सलाम परिचारिकांनो अन्‌ दायांनों!

Global-health-Day
Global-health-Day

सलाम! 
सलाम आहे परिचारिकांनो अन्‌ दायांनो तुम्हाला. 
आमच्या श्वासांना अबाधित ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या तुम्हाला अन्‌ वैद्यकीय क्षेत्रातील आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना सलाम. 

आमच्या जीवनात वैद्यकांना, डॉक्‍टरांना महत्त्व देत आलो आहोत. त्यांच्यावर विश्वास ठेवून श्वास घेत आलो आहोत. त्यांच्याविषयीची कृतज्ञता आमच्या मनात आहेच, पण त्यांच्या आसपास असणाऱ्या, सतत लगबगीने वावरणाऱ्या, कामात तत्पर असलेल्या परिचारिकांनो, नर्सेसनों आपली दखल आम्ही अभावानेच घेत आलो आहोत. हो, आम्हाला फ्लोरेन्स नाइटिंगल आठवते. काळोख्या रात्री दिवा घेऊन सैनिकांच्या तळावर हिंडणारी, जखमी जवानांना मलमपट्टी करणारी फ्लोरेन्स नाइटिंगल आमच्या कहाण्यांची नायिका असते. क्वचित अटलबिहारी वाजपेयींना भेटलेली ‘सिस्टर टोपो’ही आठवते आम्हाला. पण त्यापलिकडे आपली दखल घ्यावी असे आलेच नव्हते मनी. पण या काळात जाणवतेय तुमची समाजसेवा अमूल्य आहे.

सलाम आहे तुम्हा सर्वांना. सध्या सर्वच देशांपुढे कोरोनाचे संकट उभे आहे. कोरोनाग्रस्तांच्या सेवेसाठी डॉक्‍टरांच्या बरोबरीने परिचारिकांनो आणि दायांनो तुम्ही जीवाची बाजी लावत आहात. तुम्हीही कुणाची तरी मुलगी आहात, बहीण आहात, पत्नी आहात, आई आहात. तुम्हाला असेलच तुमच्या कुटुंबाची काळजी. पण तुम्हा सर्वांचे कुटुंब घराच्या चार भिंतींच्या पलीकडे मोठे झाले आहे. या मोठ्या समाजकुटुंबातील मुलाला, भावाला, पित्याला, आईला, वहिनीला, बहिणीला कोरोनाच्या बाधेपासून बाहेर काढायला आपल्या मदतीची गरज अधिक आहे हे जाणून तुम्ही गेले काही दिवस धडपडत आहात. परिचारिकांनो अन्‌ दायांनो, तुम्ही आपला जीव धोक्‍यात घालून रुग्णालयात आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची सेवा करत आहात. जीवाची पर्वा न करता अव्याहतपणे सगळे जण उभे आहात. तुमच्यातीलच एकीला सेवा करता करता संसर्गाने गाठले. तिने योग्य ते उपचार घेत स्वतःला पूर्ण बरे केले आणि पुन्हा सेवेसाठी ती उभी राहिली. ही ताकद कुठून आणता तुम्ही बायांनो? 

जगभर हाहाकार माजविणाऱ्या कोरोनासारख्या दुर्धर आजाराला नष्ट करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे वैद्यकीय क्षेत्रातील सगळेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहात. कोरोनाचा कहर झाल्याने नागरिकांमध्ये जागरूकता वाढते आहे. रुग्णसेवेचे महत्व कळू लागले आहे. डॉक्‍टर, परिचारिका, रुग्णालय सेवक, आरोग्यसेविका, रुग्णवाहिकांचे चालक, स्वच्छताकर्मी, आरोग्यसेवेशी संबंधित प्रत्येकजणच आमचे आरोग्य सांभाळण्यासाठी आणि जीवन वाचवण्यासाठी अहोरात्र झटत आहात, यासाठी आम्ही कृतज्ञ आहोत. आम्ही सदैव नतमस्तक आहोत. 

कोरोना थैमान घालत असतानाही खंबीरपणे कार्यरत असणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजच्या (७ एप्रिल) जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना ‘परिचारिका आणि दायींना आधार’ अशी ठेवण्यात आली आहे. 

खरे सांगू, जेव्हा भय दाटून येते मनात, तेव्हा लगेच आठवतात आपल्यासारखी भक्कम माणसे या ‘भयंकरा’शी लढत असलेली आणि मग कोरोनाचे भय राहत नाही. उलट वाढतो तो कोरोनाला पुरून उरण्याचा विश्वास! म्हणूनच पुन्हा एकदा सलाम! 
- सकाळ माध्यम समूह

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com