‘आवाज - द व्हॉइस मराठी’चे पुण्यात उदघाटन ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Awaz the voice marathi web portal

‘आपल्या आजूबाजूच्या सकारात्मक व परस्पर सामंजस्याच्या घडामोडी बऱ्याचदा दुर्लक्षित राहतात. राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणाऱ्या अशा घटनांना आवाज देण्याचं काम आवाज मराठीच्या माध्यमातून होईल,’

Web Portal : ‘आवाज - द व्हॉइस मराठी’चे पुण्यात उदघाटन !

पुणे - ‘आपल्या आजूबाजूच्या सकारात्मक व परस्पर सामंजस्याच्या घडामोडी बऱ्याचदा दुर्लक्षित राहतात. राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणाऱ्या अशा घटनांना आवाज देण्याचं काम आवाज मराठीच्या माध्यमातून होईल,’ असा विश्वास राज्याचे माजी पोलिस महासंचालक दत्तात्रेय पडसलगीकर यांनी येथे व्यक्त केला. राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सलोख्याचा पुरस्कार करणाऱ्या ‘आवाज मराठी’ या वेब पोर्टलचे सोमवारी (ता. २३) रोजी पुण्यात उद्घाटन झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पडसलगीकर बोलत होते.

या प्रसंगी ‘सकाळ माध्यम समुहा’चे संपादक संचालक श्रीराम पवार म्हणाले 'सामाजिक सौहार्द वाढविण्यासाठी विविध स्तरांवर एकात्मिकतेच्या उपक्रमांची आवश्यकता आहे. ‘आवाज मराठी’ (marathi.awazthevoice.in) हे त्याच दिशेने टाकलेले दमदार पाऊल आहे. राष्ट्रीय एकात्मकतेच्यादृष्टीने अशा पावलांचे महत्व आहे.'

‘आवाज मराठी’चे संपादक समीर शेख म्हणाले, 'बातम्यांच्या कोलाहलात समाजातील सकारात्मक गोष्टी मागे पडतात आणि बहुतांश वेळा नकारात्मक गोष्टींना व घटनांना प्राधान्य क्रम मिळतो. हे चित्र बदलण्याचे काम ‘आवाज मराठी’च्या माध्यमातून होणार आहे. समाजातील प्रेरणादायी घटना, सांस्कृतिक मिलाफाच्या कहाण्या, सामाजिक सलोखा जपण्यासाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती व संस्था यांना या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे.'

या वेळी ए. पी. ग्लोबलेचे कार्यकारी उपाध्यक्ष बॉबी निंबाळकर, मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी, सामाजिक कार्यकर्ते इब्राहीन खान आदी उपस्थित होते. त्याचबरोबर, आवाज द व्हाईसचे मुख्य संपादक अतिर खान, आवाज हिंदीचे संपादक मलिक हाश्मी, आवाज इंग्लिशच्या संपादिका आशा खोसा, आवाज उर्दूचे संपादक एम. फरिदी यांनी गुगल मीटद्वारे शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी ‘आवाज मराठी’चे उपसंपादक छाया काविरे, पूजा नायक, विवेक पानमंद उपस्थित होते.

'दोन वर्षांपूर्वी दिल्ली येथे ‘आवाज फाऊंडेशन’ची सुरुवात झाली. समुदायांमध्ये सामंजस्य वाढविणे, हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. याच भावनेतून ‘आवाज द व्हाइस’ या नावाने एकाचवेळी हिंदी, इंग्लिश आणि उर्दू या तीन भाषांमध्ये वेबसाईट सुरू करण्यात आली. पुढे आसामी भाषामध्येही काम सुरू करण्यात आले. आता मराठीतूनही या पोर्टलला सुरुवात झाली आहे. यासाठी सर्व सहकाऱ्यांना खूप शुभेच्छा!’

- सिद्धार्थ बाफना, संचालक, आवाज फाउंडेशन