ्त्त्व म्हणून पुढे यावे असे वाटत असावे आणि दुसरीकडे रोहित हे आधी जिल्हा परिषद सदस्य, नंतर विधानसभा निवडणूक अशा एकेक पायरीने पुढे चालले आहेत. पार्थ यांनी पक्षासाठी आव्हानात्मक असलेला मतदारसंघ निवडणुकीसाठी निवडला होता. मात्र त्यांनी तेथे पूर्वतयारी केली नव्हती. त्याचा फटका त्यांना बसला. ते थेट उमेदवार म्हणूनच मावळात फिरू लागले. दुसरीकडे रोहित यांनी कर्जतमध्ये गेल्या दोन वर्षांपासून बांधणी चालविली आहे.

पार्थ यांनी थोड्याच दिवसांत तयारी करून मावळमध्ये आपला प्रभाव निर्माण केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये वडिलांच्या नेतृत्त्वाची गादी चालविण्याची त्यांची मनीषा दिसून आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ते आता पुन्हा सक्रिय होऊ लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ते पुन्हा उमेदवार इच्छुक आहेत की नाही, याचा अद्याप उलगडा झालेला नाही. पण तसे असेल तर त्यांनी आधीपासूनच तयारी करण्याची गरज होती. अन्यथा पुन्हा मावळसारखी परिस्थिती येऊ शकते.

रोहित यांनीही राष्ट्रवादी आतापर्यंत जिंकू न शकलेला मतदारसंघ निवडला आहे. त्यांनी प्रत्येक गावात आपले कार्यकर्ते तयार केले आहेत. त्यांच्या उमेदवारीला काही जण विरोध करत असले तरी त्यांनाच ती मिळेल, याबद्दल ते निर्धास्त आहेत. त्यांचा सामना नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांच्याशी होणार आहे. राम शिंदे यांचे कार्यकर्ते हे रोहित यांचा पार्थ यांच्यासारखाच पराभव करू, असे आव्हान देत आहेत. त्यामुळे येथील सामनाही रंगतदार ठरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article on Rohit Pawar and Parth Pawar by Yogesh Kute