
Ashok Kamate Birth Anniversary : राजू पुजारी संपला अन् अशोक कामटे सांगलीकरांसाठी हिरो बनले!
२००८ मध्ये मुंबईत २६/११चा दहशतवादी हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात आपले अनेक पोलिस अधिकारी, कॉन्स्टेबल शहीद झाले होते. त्यातीलच एक नाव म्हणजे आयपीएस अधिकारी अशोक कामटे होय. अशोक कामटे यांचा आज स्मृतिदीन आहे.
अशोकजी कुस्तीच्या फडात उतरायचे तेव्हा भल्याभल्यांची भीतीने गाळण उडायची. त्यांनी मी-मी म्हणणाऱ्या पैलवानांना अस्मान दाखवले. त्यांच्या जीवन कार्याचा प्रवास त्यांची पत्नी विनीता यांनी ‘टू द लास्ट बुलेट’ या पुस्तकातून मांडला आहे.
शहीद अशोक कामटे यांनी कारकिर्द अक्षरश: गाजवून सोडली होती. त्यांची पोस्टींग जिथे जिथे केली गेली तिथे त्यांनी प्रशासन आणि सुव्यवस्था सांभाळून ठेवली. सांगलीत पोलिस अधिक्षक म्हणून नियुक्त झाले आणि प्रकाशझोतात आले. कारण होतं एका गुंडाचा एन्काऊंटर. तो कुख्यात गुंड म्हणजे राजू पुजारी.
राजू पुजारी हा मुळचा कर्नाटकातल्या उडपी जिल्ह्यातला होता. तो सांगलीत कामासाठी आला.त्याने सुरूवातीला चहाची टपरी टाकली. पण याकडे आकर्षित होत त्याने गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल टाकले. सुरूवातीला किरकोळ वाद, चोरी करणारा पुजारी सांगलीतील मोठा गुंड बनला. तो मोठ्या व्यावसायिकांना धमकावणे, खंडणी वसून करणे, खूनाची सुपारी घेणे अशी कामं करायचा.
पुजारीच्या नावावर खूनाचे ६ तर खंडणी वसुलीचे 16 गुन्हे होते. मोका कायद्याखाली ही त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. याच कायद्यान्वये त्याला अटक करण्यात आली होती. तुरुंगातून सुटतात त्याने आपले गुन्हेगारी उद्योग दुप्पट जोमाने सुरू केले होते.
अशोकजींनी सांगलीच्या पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या सहाव्या दिवशी ही घटना घडली. तो दिवस होता 30 ऑगस्ट 2002. त्या दिवशी रात्री आठच्या सुमारास शहरातील एका प्रसिद्ध उद्योगपतीस राजू पुजारीने खंडणीसाठी फोन केला. फोनवर त्याने धमक्या देऊन त्या उद्योगपतींकडे खंडणीची मागणी केली आपण रात्री दोन वाजता तुमच्या कारखान्यावर येऊन पैसे तयार ठेवा असे सांगितले.
त्या उद्योगपतीने सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार दिली. सांगलीत येऊन सहाच दिवस झालेल्या अशोकजींना या तक्रारीबद्दल सांगण्यात आले. आणि क्षणाचाही विलंब न करता त्यांनी राजू पुजारीच्या मुसक्या आवळण्याचे ठरवले.
पोलिसांच्या तुकडीला सोबत घेत कामटेंनी पुजारीच्या एन्काउंटरचे प्लॅनिंग केले. उपाधीक्षक विश्वास पांढरे यांच्या नेतृत्वाखाली त्याने पोलिसांचे एक हल्ला पथक तयार केले. हे पथक कारवाईच्या वेळी दोन तुकड्यात विभागण्यात आले. राजू पुजारीला अद्दल घडवा, त्याच्याशी सर्व शक्तीनिशी मुकाबला करा, असा स्पष्ट आदेश कामटेंनी पोलिसांनी दिला.
त्या रात्री राजू पुजारी मोटारसायकलवरून कारखान्याच्या दिशेने येण्यासाठी निघाला. पण, त्याला कल्पना नव्हती की त्याचा हा शेवटचाच प्रवास ठरेल. पुजारी एका लाल रंगाच्या मोटर सायकल वर बसून कारखान्याच्या दिशेने येत होता मोटरसायकल वर तो मागे बसला होता. त्याचा साथीदार गाडी चालवत होता. पोलिसांनी त्याला ओळखले आणि आपल्या सहकाऱ्यांना इशारा दिल्या त्याबरोबर उपाधीक्षक पांढरे रस्त्यावर आले. आणि त्यांनी पुजारीच्या मोटारसायकलला थांबवण्याचा इशारा दिला. मात्र थांबायचे ऐवजी पुजारीने त्याचे जपानी बनावटीचे पिस्तूल बाहेर काढले. आणि गोळीबार सुरू केला. पांढरेंनीही त्याचक्षणी गोळीबाराने प्रतिउत्तर दिले. या चकमकीत राजू पुजारी जखमी होऊन मोटरसायकल वरून खाली पडला. त्याचा साथीदार मोटरसायकल घेऊन पळून गेला.
पोलिसांनी पुजारीला तातडीने रुग्णालयात नेले पण तेथे पोहोचण्यापूर्वीच तो मरण पावल्याचे घोषित करण्यात आले. राजू पुजारी चकमकी ठार झाल्याची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. या एन्काऊंटरमुळे केवळ सांगलीतच नव्हे तर आजूबाजूच्या गावांमध्ये ही खळबळ माजली. एखादा गुन्हेगार चकमकीत मारला जाण्याचा सांगली जिल्ह्यातला हा पहिलाच प्रसंग होता. या घटनेनंतर सांगलीतील अनेक गुन्हेगार सांगली सोडून पळून गेले. तर अनेकांनी गुन्हेगारी क्षेत्र सोडले.
ही घटना माध्यमांत प्रसिद्ध झाली आणि सगळीकडे कामटेंचे कौतूक झाले. ते रोज मॉर्निंग वॉकसाठी पोलिस ग्राऊंडवर जायचे तेव्हाही अनेक लोक त्यांना पाहण्यासाठी गर्दी करायचे. कारण, सांगलीतून गुन्हेगारीला तडीपार करणारे हे अशोक कामटे हे रीअल हिरो बनले होते. अशोक कामटेंमूळे सांगली शहरात झालेला हा बदल नक्कीच इतर जिल्हांसाठी आशादायी ठरला.