Raj Thackeray Sabha : राज ठाकरेंची तोफ आज धडाडणार, मनसे पोलिसांच्या अटींचं पालन करणार का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray Sabha

राज ठाकरेंची तोफ आज धडाडणार, मनसे पोलिसांच्या अटींचं पालन करणार का?

औरंगाबाद : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज औरंगाबाद येथे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सभा (Raj Thackeray Sabha) होत आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरे (Aurangabad Raj Thackeray Sabha) सभा घेत आहेत. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सायंकाळी साडेपाच वाजता सभा होणार आहे. गुढीपाडव्यापासून भोंगे आणि हनुमान चालिसेवर वातावरण तापलं असताना आज राज ठाकरे कोणावर तोफ डागणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज ठाकरेंनी सुरुवातीला गुढीपाडव्याच्या सभेत भाजपचं कौतुक केलं, इतकंच नाहीतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं देखील कौतुक केलं. तसेच मशिदीवरील भोंग्यांबाबत जाहीर भूमिका मांडली. तुम्ही भोंगे उतरवले नाहीतर आम्ही भोंग्यांवरून हनुमान चालिसा वाजवू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा वाजवली होती. राज ठाकरेंनी परत ठाण्यात एक सभा घेत मशिदीवरील भोंग्यांसाठी अल्टीमेटम जारी केला होता. त्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे.

राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रदिनी सभा घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. तेव्हापासूनच त्यांच्या सभेला अनेकांनी विरोध केला. वंचित बहुजन आघाडीसह राष्ट्रवादीसह पाच पक्षाचा या सभेला विरोध होता. त्यामुळे सभेला परवानगी मिळणार की नाही? अशी शंका होती. शेवटी औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरेंच्या सभेला परवानगी तर दिली. पण, त्यांना १६ अटी घालून देण्यात आल्या. समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य करू नये, असं राज ठाकरेंना बजावण्यात आलं आहे. आज सायंकाळी ही सभा होत असून मनसे पोलिसांच्या अटींचे पालन करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

टॅग्स :Raj Thackerayaurangabad