
‘माझा बाप्पा, माझं मखर’साठी पुरस्कार
पुणे - दक्षिण आशियातील माध्यम वर्तुळामध्ये मानाचे स्थान असलेल्या गोवा फेस्ट आणि अॅबी पुरस्कारांमध्ये ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘सेतू’ने स्वत:चा ठसा उमटविला. नुकत्याच पार पडलेल्या १५ व्या गोवा फेस्टमध्ये ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘सेतू’ने रौप्य आणि कांस्य पुरस्कार पटकावले. दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा पुन्हा एकदा ‘गोवा फेस्ट’ आणि ‘अॅबी पुरस्कार’ आयोजित करण्यात आले होते. दक्षिण आशियायी माध्यमांमध्ये प्रतिष्ठा असलेल्या अॅबी पुरस्कारांसोबतच यंदा ''द वन शो'' या जाहिरात क्षेत्रातील सर्वांत प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनीही गोवा फेस्टमध्ये हजेरी लावली. ‘अॅबी’ आणि ‘द वन शो’ या दोन्ही ब्रँडने एकत्र येत दक्षिण आशियातील सर्वोत्तम सर्जनशीलतेचा सन्मान करण्यात एक नवा मापदंड प्रस्थापित केला आहे.
गेल्या दशकभरापेक्षा जास्त काळ ‘सकाळ’ आणि ‘सेतू’ने एकत्रितपणे अनेक नावीन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात आणल्या. २०१९ मधील गणेशोत्सवापूर्वी ‘सकाळ’ने ‘माझा बाप्पा, माझं मखर’ ही अभिनव संकल्पना राबविली होती. त्यावेळी गणेशोत्सवापूर्वी पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि महापुराने जनजीवन उध्वस्त केले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा सर्वांत लाडका गणेशोत्सव येत होता. त्यावेळी गरज होती ती पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात देण्याची. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी प्रत्येक घरात गणपतीच्या देखाव्यासाठी किमान पाचशे रुपये खर्च केले जातात. बहुतांश घरांतील मखरे ही थर्माकोलची असतात. ‘सकाळ’ आणि ‘सेतू’ने यासंदर्भात एक वेगळी कल्पना मांडली. त्यावर्षी असे आवाहन करण्यात आले, की गणपतीच्या देखाव्याचा खर्च १०० रुपयांपर्यंत मर्यादित ठेवा आणि उरलेली रक्कम पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी दान करा.
विशेष म्हणजे, दैनंदिन बातम्यांच्या वाचनीयतेवर कुठेही परिणाम न होता ‘सकाळ’ने वर्तमानपत्रातून घरच्याघरी मखर तयार करण्यासाठी आवश्यक आराखडा छापला. तसेच त्या संदर्भात जनजागृती केली. घरातल्या उपलब्ध वस्तूंपासून आपण मखर कसे तयार करू शकतो, याची माहितीही ‘सकाळ’ने जनसामान्यांपर्यंत पोचविली. राज्यातील १३ शहरांमधील आवृत्त्यांमध्ये ‘सकाळ’ने ही मोहीम राबविली. यातून आबालवृद्धांना एका ध्येयासाठी एकत्र आणणे शक्य झाले. या संकल्पनेला अॅबीने दोन पुरस्कार देऊन गौरविले. मुद्रित माध्यमांचा नावीन्यपूर्ण उपयोग यामध्ये ‘सकाळ’ला व ‘सेतू’ या जाहिरात संस्थेला रौप्य, तर मिळालेल्या थेट प्रतिसादासाठी (डायरेक्ट रिस्पॉन्स) कांस्य पुरस्कार मिळाला.
Web Title: Award For Maza Bappa Maz Makhar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..