आव्हाड, मोहिते-पाटील, तपासे, सामंत, डावखरे झाले, आता लक्ष उमेश पाटलांकडे 

प्रमोद बोडके
Sunday, 26 July 2020

राष्ट्रवादीसाठी महत्त्वाची जागा 
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे पदवीधरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आमदार आजपर्यंत होऊ शकला नाही. बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला घायाळ करणाऱ्या भाजप आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचा राजकीय जन्मच या मतदार संघातून झाला आहे. सध्या चंद्रकांदादा पाटील विधानसभेत आहेत. या जागेवर पुन्हा भाजपचा आमदार निवडून आणण्यासाठी भाजपसोबत आमदार चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. सध्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेना व कॉंग्रेसची ताकद या मतदार संघात मोठी आहे. तिन्ही महत्त्वाचे पक्ष सत्तेत असताना पुणे पदवीधरची जागा खेचून आणणे राष्ट्रवादीसाठी राजकीय व सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे. 

सोलापूर : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा आजचा अध्यक्ष उद्याचा आमदार हा शिरस्ता राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सुरू केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी युवक आणि राष्ट्रवादी महिला अध्यक्षांकडे भावी आमदार म्हणून पाहिले जाते. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या युवक आणि महिला आघाडीमध्ये काम करण्यासाठी कार्यकर्त्यांची नेहमीच चुरस बघायला मिळते. महाराष्ट्र विधान परिषदेच्या जवळपास 18 जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे महिला आणि युवकच्या कोणत्या आजी-माजी अध्यक्षाला संधी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलेले जितेंद्र आव्हाड, रणजितसिंह मोहिते-पाटील, निरंजन डावखरे यांना पक्षाने विधानपरिषदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष उदय सामंत यांच्याकडे आमदार असतानाच प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आल्याने त्यांना या पदाच्या माध्यमातून मंत्रीपदापर्यंतचा प्रवास सुकर झाला. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष महेश तपासे यांना राष्ट्रवादीने अंबरनाथ विधानसभा मतदार संघातून दोन वेळा उमेदवारी दिली. तपासे यांच्या आमदारकीसाठी पक्षाने प्रयत्न केले आहेत.

आजपर्यंतच्या सर्व माजी अध्यक्षांना विधिमंडळाचे सदस्य करण्यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न केले आहेत. माजी अध्यक्षांच्या यादीतील या नावांमध्ये मात्र सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य व जिल्हा राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांना विधिमंडळाच्या सदस्यत्वासाठी मात्र पक्षाने अद्यापही संधी दिलेली नाही. विधानपरिषदेच्या 18 जागा रिक्त झाल्याने पुणे पदवीधर मतदार संघातून उमेश पाटील यांना संधी मिळेल असा विश्‍वास त्यांचे समर्थक व्यक्त करू लागले आहेत. 

कृषी पदवीधर असलेल्या उमेश पाटील यांनी महाराष्ट्र राज्य पदवीधर महासंघाच्या माध्यमातून पुणे पदवीधर मतदार संघात मिस्डकॉलद्वारे नोकरी देणारा महोत्सव, पदवीधरांची नाव नोंदणी यासह विविध उपक्रम राबविले आहेत. राज्य शासनाच्या सेवेत कृषी पदवीधरांची संख्या मोठी आहे, उमेश पाटील कृषी पदवीधर असल्याने त्यांना कृषी पदवीधरांची मोठी मदत मिळू शकते. स्पर्धा परीक्षा, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष व प्रदेश राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून उमेश पाटील यांनी पुणे पदवीधर मतदार संघासह महाराष्ट्राचे विविध जिल्हा पिंजून काढले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये होणाऱ्या पुणे पदवीधरसाठी सध्या उमेश पाटील, अरुण लाड, श्रीमंत कोकाटे, सारंग पाटील यांच्यासह अन्य नावे चर्चेत आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Awhad, Mohite-Patil, Tapase, Samant, Davkhare have now complited their attention to Umesh Patil